Tuesday, August 13, 2013

चला करूया सामुदायीक गाजरगवतचे निर्मुलन * साजरा करू गाजर गवत जागृती सप्ताह

गाजर गवत हे एक परदेशी तण असुन ह्याला शास्‍त्रीय भाषेत पार्थेनियम हिस्‍टोरियोफोरस असे म्‍हणतात. तसेच पांढरुफुली या स्‍थानिक नावाने सुध्‍दा आपण ओळखतो. गाजर गवताचे मुळस्‍थान उत्‍तर अमेरिकेतील मेक्सिको असून जगातील इतर देशात ह्या तणाचा प्रसार मेक्सिको पासून झालेला आहे. भारतामध्ये सर्वप्रथम गाजरगवत पुणे येथे 1955 मध्‍ये आढळून आले. त्‍यानंतर ह्या तणाचा झपाटयाने सर्वदूर प्रसार झाला.
गाजर गवतामुळे होणारे दुष्‍परिणाम
गाजर गवत हे विषारी, आक्रमक आणि अलर्जी उत्‍पन्‍न करणारे तण आहे. याच्या सानिध्यात आल्यास त्वचा रोग, दमा, श्‍वसनाचा त्रास, शिका, सर्दी, डोळे सुजणे, खाज सुटणे, गुदी येणे, श्‍वसनेंद्रीयाचे विकार इत्यादी व्याधि उत्‍पन्‍न होउ शकतात. जनावरामधे चक्कर येणे, अंर्धागवायु, दुधास कडवट वास यासारख्‍या समस्या निर्माण होतात. शेतातील पिकाबरोबर अन्‍नाद्रव्‍यासाठी स्‍पर्धा केल्‍यामुळे उत्‍पादनात घट आणि पडीक जमिनीतील जनावरांच्‍या चराई क्षेत्रात घट होते. परागकणामुळे तेलबिया, भाजीपाला, फळे इ. पिकांच्‍या उत्‍पादनात घट होते तसेच मुळाद्वारे जमिनीत विषारी रसायने सोडल्‍यामुळे पिकाच्‍या उत्‍पादनात घट होते.
गाजर गवताचा प्रसार
      गाजर गवत हे बहुतेक पडीक जमिनीत शहरातील मोकळ्या जागेत, औद्योगिक वसाहती, महामार्ग, रेल्‍वे मार्ग, राज्‍य रस्‍ते आणि महामार्गाच्‍या दुतर्फा, नदी, नाले, तलाव, डबके इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येते. तसेच शेतातील जवळपास सर्वच पिकांमध्‍ये जसे की, कापूस, तूर, ज्‍वारी, भुईमूग, उस, भाजीपाला पिके आणि फळ पिकांमध्‍ये सुध्‍दा आढळून येते.
      गाजर गवताची विशेषत: भरपूर बियाणे तयार करण्‍याची अद् भूत क्षमता यामुळे एक चौरस मीटर क्षेत्रात 33 लक्ष परागकणापासून 15000-22500 बी तयार होतात. या बियांचा प्रसार मुख्‍यत: शेणखताद्वारे, हवे द्वारे, नदीनाले यातील पाण्‍याद्वारे, सांडपाण्‍याद्वारे, वाहनाच्‍या टायरद्वारे, शेतातील अवजारे, अप्रत्‍यक्षरित्‍या माणसाद्वारे इत्‍यादी कारणांमुळे होतो.
गाजर गवताचे बी सुक्ष्म असल्यामूळे व हवेद्वारे / पाण्याद्वारे सह्ज एका ठिकाणाउन दुसरीकडे प्रसार होत असल्याने ते सर्वत्र पसरते. एका झाडापासून ५००० ते २५००० बिया तयार होतात. गाजरगवताचा जीवनक्रम ३ ते ४ महिण्यात पुर्ण होतो.

गाजरगवतचे सामुदायीक निर्मुलनाची गरज
देशात सर्वत्र गाजर गवत जागृती सप्ताह दि. १६ ते २२ आगस्त २०१३ दरम्यान साजरा करण्यात येणार असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या तणविज्ञान संशोधन केंद्रातर्फे शिवार फेरी, व्याख्याने गटचर्चा, पोष्टर्स लावणे, घडी पत्रिका वाटणे तसेच राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्वंयसेवक, ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाचे कृषिदुत यांच्‍या मार्फत गाजर गवत उपटणे, भुंगे सोडणे इत्यादि उपक्रम विविध ठिकाणी घेण्य़ात येणार आहेत. गाजर गवताच्या निर्मुलनासाठी सामुहीक चळवळ राबविणे आवश्यक आहे. यासाठी सामाजिक संस्‍था, शेतकरी गट, धर्मादाय संस्‍था यांनी एकाच वेळी म्‍हणजेच सप्ताहाच्या दरम्यान निर्मुलनाचे विविध कार्यक्रम राबविल्यास गाजरगवत निर्मुलन सह्जरित्या होईल. असा कार्यक्रम २ ते ३ वर्ष सतत राबविल्यास गाजर गवताचे प्रमाण कमी होईल. वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २ वर्षापासुन विद्यापीठ परिसरात विविध कार्यक्रम / उपक्रम राबविल्याने तसेच मॅक्सिकन भुंगे सोडल्याने विद्यापीठ परिसर गाजर गवत मुक्त झाला आहे. तरी सर्व नागरीकांना विद्यापीठाच्‍या वतीने आवाहन करण्‍यात येते गाजरगवत निर्मुलन सप्‍ताहामध्‍ये विविध कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन सहभाग नोंदवावा.

गाजर गावत निर्मुलनाचे अनेक उपाय आहेत, जे एकाचवेळी वापरले तर त्याचे निर्मुलन करणे शक्य आहे.
प्रतिंबधक उपाय : पडिक जमिनी, शेतावरचे बांध, कंपोस्ट खड्डे रस्ते, रेल्वे रूळ, इमारती लगतच्या जागा अशा ठिकाणी हे तण फुलावर येण्यापुर्वी मुळासह उपटून काढावे व नष्ट करावे. त्यामुळे गाजर गवताच्या बियांचे उत्पादन थांबते व प्रसार रोखण्यास मदत होते.
निवारणात्मक उपाय : लागवड क्षेत्रात वांरवार आंतंरमशागत करून तसेच शिफारशीप्रमाणे तणनाशकाचा वापर करून  गाजर गवतचे नियंत्रण करता येईल. तर बिगर लागवड क्षेत्रामध्ये उगवणा-या गाजर गवतासाठी २,४ डी हे तणनाशक ३ कीलो ५०० ली पाण्यात मिसळून तण फुलावर येण्यापुर्वी फवारावे.
जैविक उपाय : सन 1986 मध्‍ये गाजर गवताच्‍या नियंत्रणासाठी वसवंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कीटकशास्‍त्र विभागाने मेक्सिकन भूंगे आणून ह्या भूंग्‍याचे प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर गुणन करुन शेतात सोडले असता ह्या भूंग्‍यानी मोठ्या प्रमाणावर गाजर गवताचा नाश केल्‍याचे आढळून आले

