Saturday, August 10, 2019

कसा आहे वनामकृवितील सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत परभणी येथे सामुदायिक विज्ञान हा नाविन्यपूर्ण व्यावसायिभिमूख अभ्यासक्रम राबवला जातो. सन २०१७ पासून पूर्वीच्या गृहविज्ञान अभ्यासक्रमात बदल करुन तो आता सामुदायिक विज्ञान या नांवाने संबोधल्या जात आहे. महाराष्ट्रातील चार कृषि विद्यापीठांपैकी केवळ वनामकृवि अंतर्गत परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात (कॉलेज ऑफ कॉम्युनिटी सायन्स) हा अभ्यासक्रम राबवला जातो. अभियांत्रिकी तथा वैद्यकीय अभ्यासक्रमासारखा सामुदायिक विज्ञानहा देखील व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याने तो पूर्ण करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागतो. हा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्‍यांना बी. एसस्सी. (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स ही पदवी प्रदान करण्यात येते. कोणत्याही सामान्य पदवीपेक्षा ऑनर्स पदवीला विशेष महत्त्व असते, कारण ऑनर्स पदवी अभ्यासक्रम हा अधिक तांत्रिक पध्दतीचा असून विषयांशी निगडीत प्रत्यक्ष अनुभवावर अधिक भर असतो. त्यामुळे विद्यार्थी स्वत:च्या नोकरी-व्यवसायात अधिक यशस्वी होतात. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील पाच विभाग असुन यात मानव विकास व कौटुंबिक अभ्यास (हयुमन डेव्हलपमेंट अॅन्ड फॅमिली स्टडीज), अन्न विज्ञान आणि पोषण (फुड सायन्स अॅन्ड न्युट्रीशन), साधन संपत्ती व्यवस्थापन आणि ग्राहक विज्ञान (रिसोर्स मॅनेजमेंट अॅन्ड कन्झ्युमर सायन्स), वस्त्र व परिधान अभिकल्पना (टेक्सटाईल अॅन्ड अॅपरल डिझाईनिंग), सामुदायिक विस्तार व संदेशवहन (कम्युनिटी एक्सटेंशन अॅन्ड कम्युनिकेशन मॅनेजमेंट) यांच्याद्वारे पदवीपूर्व अभ्यासक्रमातील एकूण ५२ विषय हे ८ सत्रांमध्ये पूर्ण केले जातात. विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीच्या तीन वर्षांत त्यांना या अभ्यासक्रमातील प्रत्येक विभागांच्या प्रमुख विषयांचे अध्ययन करावे लागते. तद्नंतर पदवी शिक्षणातील चतुर्थ वर्षात त्यांना त्यांच्या विषयासंबंधीच्या प्रक्षेत्रावरील प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी नामांकीत संस्थामध्ये इम्लांट टे्रनिंग, ग्रामीण विभागातील कार्यानुभवासाठी रावे (आरएडब्ल्युई - रुरल एरीया वर्क एक्सपिरियन्स) तथा स्टुडन्टस रेडी प्रोग्राम (इएलपी- एक्सपिरियंशियल लर्निंग प्रोग्राम) असे अद्ययावत उपक्रम राबवले जातात. अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्‍यांसाठी राज्‍यात व देशातील विविध संस्थाना भेटी देण्यासाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.
सध्याच्या आधुनिक युगातील विविध आव्हाने पेलण्याकरिता विद्यार्थ्‍यांना सक्षम करण्यासाठी त्यांची संवाद कौशल्ये तथा व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. याबरोबरच शारीरिक शिक्षण, योगाभ्यास, सांस्कृतीक कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा योजना यासारख्या विधायक कार्यातही विद्यार्थ्‍यांना सहभागी करुन घेतले जाते. भारतातील विविध राज्यांमध्ये कृषि विद्यापीठांशी संलग्नित असणा­या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाप्रमाणेच हा अभ्यासक्रम असून यामुळे विद्यार्थ्‍यांना अनेक नोकरी-व्यवसायाच्या वाटा खुल्या झालेल्या आहेत. सामुदायिक विज्ञान या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी इयत्‍ता बारावी विज्ञान, किंवा तत्सम परीक्षा तथा सक्षम प्राधिका­याकडून आयोजित करण्यात आलेली एमएचटी-सीईटी, जेईई / नीट, एचआयइइए - युजी सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्‍यक असून प्रवेशा संबंधीची सविस्तर माहिती महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या संकेतस्‍थळावर (www.mcaer.org) उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून सन २०१९-२० मध्ये ज्या विद्यार्थ्‍यांनी विहित वेळेत कृषि विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे, असे विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र असतील. विद्यार्थ्‍यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी या महाविद्यालयात अद्ययावत प्रयोगशाळा व वर्ग, उच्चविद्या विभुषित व अनुभवी प्राध्यापकवृंद, कॉन्सलींग व प्लेसमेंट सेल, संगणक प्रयोगशाळा, इंटरनेट, अद्ययावत वसतिगृह, खेळाचे मैदान अशा सर्व सुविधांसह अतिशय रम्य परिसरात हे महाविद्यालय वसलेले आहे. सामुदायिक विज्ञान या विषयातील पदवीपूर्व तथा पदव्यूत्तर शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्याथर्यांना नोकरी - व्यवसायाचे अनेक मार्ग खुले असून विशेषत: आहारतज्ज्ञ, बालविकास अधिकारी, कॉन्सलर, प्राध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक, इंटेरीयर डिझायनर, हॅन्डीक्राफ्ट मेकर्स, इव्हेन्ट मॅनेजर, फॅशन डिझायनर, बुटीक मॅनेजर, विस्तार अधिकारी, मल्टी मेडिया डेव्हलपर्स, प्रेस रिपोर्टर, आकाशवाणी व दूरदर्शन कार्यक्रम संचलनकर्ता, महिला व बालविकास योजनेच्या विविध पदांवर तथा खाजगी, निम शासकीय, शासकीय स्तरावरील विविध योजना व संस्थामध्ये कार्य करण्याच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. याबरोबरच या विद्यार्थ्‍यांना स्वत:च्या दर्जेदार पूर्व प्राथमिक शाळा, पाळणाघरे सुरु करणे, आहार सल्ला केंद्र, कौटूंबिक मार्गदर्शन केंद्र व समुपदेशन केंद्र, कॅन्टीन स्थापित करण्यासाठीही सक्षम केले जाते. तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातून पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षांसाठी देखील पात्र असल्याने त्याद्वारेही ते यश प्राप्त करु शकतात. विद्यार्थ्‍यांना सामुदायिक विज्ञान या अभ्यासक्रमाचा लाभ त्यांच्या नोकरी - व्यवसायाकरिता तर होतोच या व्यतिरिक्त त्यांचे वैयक्तिक जीवनही आनंदी व यशस्वीपणे व्यतीत करण्यासाठी या अभ्यासक्रमास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क - सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी दुरध्‍वनी क्रमांक (02452) 233260

सौजन्‍य : डॉ. जया बंगाळे, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी