कृषि महाविद्यालयाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना निरोप
**********************************
करियर व रोजगार
संधीच्या दृष्टिने वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाच्या तुलनेत कृषि शिक्षण
कोठेही कमी नसुन परिपुर्ण व्यक्ती घडविण्याचे कार्य कृषि महाविद्यालय करीत आहेत,
असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांनी केले. विद्यापीठातंर्गत असलेल्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या जिमखानाच्या
वतीने दि. 25 मार्च रोजी आयोजित अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या निरोप
समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण
संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वास शिंदे होते तर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी
अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, निम्न शिक्षणाचे संचालक डॉ. डी. बी.
देवसरकर व जिमखानाचे उपाध्यक्ष डॉ. विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, कृषि पदवीधरांना सध्या मोठया संधी
उपलब्ध होत असुन विद्यापीठात मोठया कंपन्या
परिसर मुलाखती मार्फत मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांना नौकरीच्या संधी प्राप्त
करून देत आहेत. देशात पातळीवरील कनिष्ठ संशोधन फेलोशीप परिक्षेतील विद्यापीठातील
विद्यार्थ्यांच्या यशाचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील, असे
प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय
भाषणात शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे म्हणाले की, शेती
क्षेत्रापुढे अनेक आव्हाने आहेत, या क्षेत्रात कृषि पदवीधरांनी अधिकाधिक योगदान
देणे गरजेचे आहे. कृषि शिक्षण हे कला, विज्ञान व अभियांत्रिकी ज्ञानाचा संगम असुन
जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात,
त्याचा उपयोग विद्यार्थ्यीनी करावा.
सहयोगी
अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले आपल्या भाषणात म्हणाले की,
महाविद्यालय हे ज्ञान मंदिर असुन त्यांचे पावित्र्य विद्यार्थ्यानी जपले पाहिजे. कृषि
महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असले तरी
विद्यापीठाशी असलेली नाळ तोडत नाहीत. महाविद्यालयीन चार वर्षे हे आयुष्याला वळण
देणारी असतात. जिमखाना उपाध्याक्ष डॉ विलास पाटील म्हणाले की, महाविद्यालय तर्फे
आयोजित विविध व्यक्तीमत्व विकासाच्या उपक्रमाचा विद्यार्थ्यां मोठा फायदा
होतांना दिसत असुन प्रत्येक क्षेत्रात कृषि पदवीधर यशस्वीरिता कार्य करित आहे.
कार्यक्रमात
अंतिम सत्राचे विद्यार्थ्यी तुकाराम मंत्री, गजानन मोंगल, ज्योती खुपसे आदींनी
मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण तिडके, नितीन थोरात, गौरी
दिक्षित व प्रिती भालेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाव्या सत्राच्या
विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक वर्ग,
कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.
निरोप समारंभात मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे |