Thursday, September 10, 2015

वनामकृवित रबी पीक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती दिनानिमित्‍त दि १७ सप्‍टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता रबी पीक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले असुन मेळाव्‍याचे उद्घाटन परिवहन मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री मा ना श्री दिवाकररावजी रावते यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा ना डॉ राम खर्चे यांची उपस्थिती लाभणार असुन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे अध्‍यक्षस्‍थानी राहणार आहेत. संसद सदस्‍य मा श्री संजय जाधव, विधानषरिषद सदस्‍य मा श्री सतीश चव्‍हाण, विधानषरिषद सदस्‍य मा श्री विक्रम काळे, विधानषरिषद सदस्‍य मा श्री अब्‍दुल खान दुर्राणी (बाबाजानी), विधानपरिषद सदस्‍य मा श्री रामराव वडकुते, परभणी विधानसभा सदस्‍य मा डॉ राहुल पाटील, जिंतुर विधानसभा सदस्‍य मा श्री विजय भांबळे, गंगाखेड विधानसभा सदस्‍य मा डॉ मधुसुदन केंद्रे पाथरी विधानसभा सदस्‍य मा श्री मोहन फड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ रबी पिकांबद्दल शेतक-यांना मार्गदर्शन करणार असुन सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीस जास्‍त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ साहेबराव दिवेकर व मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले आहे. 
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात दुष्‍काळी परिस्थितीतील चारा पीक व्‍यवस्‍थापनावर डॉ बी बी ठोंबरे, सद्यस्थितीत खरीप व रब्‍बी पिकांवरील किंडीचे व्‍यवस्थापनावर डॉ बी बी भोसले व डॉ पी आर झंवर, कापुस व तुर, रब्‍बी पिकां‍वरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ ए पी सुर्यवंशी, रब्बी ज्‍वार लागवडीवर प्रा एस एस सोळंके, हरभरा लागवडीवर डॉ डि के पाटील, करडई लागवडीवर डॉ एस बी घुगे तसेच आपत्‍कालीन परिस्थितीतील पीक नियोजनावर डॉ बी व्‍ही आसेवार व बीबीएफ यंत्राचा सुयोग्‍य वापरावर प्रा पी ए मुंढे मार्गदर्शन करणार आहेत.

बीटी कापुस व सोयाबीन पिकावर अळयांचा प्रादुर्भाव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी नुकतेच मराठवाड्यातील विविध पिकांच्‍या केलेल्‍या सर्वेक्षणानुसार कपाशीवर ब­याच ठिकाणी हिरवी बोंडअळी व तंबाखुवरील पाने खाणा­या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन ब­याच भागातून सोयाबीन पिकाला शेंगा न लागण्‍याच्‍या अशा तक्रारी येत आहेत. तसेच ज्वारीवर कणसातील अळया, मका, बाजरी इत्यादी पिकांवर देखील हिरव्या बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळून आला.
किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे
पावसाचा मोठा खंड, बदलते हवामान, ढगाळ वातावरण, प्रकाशाचे कमी तास, पर्यायी खाद्य वनस्पतीचा अभाव, बीटी कपाशीची लागवड करते वेळेस सोबतचे नॉन बीटी ची लागवड न करणे तसेच नैसर्गिक मित्रकिडींचा ­हास होणे. एकात्मीक किड व्यवस्थापनाचा अवलंब न करणे आदींचा बाबी आढळून आल्या.
नुकसानीचा प्रकार
या अळया कपाशीचे पाते, कोवळी शेंडे, कळ्या, फुले यावर उपजीवीका करतात व बोंड सडतात लागल्यानंतर त्यामध्ये तोंड खुपसुन आतील भाग खातात, त्यामुळे लहान बोंडे, पाते, फुले, कळ्या गळून पडतात किंवा झाडावरच्या अळ्यांनी केलेल्या छिद्रामधून पाणी जाऊन जिवाणू व बुरशीची वाढ होऊन बोंडे सडतात. तसेच बीटी तंत्रज्ञान हे मुख्यता बोंडअळयासाठीच विकसीत केलेले असले तरीही पोषक वातावरण असल्यास बीटी कपाशीवर देखील बोंडअळयाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच या अळया सोयाबीनची फुले, कळया, शेंगा खाऊन फस्त करत आहेत. त्यामुळे झाडाला फुले किंवा शेगा न लागल्या सारख्या तक्रारी येत आहेत. या अळया झाडाच्या मुख्य खोडावर तसेच फांद्यावरील फुले, शेंगा खात आहेत. विशेषत: स्पोडोप्टेराच्या अळया दिवसा जमिनीवर किंवा पानाखाली लपून राहतात. 
हिरवी बोंडअळी व तंबाखुवरील पानेखाणा­या अळीच्या व्यवस्थापनासाठी पुढील उपाय योजना कराव्‍यात
1. शेतामध्ये प्रती हेक्टरी पाच कांमगंध सापळे या प्रमाणात लावावेत.
2. जैविक कीटकनाशके एसएलएनपीव्ही (तंबाखुवरील पाणे खाणा­या अळीसाठी) एचअेएनपीव्ही (अमेरीकन बोंडअळीसाठी) 250 एल ई 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात अळया लहान असताना फवारणी करावी.
3. जर प्रादुर्भाव 5 टक्यापेक्षा जास्त असल्यास रासायनिक किटकनाशकामध्ये लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 8 मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट 5 एस जी 4 ग्रॅम किंवा इन्डोक्झाकार्ब 14.5 एससी 10 मिली किंवा स्पिनोसॅड 45 एससी 4 मिली किंवा नोव्हाल्युरॉन 10 ईसी 20 मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी 2.5 मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी 3 मिली यापैकी एक किटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेट्रोलपंपासाठी वरील किटकनाशकाची मात्रा तीन पट वापरावी. त्याच बरोबर भविष्यात तुरीवर देखील फुलोरा अवस्थेत या अळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
            अशाप्रकारे कपाशीवरील बोंडअळी व तंबाकूवरील पाने खाणा­या अळीचे वेळीच व्यवस्थापन करुन संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर व डॉ. ए. जी. बडगुजर यांनी केले आहे.

Monday, August 31, 2015

गुणवंत विद्यार्थ्‍यांचा कृषि शिक्षणाकडे वाढत ओढा.....माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी

परभणी येथील कृषि महाविद्यालयात पदवीच्‍या नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत तथा समुपदेशन कार्यक्रम संपन्‍न

मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी, व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ एस बी वराडे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ विलास पाटील, डॉ डि बी देवसरकर आदी. 
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी, डॉ एस बी वराडे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ विलास पाटील, डॉ डि बी देवसरकर आदी. 
******************
देशात पहिली हरितक्रांतीही कृषि तंत्रज्ञानाच्‍या जोरावर झाली, आता कोरडवाहु शेती केंद्रबिंदु म्‍हणुन दुस-या हरितक्रांतीची गरज असुन त्‍यात कृषि शास्‍त्रज्ञांचे योगदान महत्‍वाचे राहणार आहे. कृषि शिक्षणाकडे आज विद्यार्थ्‍यांचा ओढा वाढत असुन गुणवंताचाही त्‍यात वाटा आहे, ही चांगली बाब आहे, असे प्रतिपादन कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष तथा माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयात पदवीच्‍या नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत तथा समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन दि ३१ ऑगस्‍ट रोजी करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते व्‍यासपीठावर वाल्‍मीचे माजी संचालक डॉ एस बी वराडे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील, निम्‍नस्‍तर शिक्षणाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा डॉ चारूदत्‍त मायी पुढे म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍याना स्‍वताचा विकास साधावयाचा असेल तर स्‍वयं अध्‍यायन करावे लागेल. परभणी येथील महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी राज्‍याच नव्‍हे तर देश पातळीवर विविध पदावर कार्य करीत असुन नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयात प्रवेश म्‍हणजेच मोठी संधी असुन त्‍यांचे सोने करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कृषि क्षेत्राचा व शेतक-यांचा विकास हे ध्‍येय ठेवुन विद्यार्थ्‍यांनी कृषि महाविद्यालयात शिक्षण घ्‍यावे. जगातील मोठे ज्ञानभांडार हे इंग्रजी माध्‍यमात उपलब्‍ध असल्‍यामुळे मराठवाडयातील विद्यार्थींनी इंग्रजी भाषा चांगल्‍या प्रकारे अवगत करावी, असा सल्‍ला त्‍यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांना दिला.
विद्यार्थ्‍यांनी स्‍वत:च्‍या जीवनाचे स्‍वत:च शिल्‍पकार बनण्‍याचा सल्‍ला वाल्‍मीचे माजी संचालक डॉ एस बी वराडे आपल्‍या मार्गदर्शनात दिला तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयीन शैक्षणिक कालावधीत जास्‍तीत जास्‍त ज्ञान प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करावेत, असे सां‍गितले. याप्रसंगी कुलसचिव डॉ दिनकर जाधव व जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.   
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी महाविद्यालयाच्‍या जडणघडणीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण व प्रा एस एल बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाच्‍या विविध विभाग व उपक्रमाची माहिती चत्रफितीव्‍दारे सादर करण्‍यात आली तसेच विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत डॉ एन जे लाड, डॉ जे पी जगताप, डॉ जयेश देशमुख, प्रा अनिस कांबळे आदींनी विद्यार्थ्‍यांचे समुपदेशन केले तर नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयात नुतन विद्यार्थ्‍यी, त्‍यांचे पालक, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृवि तर्फे शेतकरी दिनाचे धानोरा (काळे) येथे आयोजन


सहकारमुर्ती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जन्‍मदिवसाचे औचित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्रातर्फे पुर्णा तालुक्‍यातील मौजे धानोरा (काळे) येथे शेतकरी दिनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी विद्यापीठाचे संचालक विस्‍तार शिक्षण डॉ. बी. बी. भोसले, विदयापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. रविंद्र पतंगे, कृषिविद्यावेत्‍ता डॉ. एस. एस. सोळंके, वनस्‍पती विकृतीशास्‍त्रज्ञ डॉ. डी. डी. निर्मळ, किटकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत, सरपंच गणेशराव काळे, तंटामुक्‍ती अध्‍यक्ष शिवाजीराव काळे, प्रतिष्‍ठीत नागरिक ज्ञानोबा काळे, राम काळे, प्रयोगशील शेतकरी प्रताप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, शेतक­यांनी कमी खर्चाचे तंत्रज्ञान अवगत करावे व दुष्‍काळी परिस्थितीत पिकांचे नियोजन करावे. कीड व्‍यवस्‍थापन करतांना शिफारस केलेल्‍या व योग्‍य मात्रेतच किटकनाशकचा वापर करण्‍याचा सल्‍ला देऊन त्‍यांनी कपाशी, सोयाबीन, तुरी पिकांवरील किड व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री. रविंद्र पतंगे यांनी शेतक­यांना विद्यापीठाच्‍या विविध तंत्रज्ञानाचा व सेवेचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले. कृषिविद्यावेत्‍ता डॉ. एस. एस. सोळंके यांनी रब्‍बी हंगामाचे व पाण्‍याचे नियोजन तर शास्‍त्रज्ञ डॉ. डि डि निर्मळ यांनी कपाशी व हळदी वरील रोग यांच्‍या व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतक­यांनी कपाशीचे, हळदीचे व मोसंबीचे किड व रोगग्रस्‍त नमुन्‍याचे पाहणी शास्‍त्रज्ञांनी करून मार्गदर्शन केले.
यावेळी दुष्‍काळी परिस्थितीत कमी पाण्‍यात भाजीपाला पिकांचे चांगले अधिक उत्‍पन्‍न मिळवल्‍याबद्दल प्रगतशील गोविंद काळे, परमेश्‍वर काळेकैलास काळे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. सर्व शास्‍त्रज्ञांनी प्रताप काळे यांच्‍या एमएयुएस­162 या सोयाबीनच्‍या‍ बिजोत्‍पादन व मोसंबीच्‍या प्रक्षेत्रावर तसेच कैलास काळे यांच्‍या हळदीच्‍या तर शिवराम काळे यांच्‍या कपाशीच्‍या प्रक्षेत्रावर पाहणी केली.

कार्यक्रमास धानोरा काळे परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रताप काळे यांनी केले.कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. चव्‍हाण, डॉ. सांगळे, प्रा. बोकारे,‍ श्री.निकम श्री. मिसाव तर श्री. नृसिंह स्‍वंयसाहयत्‍ता गटाचे सर्व पदाधिकारी व ज्ञानोबा काळे, दशरथ काळे, जगन्‍नाथ्‍ कदम, दत्‍तराव काळे, भुजंग काळे, प्रकाश काळे, सग्रांम काळे आदींनी परीश्रम घेतले.

शिफारशीनुसारच किडकनाशकांचा वापर करा......विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

