Saturday, March 25, 2017

संकरीत गौ पैदास प्रकल्‍पाच्‍या वतीने ‘आधुनिक चारापिके तंत्रज्ञानातुन किफायतशीर दुग्‍धव्‍यवसाय’ यावर एकदिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय, संशोधन संचालनालय व संकरीत गो पैदास प्रकल्‍प यांचे संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत दि. 21 मार्च रोजी आधुनिक चारापिके तंत्रज्ञानातुन किफायतशीर दुग्‍धव्‍यवसाय या विषयावर एकदिवसीय शेतकरी पशुपालक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाला. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले तर एमएएफएसयुचे माजी संशोधन संचालक डॉ. निळकंठराव भोसले विशेष अतिथी म्‍हणून उपस्थित होते. संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, संकरीत गो-पैदास प्रकल्‍पावर विविध प्रकारची पशुधनासाठी आवश्‍यक बहुवार्षिक चारा पिकांची लागवड केलेली आहे. याची ठोंबे नाममात्र शुल्‍कामध्‍ये उपलब्‍ध आहेत, शेतक-यांनी याचा लाभ घ्‍यावा.
डॉ. निळकंठराव भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतक-यांनी दुग्‍धोत्‍पादन व्‍यवसायवृध्‍दीसाठी चारापिक उत्‍पादक शेतकरी म्‍हणुन स्‍वत:ची ओळख निर्माण करवी लागेल, ज्‍यामुळे मराठवाडा विभाग दुग्‍धोत्‍पादनासाठी स्‍वयंपुर्ण होईल व तरुण शेतकरी वर्गाला स्‍वंयरोजगार निर्माण होतील.

प्रशिक्षणात शास्‍त्रज्ञ डॉ. बि. एम. ठोंबरे, डॉ. ए. टी. शिंदे, डॉ. डी. एस. चौहान, डॉ. एस. एस. देशमुख आणि डॉ. एस. एस. खिल्‍लारे यांनी पशुपालकांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. प्रकल्‍पावरील शेतकरी प्रशिक्षण कक्षाचे उदघाटन मान्‍यवरांचे हस्‍ते करण्‍यात आले तसेच  चारापिक प्रक्षेत्रावर शिवारफेरीचेही आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संदेश देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सतिश खिल्‍लारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजक तथा जेष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह चौहान, संशोधन उपसंचालक डॉ. गजेंद्र लोंढे यांच्‍यासह प्रकल्‍पाचे डॉ. संदेश देशमुख, डॉ. सतिश खिल्‍लारे, श्री बालाजी कोकणे, सुभाष शिंदे, श्री ज्ञानोबा दुधाटे, मुळे, भगवान गायकवाड, अनंता मुलगीर, पावडे, शेख जिलानी आदींनी परिश्रम घेतले.

Thursday, March 23, 2017

वनामकृवितील पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने जागतिक जल दिन साजरा

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने दिनांक 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलसचिव डॉ. विलास पाटील हे होते तर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. विलास पाटील यांच्‍या हस्‍ते जलपूजन करण्यात आले. मुख्य शास्त्रज्ञ डॉ. उदय खोडके यांनी जल प्रतिज्ञा देऊन सर्वांनी पाण्याचा सुयोग्य व काटकसरीने वापर करून जलसंवर्धन करणे व जलप्रदूषण रोखण्यासाठी कटीबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ विलास पाटील यांनी जल जागृती कार्यक्रम सर्व दूर साजरे करावेत अशी अपेक्षा व्‍यक्‍त करून इस्‍त्राईल व जर्मनी सारख्या देशांत पडणाऱ्या फार अल्‍प पावसाचा शेतकरी व नागरिक कशा पध्‍दतीने काटकोर उपयोग करतात हे सांगितले. प्रत्येक नागरिकाने स्वत:ची मानसिकता बदलुन पाणी बचत व पाणी सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. डि एन गोखले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, पिकांच्या संवेदनशील अवस्था ओळखून सिंचनाच्या पाळ्या ठरवाव्यात. सूक्ष्म सिंचनासह आच्छादनाचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, तसेच घरगुती पाणी वापरात काटकसर करण्यासाठीचे अनेक उपाय त्‍यांनी सांगितले.    
यावेळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या सूक्ष्म सिंचन वरील प्रायोगिक प्रकल्पास उपस्थितांनी भेट दिली. तसेच ठिबक सिंचनावरील प्रायोगिक कोबी पिकाची काढणी मान्यवरांचे हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन गडदे यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. हरीश आवरी, प्रा. सुमंत जाधव, प्रा. रावसाहेब भाग्यवंत, प्रा. अशोक मंत्री, प्रा. अनिस कांबळे, श्री नंदकिशोर गिराम, दादाराव भरोसे, रत्नाकर पाटील, संजय देशमुख, प्रकाश मोते, विलास जाधव, प्रभाकर रनेर आदीसह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित मोठया संख्‍ये उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्रसंघा तर्फे वर्ष १९९३ पासून दरवर्षी २२ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय जलदिन म्हणून पाळल्या जातो. रोजगार, शाश्वत विकास, उर्जा, सहकार, पर्यावरण, अन्न सुरक्षा अश्या विविध विषयांची दरवर्षी पाण्याशी सांगड घातली जाते. सन २०१७ ह्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने पाणी आणि सांडपाणी यावर भर दिलेला आहे.

