Monday, March 28, 2016

हवामान बदलामुळे निर्माण झालेले जैविक व अजैविक ताणास प्रतिकारक वाण निर्मीतीचे मोठे आव्हान.......माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर

वनामकृवित हवामान बदल विषयावर दोन दिवसीय राष्‍ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन


मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा. डॉ. वाय एस  नेरकर
आजपर्यंत अनुवंश व वनस्‍पती पैदासशास्‍त्राच्‍या आधारे विविध पिकांचे अनेक वाणांची निर्मीती केली, त्‍यात कीड प्रतिकारक, रोग प्रतिकारक, कमी कालावधीत येणारी वाणे, अधिक उत्‍पादन देणारी वाणाचा समावेश होतो. हवामान बदलाचा मोठा परिणाम शेतीवर होत असुन आज एकाच दिवशी उन्‍हाळा, पावसाळा व हिवाळा तीनही रूतुचा अनुभव आपण घेत आहोत. हवामान बदलामुळे निर्माण होत असलेले जैविक व अजैविक ताण प्रतिकारक वाण निर्मीती करण्‍याचे मोठे आव्‍हान अनुवंश व वनस्‍पती पैदास शास्‍त्रज्ञांपुढे असुन सुधारित पैदास पध्‍दतीसोबतच पारंपारिक पैदास पध्‍दतीचा संशोधनात अवलंब करावा लागेल, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय अनुवंश व पैदासशास्‍त्र संस्था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २८ व २९ मार्च दरम्‍यान हवामान बदलामुळे जैविक व अजैविक ताणाच्‍या दुष्‍टीने शेती पिकांचे पैदासयाविषयावर राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले असुन असुन परिसंवादाच्‍या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर महात्‍मा फुले कृ‍षी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथ यांची प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थिती होती. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, परिसंवादाचे आयोजक विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर, सचिव डॉ संजय सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी कुलगुरू मा. डॉ. वाय. एस. नेरकर पुढे म्‍हणाले की, आज नवीन वाण संशोधीत करतांना अधिक उत्‍पादनासह किड व रोग प्रतिकारक, कोणत्‍याही तापमानात तग धरणारे, कमी किंवा जास्‍त पाण्‍यास सहनशील अश्‍या सर्वगुण संपन्‍न असणा-या सुपर वाणाची निर्मीती करावी लागेल.
अध्‍यक्षीय भाषणास कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, हवामान बदलामुळे विविध राज्‍यातील शेती प्रभावीत झाली असुन संशोधनाच्‍या आधारे त्‍यावर मात करावी लागेल. विविध देशात यावर मोठया प्रमाणावर संशोधन सुरू असुन देशातही सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात यावर संशोधन सुरू आहे, यासाठी मोठया प्रमाणात गुंतवणुक व मनुष्‍यबळाची गरज आहे. कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथ आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, हवामान बदलाचा मोठा परिणाम राज्‍यातील शेतीवर होत असुन शेतक-यांत उमेद व आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासाठी कृषी शास्‍त्रज्ञांना योगदान द्यावे लागेल. 
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व डॉ संजय सिंह यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. डि. बी. देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे व डॉ गोदावरी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एच. व्‍ही. काळेपांडे यांनी केले. सदरिल दोन दिवसीय परिसंवादात देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडु, तेलंगाणा, गुजरात, हरियाणा, महाराष्‍ट्र आदी राज्‍यातुन तीनशे पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी संशोधक सहभागी झाले आहेत. अन्‍न सुरक्षाकरिता हवामान बदलाचा शेतीवरील परिणाम कमी करण्‍यासाठी भविष्‍यात कृषी संशोधनातील प्राधन्‍यक्रम ठरविणे व कृती आराखडा निश्चित करण्‍यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले आहे. पिकांतील ताण प्रतिकारकाचे अनुवंश, जैविक व अजैविक ताणावर मात करण्‍यासाठी पारंपारिक पैदासशास्‍त्र, मॉलेकुलार पैदास पध्‍दती, कृषीविद्या पध्‍दती, हवामान बदलाच्‍या संबंधाने वनस्पती अनुवंश संसाधन व्‍यवस्‍थापन व किड-रोग प्रतिकारकता आदी विषयावर देशभरातील शास्त्रज्ञ संशोधनपर लेख सादर करून विचारमंधन करणार आहेत.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथ