Thursday, March 27, 2014

राष्ट्रिय सेवा योजनेचे विशेष शिबीरातंर्गत रक्‍तदान शिबीराचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या राष्ट्रिय सेवा योजनेचे विशेष शिबीरातंर्गत रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते त्‍याप्रसंगी प्राचार्य डॉ उदय खोडके, श्री. दिवाकर काकडेप्रा. रविंद्र शिंदे, प्रा. विजय जाधव, प्रा. अनिश कांबळे व प्रा. सोळंके, प्रा. गुळभिळे आदी.
............................................................

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या राष्ट्रिय सेवा योजनेचे विशेष शिबीरातंर्गत रक्‍तदान शिबीराचे आयोजन दिनांक 24 मार्च रोजी करण्‍यात आले होते. या रक्‍तदान शिबीराचे उदघाटन कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ उदय खोडके यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना डॉ उदय खोडके म्‍हणाले की, राष्ट्रिय सेवा योजनामुळे स्‍वयंसेवकांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाची जडणघडण व पायाभरणी होत असते. समाजोपयोगी अनेक कार्यामध्‍ये युवकांना कर्तव्‍याची जाणीव म्‍हणुन रक्‍तदान शिबीरात सहभाग महत्‍वाचा आहे. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालायातील रक्‍तपिढी विभागातील श्री. देशमुख यांनी एका व्‍यक्तिच्‍या रक्‍तदानातून चार व्‍यक्तिंचे जीवन वाचवता येऊ शकतात असे सांगीतले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र शिंदे, प्रा. विजय जाधव, प्रा. अनिश कांबळे व प्रा. सोळंके यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवक दिनेश जगताप, मयुरी काळे, सचिन नावकर, उमेश राजपूत, योगेश निलवर्ण, स्‍नेहा कदम, अभय भालेराव आदींनी परिश्रम घेतले.

Wednesday, March 26, 2014

महाराष्‍ट्रातील गारपीटग्रस्‍त शेतक-यांच्‍या मदतीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचा-या तर्फे एक दिवसाचे वेतन

      महाराष्‍ट्रात झालेल्‍या अवकाळी पावसाने व गारपीटीने शेतक-यांचे जवळपास 15 लाख हेक्‍टर जमीनीवरील उभी पिके, फळबागा तसेच जनावरे व घरे यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्‍यांच्‍या मदतीला थोडासा हातभार लागावा व शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे ह्या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कर्मचारी संघाने एक दिवसाचे वेतन देण्‍याचा निर्णय बैठकीत घेण्‍यात आला. बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मकृवि कर्मचारी संघाचे अध्‍यक्ष प्रा. दिलीप मोरे हे होते तर उपाध्‍यक्ष श्री प्रदीप कदम, जि. बी. शिंदे, सरचिटणीस डी. टी. पवार, सहसचिव एकनाथराव कदम, प्रा. रमेश देशमुख, प्रा. जनार्धन कातकडे, श्री कृष्‍णा जावळे, सुभाष जगताप, पी. जी. जाधव, श्रीराम घागरमाळे, मधुकर ढगे, प्रा. भानुदास पाटील आदी कार्यकारणी सदस्‍य उपस्थित होते.
      मकृवि कर्मचारी संघाचे शिष्‍टमंडळ अध्‍यक्ष प्रा. दिलीप मोरे ह्यांच्‍या उपस्थितीत विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेशरलु यांची भेट घेऊन एक दिवसाचे वेतन कपात करुन मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस धनादेश देण्‍यात यावे, ही विनंती निवेदनाद्वारे करण्‍यात आली. मा.कुलगुरु यांनी ह्या उपक्रमाबाबत सर्व कर्मचा-यांचे अभिनंदन केले. 

शेतक-यांच्‍या दृष्‍टीने उपयुक्‍त तंत्रज्ञानाचा प्रात्‍यक्षिकात समावेश करावा.... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

