वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागांतर्गत असलेल्या अखिल भारतीय मृदा जैव विविधता – जैविक खत प्रकल्पामध्ये विविध पिकांसाठी द्रवरुप जिवाणु खते विक्रीसाठी उपलब्ध असुन सदरिल द्रवरूप जिवाणु खतांचे दर प्रती लिटर रूपये ३७५ /- या प्रमाणे आहे. यात रायझोबीयम, अॅझॅक्टोबॅक्टऱ, स्फुरद विरघळविणारे जिवाणु खत (पीएसबी), पालाश विरघळविणार व वहन करणारे जिवाणु खत, गंधक विरघळविणारे जिवाणु खत, जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणु खत, रायझोफॉस, अॅझोटोफॉस आदीचा समावेश आहे, अशी माहिती विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्माईल व प्रकल्पाचे प्रमुख डॉ अनिल धमक यांनी दिली. अधिक माहिती करिता प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. अनिल धमक (मोबाईल क्रमांक ९४२००३३०४६), श्री. सय्यद मुन्शी (९९६०२८२८०३), श्री. सुनिल शेंडे (७५०७४४४४८८) यांच्याशी संपर्क करावा.
जाणुन घ्या द्रवरूप जिवाणु
खतांचा वापर व उपयुक्तता
द्रवरूप जिवाणु खतांची उपयुक्तता
व फायदे : जिवाणु खत म्हणजे पिकांसाठी उपयुक्त जीवंत किंवा सुप्त अवस्थेतील जीवाणुंचे
निर्जंतुक वाहकामध्ये केलेले मिश्रण. बियाणे किंवा रोपास बीजप्रक्रिया / अंतरक्षीकरण
किंवा मातीतुन वापरल्यास जमिनीत पिकांकरिता उपयुक्त जीवाणुंचीसंख्येत वाढ होऊन पिकांसाठी
आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो, व उत्पादनात वाढ होते. जीवाणु खते ही कमी किंमतीत उपलब्ध असुन जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांची
मदत होते. जमीन जैविक क्रियाशील बनते. म्ळांच्या संख्येत
व लांबीत भरपुर वाढ होऊन जमीनीत मुख्य खोडापासुन दुरवरील व खोलवरील अन्नद्रव्य
व पाणी पिकास उपलब्ध होते. पिकांची रोग व किड प्रतिकार शक्तीत वाढ होते. पिकांना
अन्नद्रव्ये जमिनीतुन शोषण करण्यास मदत करतात. तसेच
जमिनीची नैसर्गिक सुपिकता टिकवुन ठेवतात. जिवाणु खते वापरल्याने रासायनिक खताची
उणिव भरून काढता येत नसुन ही खते रासायनिक खतासोबत पुरक खते म्हणुन वापरणे
फायद्याचे आहे. जिवाणु खतांमुळे पिकांना दिलेल्या रासायनिक
खतांचा कार्यक्षमरित्या वापर होण्यास मदत होते.
द्रवरूप जैविक खताचे प्रकार
नत्र स्थिर करणारे जिवाणु
रायझोबियम जीवाणु : या जिवाणुचे कार्य सहजीवी पध्दतीने चालते, हे जीवाणु
हवेतील नत्र पिकांच्या मुळाच्या गाठीमध्ये स्थिर करतात. पिकाशिवाय
स्वतंत्ररित्या या जीवाणुंना नत्र स्थिर करता येत नाही म्हणुन यास सहजीवी जीवाणु
असे म्हणतात. हे जीवाणु पिकांच्या मुळावर गाठी तयार करून राहातात
व त्यांना लागणारे अन्न वनस्पती कडुन मिळवितात व हवेतील नत्र शोषुन घेऊन तो अमोनियाच्या
स्वरूपात पिकांना पुरवितात. रायझोबीयमचे कार्यक्षमतेच्या दृष्टीने
वेगवेगळे सात गट असुन विशिष्ट गटातील पिकांना विशिष्ट गटाचे जीवाणु वापरल्यास फायदाचे
ठरते. त्यामुळे जीवाणु वापरतांना कोणत्या गटाचे आहे याची खात्री
करून वापरावीत. या जिवाणुच्या वापरामुळे
सोयाबीन, मुग, हरभरा, भुईमुग, तुर, उडीद आदी पिक
उत्पादनात २० टक्कयापेक्षा जास्त वाढ झाल्याचे आढळुन आले आहे.