गाजर गवताच्‍या जैविक नियंत्रणाची निकड
·    गाजर गवत हे विषारी असल्‍यामुळे गाजर गवत उपलटण्‍यासाठी मजूर वर्ग सहज तयार होत नाही.
·  रासायनिक तणनाशके ही महागडी असल्‍यामुळे वारंवार त्‍यांचा वापर करणे आर्थिकदृष्‍टया  न परवडणारे आहे.
·    सार्वजनिक क्षेत्रातील गाजर गवत नियंत्रित करणे खर्चिक असल्‍यामुळे शासनाला न परवडणारे आहे.
·    रासायनिक तणनाशकांचा वापर हा पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
·    रासायनिक नियंत्रण हे प्रभावी नाही, त्‍यामुळे जैविक नियंत्रण महत्‍वाचे आहे.
 या सर्व बाबींमुळे गाजर गवताचे झायगोग्रामाद्वारे जैविक नियंत्रण करणे आर्थिकदृष्‍ट्या व पर्यावरणीयदृष्‍ट्या फायद्याचे आहे.
ओळख झायगोग्रामा भुंग्‍याची
      मेक्सिकोस्‍थीत गाजर गवतावर उपजिविका करणारा झायगोग्रामा भुंगेरा मेक्सिकोतून आयात करण्‍यात आला. म्‍हणुनच या भुंग्‍याला मेक्सिकन भुंगा असे म्‍हणतात. या किडीचे प्रौढ भुंगे मळकट पांढरे असून त्‍यावर काळसर रंगाच्‍या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. हृया रेषा त्रिशुलाकार असल्‍यामुळे काही ठिकाणी यांना त्रिशुल भुंगे असेही म्‍हणतात. प्रौढ भुंगे आकाराने मध्‍यम, सहा मि.मि. लांब असून मादी भुंगे नरापेक्षा आकाराने मोठे असतात.
झायगोग्रामा भुंग्‍याचा जीवनक्रम
मादी भुंगे अलग-अलग अथवा गुच्‍छात पानाच्‍या खालील बाजूवर साधारणपणे 2000 अंडी घालतात.  अंड्यांचा रंग फिकट पिवळा असून अंड्यातून अळ्या बाहेर पडण्‍याच्‍या वेळी लालसर होतो. अंडी अवस्‍थेचा कालावधी चार ते सहा दिवसांचा असून, अळ्यांचा चार अवस्‍था दहा ते अकरा दिवसात पूर्ण होतात तर कोषावस्‍था 9 ते 10 दिवसांची असते. या भुंग्‍याचा एकूण कालावधी दोन ते तीन महिन्‍याचा असून ते गाजर गवताच्‍या पानांवर उपजिविका करतात.
झायगोग्रामाद्वारे गाजर गवत नियंत्रण
      अंड्यातून बाहेर निघालेल्‍या अळ्या गाजर गवतावरील शेंड्याची पाने खातात. प्रथम अळ्या शेवट्या कळ्या, सहकळ्या आणि नंतर पानाच्‍या कडेने खातात. तरुण अळ्या झाडाची वाढ आणि फुले येण्‍याचे थांबवितात. पुर्ण वाढलेल्‍या अळ्या रंगाने पिवळ्या पडतात आणि कसलीही हालचाल न करता सुक्ष्‍म होवून जमिनीवर कोषावस्‍थेत जाण्‍यासाठी पडतात. कोषांमधून 9 ते 10 दिवसांनी भुंगे जमिनीतून निघतात. पावसाळ्यात जून ते ऑक्‍टोंबरपर्यंत भुंगे गाजर गवत फस्‍त करतात. भुंगे  आणि अळ्या फक्‍त गाजर गवतावरच जगतात. भुंगे व अळ्यांची गाजर गवत खाण्‍याची गती कमी असल्‍यामुळे आणि गाजर गवताची वाढ लवकर होत असल्‍यामुळे गाजर गवताचे ताबडतोब नियंत्रण दिसून येत नाही. परंतु अन्‍न साखळीतील घटक असल्‍यामुळे हे भुंगे महत्‍वाचे आहेत.
गाजर गवत उपलब्‍ध नसल्‍यास भुंगे जमिनीत सुप्‍तावस्‍थेत जातात. नोव्‍हेंबर नंतर भुंगे जमिनीत सात ते आठ महिने दडून बसतात आणि पुढील वर्षी पावसाळ्यात सुरुवातीच्‍या पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्‍यास सुरूवात करतात.
हे भुंगे एखाद्या वातावरणात, एखाद्या ठिकाणी स्थिर झाले की पुढच्‍यावर्षी पुन/पुन्‍हा भुंगे सोडण्‍याची गरज पडत नाही. गाजर गवताच्‍या उच्‍चाटनासाठी शेतात प्रति हेक्‍टरी 500 भुंगे सोडल्‍यास हे भुंगे स्थिर होवून गाजर गवताचे प्रभावी नियंत्रण करतात. शक्‍यतोवर मनुष्‍यप्राण्‍याचा अडथळा होणार नाही अशी जागा भुंगे सोडण्‍यासाठी निवडावी. झायगोग्रामामुळे मनुष्‍य प्राण्‍याला कोणताही त्रास होत नाही उलट उपद्रवी गाजर गवतावर झायगोग्रामा आपली उपजिविका करुन मनुष्‍य प्राण्‍यावर एक प्रकारे उपकारच करतात. प्रतिकुल परिस्थितीत सुध्‍दा झायगोग्रामामुळे गाजर गवताचे प्रभावी नियंत्रण पहावयास मिळते. झायगोग्रामा/ मेक्सिकन भुंगे हे परोपजीवी कीटक संशोधन योजना, कृषि कीटकशास्‍त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे ऑगष्‍ट ते ऑक्‍टोंबर पर्यंत विक्रीस उपलब्‍ध आहेत आणि याचा दर 1 रुपया प्रति भुंगा असा नाममात्र आहे.