वनामकृविचा एकवीसावा दीक्षांत समारंभ निमित्‍त पत्रकार परिषद संपन्‍न

 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत समारंभ दिनांक 25 मार्च रोजी आयोजित करण्‍यात आला असुन त्‍यानिमित्‍त विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक 23 मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषद संपन्‍न झाली. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील, विद्यापीठ अभियंता श्री ए एल रूमणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ आर डि आहिरे यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी मानले. सदरिल पत्रकार परिषदेस विविध माध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

प्रेस नोट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत समारंभ
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत समारंभ दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात आयोजीत करण्‍यात आला असुन समारंभाच्‍या अध्‍यक्षस्थान राज्‍याचे कृ‍षीमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतीकुलपती मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर हे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्‍हणुन झांसी येथील राणी लक्ष्‍मीबाई कृषि विद्यापीठाचे कुलपती मा. प्रा. पंजाब सिंग उपस्थित राहुन दीक्षांत अभिभाषण करणार असुन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे माननीय सदस्‍य यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल दीक्षांत समारंभात रांजणी (ता. कळंब जि. उस्‍मानाबाद) ये‍थील नॅचरल शुगरचे कार्यकारी संचालक तथा प्रगतशील शेतकरी मा. श्री. भैरवनाथ भगवानराव ठोंबरे यांना कृषिरत्‍न या मानद उपाधीने सन्‍मानित करण्‍यात येणार असुन विद्यापीठातील संशोधन कार्यात भरिव योगदानाबाबत राधाकिशन शांती मल्‍होत्रा पोरितोषिकांनी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांना गौरविण्‍यात येणार आहे. दीक्षांत समारंभात विद्यापीठातील विविध अभ्‍यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्‍यांनी निश्चित केलेल्‍या सूवर्ण पदके, रौप्‍य पदके व रोख पारितोषिके पात्र स्‍नातकांना प्रदान करून मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात येणार आहे. तसेच विविध विद्याशाखेतील एकुण 5643 स्‍नातकांना विविध पदवी, पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीने माननीय प्रति कुलपती महोद्यांव्‍दारा अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे. यात आचार्य पदवीचे 46 पात्र स्‍नातक, पदव्‍युत्‍तर पदवीचे 663 स्‍नातक व पदवी अभ्‍यासक्रमाचे 4934 स्‍नातकांचा समावेश आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्‍यात आले. सदरिल दीक्षान्‍त समारंभात पुढील प्रमाणे विद्यार्थ्‍यांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार असल्‍याचे सांगण्‍यात आले.
अ. क्र.
अभ्‍यासक्रम
एकुण पात्र स्‍नातक

आचार्य पदवी (पीएच. डी.)