नत्र स्थिर करणारे जिवाणु अॅझोटोबॅक्टर
जीवाणु : हे जीवाणु जमिनीत स्वतंत्रपणे वनस्पतीच्या मुळाभोवती राहुन असहजीवी पध्दतीने
हवेतील मुक्त स्वरूपात असणा-या नत्र वायुचे स्थिरीकरण करून पिकास
उपलब्ध करून देतो. यामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात
१० ते २५ टक्कयापर्यंत वाढ होते. हे जीवाणु खत तृणधान्य, गळीतधान्य, भाजीपाला, फळझाडे, बटाटा, ऊस, कापुस, हळद, आले, फुलझाडे आदी पिकांसाठी
वापरता येते. अॅझोटोबॅक्टर जीवाणु सेंद्रीय पदार्थाच्या विकरणातुन
तयार होणा-या उर्जेवर जगत असल्यामुळे ज्या जमिनीत सेंद्रीय
पदार्थाचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीत हे जीवाणुचे कार्य जास्त प्रमाणात चालते.
स्फुरद विरघळविणारी जीवणु (पीएसबी) : रासायनिक खताव्दारे पुरवलेल्या स्फुरद सर्वच्या सर्व
पिकास उपलब्ध होत नाही. यापैकी २० ते २५ टक्केच स्फुरद पिकांना वापरता येऊ शकतो. बाकीचा ७५ ते ८० टक्के स्फुरद मातीच्या कणावर स्थिर होऊन त्याची पिकांना
उपलब्धता होत नाही. त्यासाठी स्फुरद विरघळविण्याचे कार्य
विशिष्ट प्रकारचे जीवाणु करतात, त्यामुळे स्फुरद पिकांना उपलब्ध
होतो. हे जीवाणु मातीच्या कणावर स्थिर झालेला व उपलब्ध नसणा-या स्फुरदाचे विघटन करून त्याचे पाण्यात विरघळु शकणा-या द्राव्य स्वरूपात रूपांतर करतात. स्फुरद जीवाणु
खतामध्ये अनेक उपयुक्त जीवाणुंचा समावेश असतो. या जीवाणुकडुन
सायट्रीक आम्ल, लॅक्टीक आम्ल, मॅलीक
आम्ल, फ्युमॅरीक आम्ल आदी अनेक कार्बनिक आम्ले तयार होतात
व अविद्राव्य स्वरूपात संयोग पावतात व त्याचे रूपांतर विद्राव्य स्वरूपात करतात.
द्रवरूप जीवाण खते वापरण्याची
पध्दत
बीजप्रक्रिया किंवा बियाण्यास अंतरक्षीकरण
: यात दहा किलो बियाण्यास १०० मिली प्रत्येकी द्रवरूप जीवाणु खताचा वापर करावा. हे द्रावण सारख्या
प्रमाणात लावुन लगेच पेरणी करावी. सोयाबीन व भुईमुग या सारख्या
बियाणावर पातळ आवरण असलेल या पिकांकरिता दहा किलो बियाण्यास ५० मिली प्रत्येकी जीवाणु
खत पुरसे होते. पुनर्लागवड करणा-या पिकामध्ये
जसे भाजीपाला, भात आदी मध्ये पुनर्लागवड करतांना अॅझोटोबॅक्टर
किंवा अॅझोस्पिरीलम व स्फुरद विरघळणारी द्रवरूप जीवाणुंचा वापर केला जातो.
जीवाणु खते वापरतांना घ्यावयाची काळजी : जीवाणु खताच्या बाटल्या गर्मीच्या ठिकानी किंवा थेट सुर्य प्रकाशात ठेऊ नयेत. जीवाणु खते किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके किंवा रासायनिक खताबरोबर मिसळु नयेत. जीवाणु खते बियाण्यास लावल्यानंतर थोडा वेळ सावलीत वाळवावीत. जीवाणु खते दिलेल्या अंतिम तारखेनंतर वापरू नये. ज्या पिकासाठी असतील त्याच पिकासाठी वापरावीत. जीवाणु खते जमिनीत दिल्यानंतर त्यांना जीवंत ठेवण्यासाठी जमिनीत ओल असणे आवश्यक आहे.