सौजन्‍य
डॉ.अशोक जाधव 9821392192
डॉ.संजय पवार 
तण विज्ञान संशोधन केंद्र, परभणी
डॉ. धीरज कदम 9421621910
परोपजीवी कीटक संशोधन योजना, कृषि कीटकशास्‍त्र विभाग, परभणी



मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला‍ पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश ढगाळ राहील. औरंगाबाद जिल्‍हयात हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा तर बीड, उस्‍मानाबाद, लातुर, व परभणी जिल्‍हयात तुरळक ठिकाणी हलका पाउस पडेल. कमाल तापमान २८.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान १९.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ९.० ते १३.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५.० ते ८९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४९.० ते ६६.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश ढगाळ राहून औरंगाबाद जिल्‍हयात हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडेल.

एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजनाकृषि हवामानशास्‍त्र विभागव.ना.म.कृ.वि  परभणी यांचा शेतकरी बांधवांना सल्‍ला
  • पावसाचे अतिरीक्‍त पाणी पिकाबाहेर काढून द्यावे. खरीप ज्‍वारीचे पिकात बुरशीजन्‍य रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍याचे नियंत्रणासठी मॅंकोझेब २० ग्रॅम + स्‍टीकर १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • सोयाबीनचे पिकात पानेखाणा-या आळया उदा. उंटअळी, तंबाखुवरील पाने खाणारी अळी दिसून येत आहे. त्‍याच्‍या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २० मिली प्रति १० लिटर किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट ५ टक्‍के ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. चक्री भुंग्‍यांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास ट्रायझोफॉस ४ टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • पावसाचे अतिरीक्‍त पाणी पिकाबाहेर काढून द्यावे. वापसा येताच उसाची खांदणी करून बांधनी करावी. म्‍हणजे उसाचे पीक अधिकच्‍या पावसामुळे कोलमडणार नाही. 
  • बागायात/जीरायत कापूस पिकात तुडतुडे व पांढ-या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास त्‍याच्‍या नियंत्रणासाठी  अॅसिफेट ७५ टक्‍के २० ग्रॅम प्रति लिटर पाण्‍यात मिसळून पहिली फवारणी करावी. पहिली फवारणी केली असल्‍यास या किडीच्‍या नियंत्रणासाठी असिटामेप्रीड २० टक्‍के ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन दुसरी फवारणी करावी. किंवा थायामिथोक्‍झाम २५ टक्‍के ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.   
  • नविन लागवड केलेल्‍या आंबा बागेत पावसाचे साचलेले पाणी चर खोदून काढून टाकावे. कलम केलेल्‍या जागेवर बोर्डो मलम लावावा. प्रत्‍येक कलमास ५० ग्रॅम नत्राची मात्रा द्यावी.
  • पावसाचे पाणी साचले असल्‍यास चर खोदून पाणी बाहेर काढून द्यावे. मृगबाहार धरलेल्‍या बागेला नत्राचा दुसरा हप्‍ता प्रत्‍येक ५०० ग्रॅम प्रति झाड द्यावा. बुरशीजन्‍य रोगाचे नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण १ टक्‍के ची फवारणी करावी. नविन लागवड केलेल्‍या बागेस ट्रायकोडर्माची ड्रेचिंग १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन १/२ लिटर प्रति झाड करावी.
  • मिरची पिकात फुलकिंडयांच्‍या नित्रंणासाठी फिप्रोनिल ५ टक्‍के २० मिली किंवा स्पिनोसॅड ४५ टक्‍के ३ मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. व बुरशीजन्‍य रोगाच्‍या नियंत्रणासाठी कार्बेंडॅझीन १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • हिरवा चारा खाण्‍यात आल्‍यामुळे जनावरांना संडास लागण्‍याचे प्रमाण वाढलेले आहे. तरी अजारात वाळलेला कडबा/ शुष्‍क पदार्थाचा वापर करावा. तसेच संडास जास्‍त असल्‍यास सल्‍फा/ सिप्रोफलॉझॅसिन गोळी खाउ घालावी.
सौजन्य 


केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषी हवामान सल्‍ला सेवा योजना
कृषि हवामानशास्‍त्र विभाग, व.ना.म.कृ. परभणी 
पञक क्रमांकः ३४
दिनांकः १३.०८.२०१३

Wednesday, August 7, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्‍ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश पुर्णत ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २६.० ते ३०.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २०.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी १०.० ते १७.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४.० ते ९५.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४.० ते ८१.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश पुर्णतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.

एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना, कृषि हवामानशास्‍त्र विभाग, व.ना.म.कृ. परभणी यांचा शेतकरी बांधवांना सल्‍ला
  • खरीप ज्‍वारीचे पिकात बुरशीजन्‍य रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍याचे नियंत्रणासठी मॅंकोझेब २० ग्रॅम + स्‍टीकर १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • सोयाबीनचे पिकात पानेखाणा-या आळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍याच्‍या नियंत्रणासाठी इमामेक्‍टीन बेंझोएट ५ टक्‍के ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. चक्री भुंग्‍यांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास ट्रायझोफॉस ४ टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • बागायात/जीरायत कापूस पिकात तुडतुडे व पांढ-या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास त्‍याच्‍या नियंत्रणासाठी  अॅसिफेट ७५ टक्‍के २० ग्रॅम प्रति लिटर पाण्‍यात मिसळून पहिली फवारणी करावी. पहिली फवारणी केली असल्‍यास या किडीच्‍या नियंत्रणासाठी असिटामेप्रीड २० टक्‍के ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन दुसरी फवारणी करावी.
  • नविन लागवड केलेल्‍या आंबा बागेत पावसाचे साचलेले पाणी चर खोदून काढून टाकावे. कलम केलेल्‍या जागेवर बोर्डो मलम लावावा. प्रत्‍येक कलमास ५० ग्रॅम नत्राची मात्रा द्यावी.
  • पावसाचे पाणी साचले असल्‍यास चर खोदून पाणी बाहेर काढून द्यावे. मृगबाहार धरलेल्‍या बागेला नत्राचा दुसरा हप्‍ता प्रत्‍येक ५०० ग्रॅम प्रति झाड द्यावा. बुरशीजन्‍य रोगाचे नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण १ टक्‍के ची फवारणी करावी. नविन लागवड केलेल्‍या बागेस ट्रायकोडर्माची ड्रेचिंग १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन १/२ लिटर प्रति झाड करावी.
  • मिरची पिकात फुलकिंडयांच्‍या नित्रंणासाठी फिप्रोनिल ५ टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. व बुरशीजन्‍य रोगाच्‍या नियंत्रणासाठी कार्बेंडॅझीन १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • या वर्षी पर्जन्‍यामाण चांगले आहे. पाउस सरासरीपेक्षा जास्‍त पाउस पडत आहे. त्‍यामुळे शेतामधील सखल भागात जास्‍त पाणी साठुन पिके पिवळी पडत आहेत. त्‍यासाठी सखल भागातुन पाण्‍याचा योग्‍य प्रकारे निचरा होण्‍यासाठी पाणथळ भागातुन वर काढून पाणी बाहेर काढावे. 

सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
कृषि हवामानशास्‍त्र विभाग, व.ना.म.कृ. परभणी 

 पञक क्रमांकः ३३                                                        
दिनांकः ०६.०८.२०१३

Friday, August 2, 2013

कृषी हवामान सल्‍ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये आकाश ढगाळ राहील व दिनांक ०२/०८/२०१३ रोजी मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडेल व पुढील काळात पावसात घट होईल. कमाल तापमान २२.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान १८.० ते २२.० अंश सेल्‍सीअस राहील. वारे ताशी ८.० ते २१.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्‍य-पश्चिम दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४.० ते ९५.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२.० ते ९३.० टक्‍के राहील.