अप्रमाणशीर किडकनाशकांमुळे वाढत आहे किडींचा प्रादुर्भाव

मराठवाडयातील ब-याच जिल्‍हयात पेरणीनंतर पावसाचा प्रदिर्घ खंड, त्‍यानंतर थोडासा पाऊस, अधिकचे तापमान, ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीन व कपाशीवर फार मोठया प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन त्‍या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यू. एन. आळसे यांनी परभणी तालुक्‍यातील मौजे पांढरी येथे गुंडेराव देगांवकर व बालाजी धस यांचे शेतावर भेट देऊन सोयाबीन व बागायती कापुस पिकांची पाहणी केली. सोयाबीन पिकांवर हेलीकोव्‍हर्पा (हिरवी / घाटे अळी), तंबाखूवरील पाने खाणारी अळी, लाल कोळी आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. सोयाबीन पिकावरील पाने व शेंगा खाणा-या अळी प्रादुर्भाव नियंत्रानासाठी इमामेक्‍टीन बेन्‍झोएट ३ मिली किंवा क्‍लोरॅनट्रानीलिप्रोल (रायनाक्‍झीपार) २ मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे. शेंग करपा रोगासाठी कार्ब्‍न्‍डेझीम + डायथेन एम-४५ हे संयुक्‍त बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारण्‍याची शिफारस करण्‍यात आली. तसेच बागायती कपाशीवर फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी रसशोषण करणा-या किडी आढळुन आल्‍या. त्‍यांच्‍या बंदोबस्‍तासाठी फिप्रोनील २० मिली १० लिटर पाण्‍यात मिसळून स्‍वतंत्र फवारणी करावी. हया किटकनाशकाची संपूर्ण मात्रा घ्‍यावी. बरेचशे शेतकरी फिप्रोनील + इमिडाक्‍लोप्रीड असे मिश्रण वापरत आहेत ते चुकीचे असुन प्रमाणशीर औषधे नसल्‍यामुळे फुलकिडे व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्‍याचबरोबर पॉवर स्‍प्रे पंपासाठी सदरिल किटकनाशकांची मात्रा तीन पट करावी.
     सदरिल प्रक्षेत्र भेटी दरम्‍यान पांढरी, नांदगाव व परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले म्‍हणाले की, बीटी कपाशीसोबत नॉन‍बीटी जरुर लावले पाहिजे कारण येणा-या काळात बोंडअळी मध्‍ये बीटीला प्रतिकार क्षमता निर्माण झाली तर शेतक-यांना बीटी कापुस लावणे सोडून द्यावे लागेल. विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. आळसे यांनी बागायती क्षेत्रात जमिनीचे आरोग्‍य टिकविण्‍यासाठी सेंद्रीय किंवा हिरवळीच्‍या खताचा वापर करण्‍याची शिफारस केली तसेच परिसरातील जमिनी भारी असल्‍यामुळे पाण्‍याचा काटेकोरपणे वापर करण्‍याचा सल्‍ला दिला.

Tuesday, August 25, 2015

मौजे झरी येथे एकात्मिक किड व रोग व्‍यवस्‍थापनावर शेतकरी मेळावा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दिनांक २० ऑगस्‍ट रोजी मौजे झरी येथे एकात्मिक किड व रोग व्‍यवस्‍थापनावर मेळावा आयोजीत करण्‍यात आला होता. मेळाव्‍यास प्रगतशील शेतकरी मा श्री कांतराव देशमुख, उपसंरपंच कैलास रगडे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ डि जी मोरे, वनस्‍पती विकृती तज्ञ प्रा पी एच घंटे, डॉ डि जी दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोयाबीन पिकावरील किडीविषयी डॉ. डी. जी. मोरे यांनी तर कापुस पिकावरील रोगाविषयी विद्यापीठातील प्रा पी. एच. घंटे यांनी माहिती दिली. कार्यक्रम यशस्‍वतीतेसाठी कृषिदुत नितीन ढोकर, जिवन धोतरे, सुभाष इरतकर, युवराज धावने, अमोल जोंधळे, मंगेश गोरे, विजय घाटुळ, वैजेनाथ कदम, गोपाळ डोंबे, अजित गावडे, द्रोपद घुगे, रामेश्‍वर कदम आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थितीत होते. 

Sunday, August 23, 2015

वनामकृविच्‍या कृषि सहाय्यक पदाची लेखी परिक्षा सुरळीत

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची जाहिरात क्र वनामकृवि-१/२०१४ दिनांक २५ नोंब्‍हेबर २०१४ अन्‍वये पदवीकाधारकाच्‍या कृषि सहाय्यक पदासाठी लेखी परिक्षा रविवार दिनांक २३ ऑगस्‍ट रोजी सकाळी ११ ते १ या दरम्‍यान पर‍भणी शहरातील एकुण १८ परिक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. एकुण ३६ पदांकरिता ६४८२ उमेदवारांपैकी ४९३८ परिक्षार्थींनी (७६ टक्के परिक्षार्थींनी) परिक्षा दिली. सदरिल परिक्षेच्‍या प्रश्‍नांची उत्‍तरे विद्यापीठाची संकेतस्‍थळे www.mkv.ac.in वरील advertisement या लिंकवर तसेच mkv2.mah.nic.in वर प्रसिध्‍द करण्‍यात आली असल्‍याचे कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी कळविले आहे.