'महिलांचा सन्मान हेच आपले ध्येय' असणे आवश्यक... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने दिनांक ८ मार्च
रोजी ऑनलाईन जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. मार्गदर्शनात त्यांनी
महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक स्वावलंबन आवश्यक असून, त्यादृष्टीने
विद्यापीठ विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठात
दरवर्षी ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष महिला दिन
साजरा केला जातो. यावेळी महिलांना उत्पादन विक्रीसाठी संधी मिळते. विद्यापीठाने
अनेक महिलांना उद्योजिका बनवण्यात मोलाचे योगदान दिले असून, त्यांचे
यश वृत्तपत्रांतून झळकत असते. याबरोबरच माननीय कुलगुरूंनी जागतिक महिला दिनाचे
महत्त्व विशद केले. यावर्षीच्या 'Accelerate Action' या
जागतिक महिला दिनाच्या संकल्पनेनुसार महिलांच्या प्रगतीसाठी तत्परता आवश्यक आहे.
महिलांच्या सहभागातून समाजात सकारात्मक बदल होत आहे. शिक्षणात मुली अग्रेसर आहेत
आणि देशाच्या विकासातही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ‘महिलांचा सन्मान,
हेच आपले ध्येय’ असावे, असेही त्यांनी
सांगितले.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यापीठ महिलांच्या सुरक्षेची
काळजी घेत असून विद्यार्थिनींच्या स्वास्थ्यासाठी आगामी काळात विशेष उपक्रम राबवत आहे,
असे नमूद केले.
प्रास्ताविकात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता
डॉ. जया बंगाळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली.
माजी प्राध्यापिका डॉ. आशा आर्या यांनी महिलांच्या सर्वांगीण
विकासात आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. आजची जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे
युवक-युवतींमध्ये शारीरिक क्षमता कमी होत आहे. त्यामुळे सकस आहार, वेळेचे नियोजन आणि नियमित व्यायाम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
परभणी जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता
नावंदे यांनी महिलांसाठी आत्मसंरक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतल्यास मुली आणि महिलांना निश्चितच लाभ होतो. यासाठी
वेळेचे भान ठेवून प्रतिकार करण्यासाठी आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, महिला प्रति समाजात आदर निर्माण
व्हावा. याबरोबरच छेडछाड करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण होणेही आवश्यक आहे. यातून
काही प्रमाणात गैरप्रकार थांबू शकतो, असे प्रतिपादन केले.
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता
डॉ. संतोष कांबळे, डॉ. दिगंबर पेरके, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी
कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, कार्यक्रम
समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर, माननीय कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण
कापसे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीं
गायत्री वाणी, क्षितिजा मस्के आणि किंजल मोरे यांनी विद्यापीठाने पूर्वी
राबविलेल्या उपक्रमांमधून धैर्य आणि आत्मविश्वास वाढला असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त
केले.