दोन दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु. 
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्‍प संचालक डॉ. एन. सुधाकर. 
*******************************************
कृषि विज्ञान केंद्राने विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानासोबतच या भागातील शेतक-यांच्‍या दृष्‍टीने उपयुक्‍त व अनुकूल देशात ईतरत्र उपलब्‍ध असलेल्‍या तंत्रज्ञानाचे प्रात्‍यक्षिकात समावेश करून त्‍याचा प्रसार करावा, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने आयोजित दोन दिवशीय (दिनांक 25 व 26 मार्च रोजी) कार्यशाळेच्‍या उद्घाटन ते प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्‍हणुन हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्‍प संचालक डॉ. एन. सुधाकर हे उपस्थित होते तर मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. के. दत्‍तात्री, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाडा विभागात एकरा कृषि विज्ञान केंद्राच्‍या 2014-15 साठीच्‍या वार्षिक कृती आराखडा निश्चित करण्‍यासाठी हया कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.
मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या विद्यापीठाकडुन अनेक अपेक्षा असुन त्‍यापुर्ण करण्‍याची जबाबदारी प्रत्‍येकाची आहे. नैसर्गीक संकटाचा सामाना करण्‍यासाठी शेतक-यांना शास्‍त्राज्ञांनी मार्गदर्शन करावे. शेतक-यांपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसारासाठी एसएमएस व मोबाईल सेवांचा वापर करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी दिला.
विभागीय प्रकल्‍प संचालक डॉ. एन. सुधाकर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, कृषि विज्ञान केंद्राची विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचे शेतक-यांच्‍या शेतावर प्रात्‍यक्षिक घेऊन शेतक-यांच्‍या परिस्थितीनुसार त्‍यात बदल करण्‍याची महत्‍वाची भुमिका पार पाडत आहे, त्‍याचबरोबर ग्रामीण युवकांसाठी कृषी संलग्‍न उद्योग उभे करण्‍यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे.
प्रास्‍ताविकात डॉ. अशोक ढवण यांनी कृषि विस्‍तारात कृषि विज्ञान केंद्राची भुमिका विशद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ. राकेश आहिरे यांनी केले. या कार्यशाळेत मराठवाडा विभागातील अकरा कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक व विषय तज्ञासह विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व अधिकारी सहभागी झाले आहेत. 

परिपुर्ण व्‍यक्‍ती घडविण्‍याचे कार्य कृषि महाविद्यालय करित आहे...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांना निरोप
कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांसोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू, डॉ. विश्‍वास शिंदे, डॉ. डि.बी. देवसरकर, डॉ. बी.बी.भोसले, डॉ. विलास पाटील आदी.
निरोप समारंभात मार्गदर्शन करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक  डॉ. विश्‍वास शिंदेडॉ. डि. बी. देवसरकरडॉ. बी. बी. भोसलेडॉ. विलास पाटील आदी.
कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांसोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू, डॉ. विश्‍वास शिंदे, डॉ. डि.बी. देवसरकर, डॉ. बी.बी.भोसले, डॉ. विलास पाटील आदी.
**********************************
करियर व रोजगार संधीच्‍या दृष्टिने वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाच्‍या तुलनेत कृषि शिक्षण कोठेही कमी नसुन परिपुर्ण व्‍यक्‍ती घडविण्‍याचे कार्य कृषि महाविद्यालय करीत आहेत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या जिमखानाच्‍या वतीने दि. 25 मार्च रोजी आयोजित अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या निरोप समारंभाच्‍या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे होते तर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, निम्‍न शिक्षणाचे संचालक डॉ. डी. बी. देवसरकर व जिमखानाचे उपाध्‍यक्ष डॉ. विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि पदवीधरांना सध्‍या मोठया संधी उपलब्‍ध होत असुन विद्यापीठात मोठया कंपन्‍या परिसर मुलाखती मार्फत मोठया प्रमाणात विद्यार्थ्‍यांना नौकरीच्‍या संधी प्राप्‍त करून देत आहेत. देशात पातळीवरील कनिष्‍ठ संशोधन फेलोशीप परिक्षेतील विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांच्‍या यशाचे प्रमाण वाढविण्‍यासाठी अधिक प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे म्‍हणाले की, शेती क्षेत्रापुढे अनेक आव्‍हाने आहेत, या क्षेत्रात कृषि पदवीधरांनी अधिकाधिक योगदान देणे गरजेचे आहे. कृषि शिक्षण हे कला, विज्ञान व अभियांत्रिकी ज्ञानाचा संगम असुन जीवन जगण्‍यासाठी आवश्‍यक गोष्‍टी महाविद्यालयात विद्यार्थ्‍यांना शिकायला मिळतात, त्‍याचा उपयोग विद्यार्थ्‍यीनी करावा.
सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, महाविद्यालय हे ज्ञान मंदिर असुन त्‍यांचे पावित्र्य  विद्यार्थ्‍यानी जपले पाहिजे. कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी कोणत्‍याही क्षेत्रात कार्य क‍रीत असले तरी विद्यापीठाशी असलेली नाळ तोडत नाहीत. महाविद्यालयीन चार वर्षे हे आयुष्‍याला वळण देणारी असतात. जिमखाना उपाध्‍याक्ष डॉ विलास पाटील म्‍हणाले की, महाविद्यालय तर्फे आयोजित विविध व्‍यक्‍तीमत्‍व विकासाच्‍या उपक्रमाचा विद्यार्थ्‍यां मोठा फायदा होतांना दिसत असुन प्रत्‍येक क्षेत्रात कृषि पदवीधर यशस्‍वीरिता कार्य करित आहे.
कार्यक्रमात अंतिम सत्राचे विद्यार्थ्‍यी तुकाराम मंत्री, गजानन मोंगल, ज्‍योती खुपसे आदींनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण तिडके, नितीन थोरात, गौरी दिक्षित व प्रिती भालेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सहाव्‍या सत्राच्‍या‍ विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