1.
पीएच. डी. (कृषि)
44
2
पीएच. डी. (गृहविज्ञान)
02

एकुण आचार्य पदवी (पीएच. डी.)
46

पदव्‍यत्‍तुर अभ्‍यासक्रम

1
एम. एस्‍सी. (कृषि)
467
2
एम. एस्‍सी. (गृहविज्ञान)
17
3
एम. टेक. (कृषी अभियांत्रिकी)
22
4
एम. टेक (अन्‍नतंत्रज्ञान)
39
5
एम. एस्‍सी. (उद्यानविद्या)
58
6
एम. बी. ए. (कृषी)
60

एकुण पदव्‍यत्‍तुर अभ्‍यासक्रम
663

पदवी अभ्‍यासक्रम

1
बी. एस्‍सी. (कृषि)
3096
2
बी. एस्‍सी. (उद्यानविद्या)
69
3
बी. एस्‍सी. (गृहविज्ञान) 
34
4
बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी) 
263
5
बी. टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)
840
6
बी. एस्‍सी. (कृषि जैवतंत्रज्ञान)
600
7
बी. एस्‍सी. (कृषी व्‍यवसाय व्‍यवस्थापन)
32

एकुण पदवी अभ्‍यासक्रम
4934

एकुण आचार्य, पदव्‍युत्‍तर व पदवी
5643


Wednesday, March 22, 2017

व्यक्तिमत्व विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया......कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू

वनामकृविच्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासाचे विविध पैलू’ वरील कार्यशाळेचे उद्घाटन
स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असुन व्यक्तिमत्व विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासाचे विविध पैलू’ यावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २२ व २३ मार्च रोजी करण्यात आले असुन उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ अशोक कडाळे, जिमखाना उपाध्‍यक्ष प्रा. राहुल रामटेके, हैदरबाद येथील वक्ते डॉ. बी. शिवप्रसाद आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू पुढे म्‍हणाले की, व्यक्तिमत्व विकासासाठी थोर व्यक्तींची जीवनचरित्रे वाचली पाहिजेत. थोर व्यक्तींनी आपले जीवन कसे घडविले, त्यांनी केलेले कार्य आणि स्वतःचे जीवनमान कसे उंचावले यावरून आपण आपले व्यक्तिमत्व सुधारू शकतो. आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून नेहमी सकारात्मक भाव दिसला पाहिजे, तसेच प्रत्येकाने चांगला श्रोता असणेही महत्वाचे आहे.
शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन अभ्‍यासक्रमासोबतच स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. डॉ. बी. शिवप्रसाद यांनी विविध व्हीडीओ क्लिप्स, पॉवरपॉईंट च्‍या माध्‍यमाव्‍दारे सादरिकरण केले. समोरच्या व्यक्तिशी संवाद साधताना, बोलताना बॉडिलॅंग्वेजवर भर द्या. त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता. आपले मुद्दे पटवून देऊ शकता, असे ही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक कडाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी केले. कार्यक्रमास प्रा. भास्करराव भुईभार, प्रा. विवेकानंद भोसलेप्रा. पंडित  मुंडेप्रा रविंद्र शिंदे, प्रा. गोपाळ शिंदे, प्रा दत्तात्रय पाटील, प्रा. विशाल इंगळे, प्रा. संदीप पायाळ, प्रा. प्रमोदिनी मोरे, प्रा. संजय सुपेकर, प्रा. लक्ष्मिकांत राऊतमारे आदीसह महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व सुमारे २०० विद्यार्थी प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत.

Monday, March 20, 2017

मराठवाडयातील दुर्गम आदिवासी भागातही कृषी तंत्रज्ञान पोहचविण्‍यासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित आदिवासी शेतकरी मेळावा संपन्न