मराठवाडातील शेतकरी बांधवाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजनाच्‍या सल्‍ला पत्रिकेनुसार ृषि सल्‍ला

सोयाबीन - पावसाचे अतिरीक्‍त पाणी पिका बाहेर काढून द्यावे. वापसा येताच पाने खाणा-या अळीचा बंदोबस्‍तासाठी क्‍लोरोपायरीफॉस २० टक्‍के २० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा इमामेक्‍टीन बेन्‍झोएट ५ एसजी ३.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातून फवारणी करावी.

बाजरी - पावसाचे अतिरीक्‍त पाणी पिका बाहेर काढून द्यावे. वापसा येताच नत्राची दुसरी मात्रा दिली नसल्‍यास २० किलो हलक्‍या  जमीनीत तर ३० किलो भारी जमीनीत कोळपणी सोबत द्यावी.

मुग / उडीद - पावसाचे अतिरीक्‍त पाणी पिका बाहेर काढून द्यावे. वापसा येताच पाने खाणा-या अळीच्‍या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.

हळद /आले - पिकात पावसाचे पाणी साचले असल्‍यास पिकाबाहेर काढून द्यावे. वापसा येताच खुरपणी करून तण नियंत्रण करावे. कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसुन येत असल्‍यास ५ टक्‍के दानेदार क्विनॉलफॉस किंवा १० टक्‍के फोरेट २० किलो प्रति हेक्‍टर जमीनीतून द्यावे.

केळी - केळीचे पिकात पावसाचे पाणी साचुन रहाणार नाही यांची काळजी घ्‍यावी. वापसा येताच ५०० ग्रॅम युरीया प्रति झाड दिला नसल्‍यास देण्‍यात यावा.

डाळींब - डाळींब फळावरील ठिपके रोगाचे नियंत्रणासाठी कार्बंडाझिम १० ग्रॅम + १० मिली स्‍टीकर प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.

आंबा - नविन लागवड केलेल्‍या आंब्‍यामध्‍ये जागेवर मृदुकाष्‍ट कलम करावी. कलमीकरणासाठी परभणी हापूस, केशर, सिंध्‍दू या वाणांची कलम कांडयाचा वापर करावा.  

भाजीपाला पिकात पावसाचे पाणी साचुन राहणार नाही याची काळजी घ्‍यावी. वापसा येताच भाजीपाला पिकावरील करपा व पानावरील ठिपके रोगाचे नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी

या वर्षी आतापर्यंत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक झाले आहे. अधिकच्‍या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. त्‍यामुळे शेतक-यांनी शेतातील जास्‍तीचे पावसाचे पाणी योग्‍य प्रकारे शेताबाहेर काढून द्यावे. जेणेकरून शेतात जास्‍तीचे पाणी साठणार नाही व मातीची धुपही होणार नाही.

कृषी हवामान सल्‍ला पञिका
पञक क्रमांकः ३२ 
दिनांकः ०२/०८/२०१३

Wednesday, July 31, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्‍ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश पुर्णत: ढगाळ राहून औरंगबाद, बीड, उस्‍मानाबाद, परभणी, व हिंगोली जिल्‍हयात हलक्‍या स्‍वरूपाचा तर लातुर व नांदेड जिल्‍हयात हलका ते मध्‍यम तर तुरळक ठिकाणी भारी स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २६.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ११.० ते २०.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१.० ते ८९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५०.० ते ७७.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश पुर्णतः ढगाळ राहून औरंगबाद, बीड, उस्‍मानाबाद, परभणी, व हिंगोली जिल्‍हयात हलक्‍या स्‍वरूपाचा तर लातुर व नांदेड जिल्‍हयात हलका ते मध्‍यम तर तुरळक ठिकाणी भारी स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.

