माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते महोत्सवाचे उद्घाटन
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित यांच्या वतीने मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव – २०२५ चे आयोजन ७ ते १० मार्च २०२५ दरम्यान प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आले. समारंभास प्रमुख अतिथी म्हणून माननीय खासदार श्री संजयजी जाधव उपस्थित होते. यावेळी गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे, गुरुपुत्र, कृषिरत्न श्री आबासाहेब मोरे, आयुक्त श्री धैर्यशील जाधव, आत्मा परभणीचे प्रकल्प संचालक श्री दौलत चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे, तसेच सेवा मार्गाचे विभागीय प्रतिनिधी श्री संदीपभाऊ देशमुख, डॉ. गोविंद साळुंके (बीड), माजी नगराध्यक्ष श्री सचिनजी गोरे (परभणी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना
सांगितले की, शेती आणि आध्यात्मिक विश्वास एकत्रितपणे समाजविकासासाठी
महत्त्वपूर्ण आहेत. अध्यात्माच्या जोडीने विकासाचे कार्य करण्याची महाराष्ट्र आणि
मराठवाड्याची संस्कृती असून ही बाब प्रसंशनीय आहे. कार्यक्रमाचे आयोजक हे धार्मिक
गुरु असून ते राष्ट्र विकास, कृषी विकास यातून समाजाचा विकास सतत साधत आहेत. मराठवाड्यात
कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत आहे. विशेषतः
गोदावरी तुरीच्या वाणाने महाराष्ट्रासह देशपातळीवर लौकिक मिळवला असून, अनेक शेतकरी लखपती बनत आहेत. विद्यापीठ
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्यरत असून, शेतकऱ्यांना दर्जेदार तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण बियाणे, रोपे उपलब्ध करून देत आहे. आज (७ मार्च) मराठवाड्यातील चार शेतकऱ्यांचा
आणि दोन शास्त्रज्ञांचा राष्ट्रीय पातळीवर उत्तर प्रदेश येथे सन्मान होत आहे,
ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी
विद्यापीठ दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’
या उपक्रमांतर्गत शास्त्रज्ञांना थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची
संधी उपलब्ध करून देत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मंगळवार व शुक्रवार सायंकाळी
ऑनलाइन कृषी संवादही आयोजित केला जातो, असे प्रतिपादन त्यांनी
केले. ते पुढे म्हणाले की, या संस्थेने केलेले कार्य विद्यापीठाच्या कार्यास पूरक
असून विद्यापीठ आपल्या सोबत आहे, अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमात तज्ञांचे
मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आयोजित केले याबद्दल आयोजकांचे
माननीय कुलागुरुनी अभिनंदन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कृषी महोत्सवात विभागीय कृषी प्रदर्शन, पूरक व्यवसाय प्रदर्शन, युवा प्रबोधन, कृषी ढिंढी विज्ञान प्रदर्शन, मराठवाडा कृषी
संस्कृती दर्शन, स्वयंचलित यंत्रसामग्री प्रदर्शन, बियाणे व पशुपालन मेळावा, मोफत आरोग्य तपासणी शिबिर यांसह
विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठवाड्यातील हजारो शेतकरी,
कृषी संस्था, संशोधक, विद्यार्थी
आणि कृषी उद्योजकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.