विद्यापीठाच्या विविध संशोधन योजनाद्वारे आदिवासी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत व तांत्रिक सहाय्य देण्यात येईल, कृषी तंत्रज्ञान मराठवाडयातील दुर्गम आदिवासी भागातही पोहचविण्‍यासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील असुन आदिवासी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने दि. १७ मार्च रोजी आदिवासी शेतकरी मेळावा आयोजित विद्यापीठात करण्यात आले होते, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. विलास पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, प्राचार्य डॉ डि एन गोखले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. सुनील गोरंटीवार, प्रकल्पाचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास विद्यापीठ कटीबध्‍द आहे. सदरिल नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पाणी व्यवस्थापन प्रकल्पातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. 
संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी आपल्‍या मार्गदर्शनात विद्यापीठाच्‍या कृषी संशोधनातील योगदानावर प्रकाश टाकुन विद्यापीठामार्फत आदिवासी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली. मौजे जावरला गावचे तंटामुक्ती सभेचे अध्यक्ष श्री माधवराव मरसकोल्हे यांनी गावातील शेतकऱ्यांसाठी विद्यापीठ करीत असलेल्या शेतीविषयक विकास कामाबाबत समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. मेळाव्यात डॉ. अशोक जाधव यांनी कापूस पिक लागवडीवर तर डॉ. शिवाजी मेहेत्रे व डॉ. दयानंद मोरे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. 
मौजे जावरला (ता किनवट, जि नांदेड) हे गाव महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपालाच्‍या वतीने दत्तक घेतले असुन पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्‍याचा सदरिल प्रकल्‍पाचा उद्देश आहे. मेळाव्यात माननीय कुलगुरू व उपस्थित मान्यवरांचे हस्ते पाणी व्यवस्थापन प्रकल्पामार्फत भारतील कृषी अनुसंधान परिषदेच्या आदिवासी उपयोजना अंतर्गत निवडक शेतकऱ्यांना मोफत तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठातील शिवार फेरीचे आयोजन करून ठिबक सिंचनावर लागवड केलेल्या विविध पिक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. तुषार व ठिबक सिंचन संचाची जोडणी, सिंचन पध्दतींचा वापर याबाबतची तांत्रिक माहिती व प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. 
कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. उदय खोडके यांनी पाणी व्यवस्थापन प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञान शिफारसीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन गडदे यांनी केले. मेळाव्यास मौजे जावरला येथील पुरुष व महिला शेतकरी, सरपंच, विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, योजनांचे प्रभारी अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी प्रा. उत्तम कराड, प्रा. बी. एन. आगलावे, श्री नंदकिशोर गिरम, डी. आर. कुरा, दादाराव भरोसे, रत्नाकर पाटील, संजय देशमुख, प्रकाश मोते, विलास जाधव, प्रभाकर रनेर यांनी विशेष प्रयत्न केले.

Sunday, March 19, 2017

औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र प्रेरित गृहउद्योगाच्‍या दालनास “एक भारत श्रेठ भारत” प्रदर्शनात पुरस्कार


ओडिशामधील भुवनेश्‍वर येथे आयोजित एक भारत श्रेष्‍ठ भारत प्रदर्शनात औरंगाबाद जिल्‍हयातील दितिजा गृह उद्योग व सिध्‍दी गृह उद्योगाच्‍या दालनास पुरस्‍कार देऊन नुकतेच सन्‍मानित करण्‍यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या मार्गदर्शनाखाली सदरिल गृहउद्योगाची उभारणी करण्यात आली असुन विविध प्रदर्शनात त्‍यांच्‍या यशस्‍वी सहभागामुळे त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले. प्रदर्शनात एमएसएसआयडीसी मार्फत निवड करून कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद प्रेरित तीन स्टॉलची निवड करून पाठविण्यात आले. यापैकी दितिजा गृहउद्योग व सिद्धि गृहउद्योग या स्टॉल ला पुरस्कार देऊन उघोजिकांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राचे संस्कृती विभागाचे संचालक श्री संजय पाटील, ओडिसा राज्याचे संस्कृती विभागाचे संचालक श्री नितिन बागडे व एम.एस.एम.इ. ओडिसा चे मुख्य सचिव मा. श्री. गुप्ताजी यांचा हस्ते पुरस्कार देण्यात आले.
दितिजा गृहउद्योगाचे रेखा रविंद्र बहटूरे यांनी ऑगस्ट 2016 मध्‍ये कृषि विज्ञान केंद्राव्‍दारे आयोजित 20 दिवसीय अन्नप्रक्रिया प्रशिक्षणात प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणात कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) प्रा. दीप्ती पाटगावकर यांनी फळे व भाजी-पाला प्रक्रिया, दूध प्रक्रिया, सोया प्रक्रिया, बेकरी उद्योग, शेवगा प्रक्रिया आदी विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले होते. यात आरोग्यासाठी शेवग्याचा पानाचा वापर करून शेवगा पराठा शिकविण्यात आले. रेखा बहटूरे यांनी कृषि विज्ञान केंद्राचे सतत मार्गदर्शन घेऊन पौष्टिक शेवगा पराठाचा उद्योग दितिजा गृहउद्योगा मार्फत सुरवात केली. माहे ऑक्टोबर 2016 पासून आज अखेर पर्यन्त औरंगाबाद मधील प्रत्येक प्रदर्शनात सहभाग घेऊन पौष्टिक शेवगा  पराठयाची ओळख करून त्यांनी एक कुशल व सफल उद्योजिका होऊन 1 लाख 30 हजारा पर्यन्तचे उत्पन्न मिळविले. तसेच सिद्धि गृहउद्योगाचे जया जगदीश सबदे या कृषि विज्ञान केंद्राच्‍या मार्गदर्शनाखाली विविध प्रकाराचे शेवया तयार करून पोष्टिक शेवयाचा उद्योग करतात. त्‍यांनीही चार वर्षापूर्वी कृषि विज्ञान केंद्रात प्रशिक्षिण घेतले होते. आज त्या 15 प्रकारचे फ्लेवर मध्ये शेवया बनवितात व महिना 15000/- पर्यन्त उत्पन्न मिळवितात. या दोन्ही यशस्वी उद्योजिकांना विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. बी. पवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रोत्साहीत केले.

