भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही
देश असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले, 69
वर्षानंतरही देश एकसंघ असुन पुढे अनेक वर्ष अखंडच राहणार आहे, असे प्रतिपादन यशवंतराव
चव्हाण विकास प्रबोधीनीचे संशोधन अधिकारी (प्रकाशन) डॉ बबन
जोगदंड यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कास्ट्राईक
कर्मचारी महासंघ वनामकृवि शाखेच्या वतीने महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दिनांक 25 एप्रिल रोजी आयोजित व्याख्यानाप्रसंगी
ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते, तर
व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप
इंगोले, डॉ पंदेकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ डि एम मानकर, कुलसचिव श्री रणजित
पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, महासंघाचे अध्यक्ष डॉ गजेंद्र लोंढे,
महासचिव प्रा ए एम कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ बबन जोगदंड पुढे म्हणाले की,
संविधानामुळेच देशातील प्रत्येक नागरिक समता, स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य,
शैक्षणिक स्वातंत्र्य उपभोगत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान
निर्मितीसाठी कठोर मेहनत घेतले. डॉ आंबेडकर हे शिक्षण, शिस्त, कठोर परिश्रम, स्वावलंबन,
स्वाभीमान आदींमुळेच एक महान कार्य करू शकले. डॉ आंबेडकरांना शेतक-यांसाठी काम
करण्याची इच्छा होती. अनेक धरण निर्मितीत त्यांचे योगदान होते. त्यांनी जीवनात
शिक्षणाला सर्वाच्च स्थान दिले, ते आयुष्यभर विद्यार्थ्यी म्हणुनच राहिले. प्रत्येक
नागरिकाला मतदानाचा अधिकरी दिला, स्त्रीयांना पुरूषाबरोबर समान अधिकार दिले. बालमजुरी
रोखण्यासाठी कायदयात तरतुद केली. समाजहितासाठीच अन्यायाविरूध्द लेखणीने प्रहार
केले. आज विदेशातही डॉ आंबेडकरांची जयंती मोठया उत्साहाने साजरी केली जाते, असे
प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा डॉ
अशोक ढवण यांनी देशातील अनेक महान व्यक्तीचे विचारधन आपल्याकडे आहे, त्यांच्या
विचारांचे सातत्याने चिंतन केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ
गजेंद्र लोंढे यांनी केले तर प्रमुख व्यक्तांचा परिचय डॉ व्ही के टाकणखार यांनी
करून दिला. सुत्रसंचालन डॉ फरिया खान यांनी केले तर आभार प्रा ए एम कांबळे यांनी
मानले. कार्यक्रमास शहरातील नागरिक, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व
कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.