निरोप समारंभात मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे

Tuesday, March 25, 2014

एल पी पी स्‍कुलच्‍या विद्यार्थ्‍यांचा पाचवा दिक्षांत समारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागातील एल पी पी स्‍कुलच्‍या ब्रिज सेक्‍शनच्‍या विद्यार्थ्‍यांचा पाचवा दिक्षांत समारंभ दि 27 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता महाविद्यालयाच्‍या सभागृहात आयोजीत केला आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार असुन शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे व महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

Monday, March 24, 2014

गारपिटग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वगभुमीवर औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी-शास्त्रज्ञ संवादाचे आयोजन


औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात दिनांक 23 मार्च रोजी गारपिटग्रस्‍त परिस्थितीच्‍या पार्श्‍वभुमीवर शेतकरी-शास्‍त्रज्ञ संवादाचे आयोजन करण्‍यात आले होते. संवाद कार्यक्रमाचे उद् घाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु याच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. श्री. एच. एम. देसरडा, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विद्यापीठाचे माजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. गोविंद जाधव, उपविभागीय कृषि अधिकारी उदय देवळाणकर व आत्‍माचे श्री. सतिष शिरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, देशात गतवर्षी पाऊस ब-यापैकी पडला, परंतु पडणारे पाणी अडविण्‍यासाठी विशेष लक्ष देण्‍याची गरज आहे. राजस्‍थानसारख्‍या राज्‍यात काही भागात खुप कमी पाऊस पडतो, परंतु तेथील शेतकरी कधीच खचुन जात नाही, तंत्रज्ञानाच्‍या जोडीने सुधारीत शेतीची कास त्‍यांनी धरली आहे. गारपीटग्रस्‍तांना दिलासा देण्‍याचा कार्य विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञांमार्फत सुरू असुन गार‍पीटग्रस्‍त शेतक-यांनी खंबीरपणाने उभे राहिले पाहिजे. नैसर्गिक आपत्‍तीचा अंदाज करणे शक्‍य नाही, शेतकरी जोखीम घेऊन शेती करतात, त्‍याप्रमाणे अधिक उत्‍पादनाची रास्‍त अपेक्षा त्‍यांची असते. परंतु काही नैसर्गिक आपत्‍तीमुळे उत्‍पादनात घट झाल्‍यास आत्‍महत्‍यासारख्‍या मार्गांचा अवलंब करू नये. कोणतीही आपत्‍तीही नवीन काही शिकवित असते, संध्‍याकाळ नंतर पहाट उगवतेच. विद्यापीठ हवामान बदलाचा विचार करून पीक पध्‍दतीवर व तंत्रज्ञान संशोधनावर अधिक भर देणार आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अर्थतज्ञ प्रा. एच. एम. देसरडा म्‍हणाले की, सकळ राष्‍ट्रीय उत्‍पादनात शेतक-यांचा लाभाचा हिस्‍सा केवळ 10 टक्‍केच असुन शेतक-यांची आर्थिक स्थिती दयनीय आहे. शेती विकासात अधिक गुंतवणुक करणे गरजेचे आहे.
माजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. गोंविद जाधव म्‍हणाले की, आजच्‍या परिस्थितीत शेती संबंधी मिळणा-या सुविधांचा व योजनांचा शेतक-यांना त्‍वरीत लाभ मिळवुन देणे अत्‍यंत गरजेचे आहे. शेतकरी कुटुंब प्रामुख्‍याने अशा वेगळया मार्गाने जाऊन जीवन संपविणे हे कुटुंबाच्‍या दृष्‍टीने खुप घातक असुन अशा संकटाच्‍या वेळी कुटुंबातील सर्व सदस्‍याने एकमेकांशी सूसंवाद केला पाहिजे.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, गार‍पीटीमुळे मराठवाडयातील शेतक-यांचे भरून न काढता येणारे अतोनात नुकसान झाले असुन शेतक-यांनी या संकटाला न घाबरता मोठया धैर्याने तोंड दयावे. या आपत्‍कालीन परिस्थितीत सर्वांनी एकत्र येवुन मुकाबला केला पाहीजे.
कार्यक्रमात सध्‍याच्‍या परिस्थितीत मोसंबी, आंबा, डाळींब, द्राक्ष आदी फळपिकांच्‍या संगोपनाविषयी बदनापुर मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी पाटील व औरंगाबाद फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ टी बी तांबे यांनी उपस्थितीत शेतक-यांना विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ. राकेश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ एस बी पवार यांनी केले. यावेळी उपस्थित शेतक-यांनी कुलगुरू व शास्‍त्रज्ञांनी संवाद साधला. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.