शेतकरी बांधवांना कृषि सल्‍ला 
  • खरीप ज्‍वारीचे पिकात कोळपणी करून तणाचे नियंत्रण करावे. खोडमाशीच्‍या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस ४० टक्‍के २० मिली + स्टिकर १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • सोयाबीनचे पिकात कोळपणी करावी. पाने खाणा-या अळयांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा क्‍लोरोपायरीफॉस २० टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी. पानवरील ठिपके रोगाचे नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड -२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी.
  • साचे पिकात वापसा येताच खंदणी करून पिकास मातीची भर द्यावी.(बांधनी करावी).
  • बागायात / जीरायत कापूस पिकास तुडतुडे व फुलकिडयांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍यांच्‍या नियंत्रणसाठी अॅसिफेट ७५ टक्‍के/फिप्रोनील ७५ टक्‍के २० मिली किंवा डायमिथोएट ३० टक्‍के, १० मिली किंवा असिटामेप्रीड २० टक्‍के २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. पानावरील ठिपके रोगाच्‍या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी.
  • पावसाचे पाणी आळयातून बाहेर काढून द्यावे. मृगबाहार धरलेल्‍या शेतक-यांनी संत्रा मोसंबी पिकास ५०० ग्रॅम युरीया प्रति झाड आळयातून द्यावा.
  • पेरूवरील देवी रोग व फळमाशीच्‍या नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम + मॅंकोझेब (१० ग्रॅम + २० ग्रॅम) + ५० टक्‍के कार्बोरील २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • भाजीपाला पिकावरील करपा, पानावरील ठिपके व केवडा रोगाचे नियंत्रणासाठी मॅंकोझेब किंवा कॉपर अझीक्‍लोराईड २५ ग्रॅम + ट्रायडेमॉर्क १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • या वर्षी पाउस समाधानकारक आहे. काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्‍त पाउस पडत आहे. जास्‍त पाउसामुळे पिके पिवळी पडली आहेत. त्‍यामुळे शेतक-यांनी शेतीतील जास्‍तीचे पाणी योग्‍य प्रकारे शेताबाहेर काढुन द्यावे. जेणेकरून शेतात जास्‍तीचे पाणी साठणार नाही व मातीची धुपही होणार नाही.


सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक ृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः ३१                                              
दिनांकः ३०.०७.२०१३


Monday, July 29, 2013

वृक्षारोपन व संवर्धन काळाची गरज : डॉ. जे. व्‍ही. एकाळे

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील कापूस संशोधन योजना आणि पिक पध्‍दतीच्‍या कृषिकन्‍यांनी परभणी जिल्‍ह्यातील मुरुंबा येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला होता.  
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्री गोपीनाथराव झाडे, विशेष अतिथी म्‍हणुन शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती कोयाळकर, कृषि सहाय्यक श्री दिपक नगोरे, ग्रामसेवक श्रीमती होनमाने, कृषितज्ञ कुलकर्णीसर, प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. जे. व्‍ही. एकाळे, डॉ. शेखनुर, समर्थ कारेगांवकर, श्री स्‍वामी, शाळेतील शिक्षकवृंद व समस्‍थ ग्रामस्‍थ मंडळी उपस्थित होते.
    ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे अंतर्गत वृक्षारोपनाचा कार्यक्रम सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्‍या सूचनेनुसार आणि विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख तथा समन्‍वयक डॉ. बि. एम. ठोंबरे व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम प्रभारी  डॉ. राजेश कदम यांच्‍या मार्गदर्शनाने घेण्‍यात आला.
यावेळी डॉ. एकाळे यांनी वृक्षारोपनाचे महत्‍व विषद केले तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिकन्‍यांनी ग्रामीण लोकजीवन व समाज‍जीवनाचा अभ्‍यास करावा, विद्यापीठातील तंत्रज्ञानाचे शेतकरी व ग्रामीण महीलापर्यंत नेण्‍याच्‍या प्रयत्‍न करावा तसेच गावक-यांनीही विद्यापीठाची ज्ञानाची गंगा दारात आली आहे, तरी याचा पुरेपुर फायदा करुन घ्‍यावा असा सल्‍ला त्‍यांनी दिला. वृक्षारोपन व संवंर्धन हि काळाची गरज आहे व त्‍या दृष्‍टीकोनातुन विचार करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्‍यांनी  केले.
जिल्‍हा परिषद शाळेतील शिक्षक श्री स्‍वामी ह्यांनी शिक्षणाचे तसेच पर्यावरणासोबतच वृक्षरोपणाचे महत्‍व विषद केले. कृषि तज्ञ श्री कुलकर्णी यांनी  एक मुल एक झाड असे झाले तरच उद्याचा भारत उज्‍वल होईल आणि संपन्‍न, सुजलाम सुफलाम होईल, असे नमूद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अश्विनी पंचांगे यांनी केले.  कोमल शिंदे, संगीता थिटे, पल्‍लवी पाटील, सविता झाटे, शितल उफाडे, प्रियांका खटींग, शितल लोनसणे, शुभांगी यादव, कांचन क्षिरसागर, अपर्णा काळदाते, निशा खंदारे, आमरीन कादरी, भाग्यश्री फड यांनी वृक्षारोपन कार्यक्रम घेण्‍यासाठी परिश्रम घेतले. डॉ. कारले, डॉ. नारखेडे व डॉ. मंत्री यांच्‍या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यात आला.