Saturday, March 18, 2017

अधिक उत्‍पादनासाठी हळद तज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांनी सांगितली हळद लागवडीतील पंचसुत्रे

वसमत येथील शेतकरी मेळाव्‍यास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्र व तालुका कृषि अधिकारी वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे दिनांक 17 मार्च रोजी आयोजन वसमत येथे करण्यात आले होते. मेळाव्यात हळद लागवड तंत्रज्ञान या विषयावर कसबे डिग्रस (ता. मिरज जि. सांगली) येथील हळद संशोधन केंद्राचे हळद तज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. व्ही. डी. लोखंडे हे होते तर उपविभागीय कृषि अधिकारी श्री. यु. जी. शिवणगावकर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक, श्री. एम. डी. तिर्थनकर, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, तालुका कृषि अधिकारी श्री. गजानन पवार, उद्यानविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. आर. एम. कुलकर्णी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. ए. एस. पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना हळद तज्ञ डॉ. जितेंद्र कदम हे म्हणाले की, मराठवाडयातील हळद उत्‍पादक शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांपेक्षा उत्पादकतेच्या बाबतीत पुढे जात असुन हळद लागवड करतांना पंचसुत्रांचा विशेष विचार करावा, यात योग्‍य जमिन, बीजप्रकिया, लागवड पध्‍दत, खत व किड व्यवस्थापनप्रक्रिया आदींत आधुनिक तंत्राचा अवलंब करावा. यामुळे निश्चितच हळदीचे अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. याकरिता शेतक-यांनी वेळोवेळी विद्यापीठाची मदत घ्यावी. यावेळी डॉ जितेंद्र कदम यांनी योग्‍य वेळी योग्‍य तंत्राचा कसा अवलंब केला पाहिजेत याविषयी शेतक-यांना सविस्तर माहिती देऊन शेतक-यांच्‍या हळद लागवडीबाबतच्‍या विविध शंकाचे निराकरण केले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. व्हि. डी. लोखंडे आपल्‍या मार्गदर्शनात कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. मेळाव्‍यास परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयातील पाचशे पेक्षा जास्त शेतक-यांनी उपस्थिती नोंदवीली. कार्यक्रमाच्या प्रास्‍ताविकात विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी विद्यापीठाच्या विविध विस्तार कार्यक्रमाबद्दल व माहिती केंद्रातर्फे विकसीत हळद लागवडीवर आधारित मोबाईल अॅप बद्दल माहिती सांगितल. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डी. डी. पटाईत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. जी. पुरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि तंत्रज्ञान माहीती केद्रांच्या व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या कर्मचा-यांनी अथक परिश्रम केले.