वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पास भारत सरकारच्या विज्ञान
व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान शास्त्र विभागाच्या मार्फत करडई
संशोधनाकरिता नेटवर्क प्रकल्प पुढील पाच वर्षाकरिता मंजुर झाला आहे. या संशोधन प्रकल्पात
हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती
अनुवांशिक संशोधन ब्युरो, दिल्ली विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ व लुधियाना येथील पंजाब
कृषि विद्यापीठ या प्रमुख संस्था एकत्रितरित्या संशोधनात सहभागी आहेत.
करडई या प्रमुख तेलबिया
पिकाच्या संशोधनाकरिता विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या कडुन या नेटवर्क
प्रकल्पास रू 19.59 कोटी इतके अनुदान मंजुर झाले असुन यात परभणी येथील अखिल
भारतीय सन्मवयीत करडई संशोधन प्रकल्पास रू 48.65 लाख इतके अनुदान संशोधनासाठी
प्राप्त होणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश करडई सुधारणेकरिता जनुकीय
विविधतेचा शोध (Exploring Genetic Diversity
for improvement of safflower through genomic – assisted discovery of QTLs /
Genes Associated with Agronomic Traits) हा आहे. यात कोरडवाहु करडई
पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच बियातील तेलाचे प्रमाण व गुणवत्तेत वाढीकरिता फेनोटाईप
व आण्विक मोलेक्युलार संच तयार करणे अंर्तभुत आहे. तसेच तेलबिया पिकाखालील
क्षेत्र वाढीचे उद्देष्ट आहे. या संशोधन प्रकल्पाच्या मुख्य अन्वेषक पदाची
जबाबदारी प्रभारी अधिकारी डॉ एस बी घुगे व सहाय्यक मुख्य अन्वेषक करडई कृषि
विद्यावेत्ता प्रा प्रितम भुतडा यांच्या कडे सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर व हैद्राबाद येथील
तेलबिया संशोधन संचालनालय यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले, अशी माहिती डॉ
एस बी घुगे यांनी दिली.