Saturday, July 27, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २६.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारे ताशी १२.० ते २२.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्‍य-पश्चिम दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३.० ते ९६.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५.० ते ७९.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.


कृषि सल्‍ला 
  • सोयाबीन - वापसा येताच कोळपणी करून तण नियंत्रण करावे. पानेखाणा-या आळयांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा क्‍लोरोपायरीफॉस २० टक्‍के २० मिली किंवा इमामेक्टिन बेन्‍झोएट ५ एस.जी.३.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातून फवारणी करावी. चक्री भुंग्‍याचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास डायमेथेएट ३० टक्‍के १० मिली किंवा ट्रायझोफॉस ४० ई.सी १६ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्‍के प्रवाही २५ मिली प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी.  
  • कापूस - वापसा येताच कोळपणी करावी व कोळपणी सोबत नत्राची दुसरी मात्रा हलक्‍या जमीनी २० किलो तर भारी जमीनी ३० किलो प्रति हेक्‍टर द्यावी.
  • केळीचे बागेत पाणी साचुन रहाणार नाही यांची काळजी घ्‍यावी. जुनमध्‍ये लागवड केलेल्‍या केळीचे पिकास ५०० ग्रॅम युरीया प्रति झाड दिला नसल्‍यास देण्‍यात यावा .बागेतील पावसाचे पाणी साचुन राहणार नाही याची काळजी घ्‍यावी. वापसा येताच खुरपणी करून तण नियंत्रण करावे. 
  • डाळींबाचे रोपे तयार करावयाची असल्‍यास झाडावर गुटी कलम करावी. बागेत पावसाचे पाणी साचुन रहाणार नाही याची काळजी घ्‍यावी. नविन लागवड केलेल्‍या कलमांचे खुंटावरील फुट काढून टाकावी. कलमांना काठीचा आधार द्यावा.
  • नविन लागवड केलेल्‍या आंब्‍यामध्‍ये जागेवर मृदुकाष्‍ट कलम करावी. कलमीकरणासाठी परभणी हापूस, केशर, सिंध्‍दू या वाणांची कलम कांडयाचा वापर करावा.  
  • मिरची, वांगे, व टोमॅटो ची पुनर लागवड सरी वरंब्‍यावर करावी. लागवडी पुर्वी रोप बॅविस्‍टीनच्‍या १ टक्‍के द्रावणात बुडवुन घ्‍यावीत. भेंडी, गवार व चवळी या भाजीपाला पिकांची लागवड करावी.
  • पावसाचे अतिरीक्‍त पाणी वाहून नेण्‍यासाठी शेताच्‍या बाजुला गवताचे चर असतात. गवताच्‍या चरांची त्‍वरित दुरूस्‍ती करून द्यावी. चर फुटला असेल तर त्‍याची डागडूगी करून घ्‍यावी. जास्‍त गवत वाढले असेल तर ते कमी करून घ्‍यावे. गवताचा चरातून पुर्णपणे गवत काढून घेउ नये. अन्‍यथा गवताच्‍या चराचीच धूप होउन जाईल. पावसाचे अतिरिक्‍त पाणी गवताच्‍या चरातून सहजपणे वाहून गेल्‍यामुळे शेतातील मातीची धूप आपण रोखू शकतो.
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषिहवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः ३०                                       
दिनांकः २६/०७/२०१३