Wednesday, May 17, 2017

भारताच्या पुर्नबांधणीसाठी सामाजिक परिवर्तनाची गरज.....पदमश्री मा. डॉ. सुखदेव थोरात

वनामकृवित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयती निमित्‍त आयोजित व्‍याख्‍यान कार्यक्रमात प्रतिपादन

भारतीय समाजात जातीय समानता निर्माण करण्‍यासाठी वैयक्‍तीक पातळीवर कायदा उपयुक्‍त ठरू शकतो, परंतु संपुर्ण समाज जातीय समानता मानत नसेल तर कायदा दोडका ठरतो. आज भारत पुर्नबांधणीसाठी सामाजिक परिवर्तन गरजेचे आहे. महाराष्‍ट्राला सामाजिक परिवर्तनाची मोठी परंपरा लाभली असुन शिवाजी महाराज, रानडे, गोखले, आगरकर, शाहु महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, संत तुकाराम, गाडगे महाराज, तुकोडीजी महाराज आदींनी जातीय समानतेसाठी कार्य केले आहे. यासाठी सर्व समाजास एकत्र यावे लागेल, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील विदयापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्‍यक्ष पदमश्री मा. डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कॉस्‍ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 126 व्‍या जंयती निमित्‍त दिनांक 15 मे रोजी आयोजित व्‍याख्‍यान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले, महासंघाचे अध्‍यक्ष डॉ गजेंद्र लोंढे, सचिव प्रा अनिस कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्राच्या पुनर्बाधणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका या विषयावर बोलतांना पदमश्री मा. डॉ. सुखदेव थोरात पुढे म्‍हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक कार्यामुळे आज भारतात अनेक आमूलाग्र बदल घडून आले आहेत. डॉ. आंबेडकर हे एक उत्तम अर्थशास्त्री होते, ज्ञानाच्या जोरावर भारताच्‍या आर्थिक धोरणावर त्‍यांचा प्रभाव होता, त्यांचे मोलाचे कार्य म्हणजे देशाच्या मध्यवर्ती रिझर्व बँकेची स्थापना. वीज निर्मिती आणि जलसिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी देशातील पहिला नदी-खोरे प्रकल्प तयार केला. दामोदर, हिराकुंड प्रकल्‍प म्‍हणजे त्यांच्या दूरदृष्टीपणाची ओळख होय. १९२० ते १९५६ हा भारताच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचा कालखंड असून या कालावधीत देशात अनेक स्थित्यंतर झाले अनेक बदलांना जनतेला समोरे जावे लागले. आरक्षणाच्‍या धोरणामुळे मागासवर्गीय व आदिवासी समाज तसेच महिलाचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढला आहे. उत्‍पन्‍न वाढत आहे, गरिबीचे प्रमाण कमी होत आहे, अस्‍पुश्‍यता कमी होत आहे, परंतु अस्‍पृश्‍यता पुर्णपणे संपलेली नाही. खाजगीकरणामुळे आरक्षण धोरण निष्‍प्रत ठरत आहे.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरुल म्‍हणाले की, आजही देशाच्‍या आर्थिक व सा‍माजिक प्रगती मध्‍ये बाबासाहेबांच्‍या विचारांचे प्रतिबिंब दिसते. आजही बाबासाहेबांच्‍या विचारांची देशाला गरज आहे.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एस जी बोरकर यांचे नाव अमेरिकातील राष्‍ट्रीय जैवतंत्रज्ञान विषयक केंद्रानी क्‍लेबसीएल्‍ला न्‍युमोनी प्रजातीस दिल्‍याबद्दल त्‍यांचा सपत्‍नीक मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला तसेच महासंघातर्फे संकलित आरक्षण विषयक शासन निर्णय पुस्तिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ गजेंद्र लोढे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ फरिया खान यांनी केले तर आभार प्रा अनिस कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, May 16, 2017

‘उन्‍नत शेती - समृध्‍द शेतकरी’ अभियानास कृषि विद्यापीठाचे तांत्रिक पाठबळ

महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कार्यशाळा संपन्‍न
पिकांच्‍या उत्‍पादन खर्चापेक्षा अधिक उत्पन्‍न राज्‍यातील शेतक-यांना खा‍त्रीशीरपणे मिळावे हा उद्देश ठेऊन संपुर्ण महाराष्‍ट्रात कृषि विभागाच्‍या वतीने दिनांक 25 मे ते 8 जुन दरम्‍यान उन्‍नत शेती - समृध्‍द शेतकरी अभियान पंधरवाडा म्‍हणुन साजरा करण्‍यात येणार आहे. कृषि विभागाच्‍या वतीने मराठवाडयात राबविण्‍यात येणा-या या अभियानास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तांत्रिक पाठबळ व मार्गदर्शनाबाबतचा आराखडा निश्चित करण्‍यासाठी दिनांक 5 मे रोजी प्रशिक्षण नियोजन कार्यशाळा कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस विभागीय सहसंचालक औरंगाबाद श्री आर. एस. भताने, नांदेड जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ टी एस मोठे, औरंगाबाद जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संजीवजी पडवळ, हिंगोली जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. विजय लोखंडे, जालना जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दशरथ तांभाळे, आत्‍मा संचालक श्री चपळे, डॉ यु एन आळसे, श्री चोले, विविध कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य, उपविभागीय कृषि अधिकारी, संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.    
याप्रसंगी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, सिंचन क्षेत्र व कोरडवाहु क्षेत्र यांच्‍या मध्‍ये येणा-या पिक उत्‍पादनात व खर्चात तफावत आहे तसेच विविध पिकांची एकरी रोपांची संख्‍या, लागवड तंत्रज्ञान हे त्‍या त्‍या पिक व भौगोलिक क्षेत्रानुसार बदलत असतात, तेव्‍हा पिकांचे शेतक-यांच्‍या शेतावरील प्रत्‍यक्ष उत्‍पादन व पि‍काच्‍या वाणांचे अनुवंशीक उत्‍पादन यांचात तफावत आहे. याबाबींचा शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढीसाठी विचार करावा लागेल. विभागीय सहसंचालक औरंगाबाद श्री आर एस भताने आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातुन कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी विविध पिकातील अद्यावत पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करावे म्‍हणजे पिकांचे अनुवंशील उत्‍पादन व प्रत्‍यक्ष उत्‍पादन यांच्‍यातील तफावत कमी करणे शक्‍य होईल, या कार्यासाठी मराठवाडयातील प्रत्‍येक तालुक्‍यासाठी कृषि विद्यापीठातील एक शास्‍त्रज्ञ उपलब्‍ध करून द्यावा अशी विनंतीही त्‍यांनी केली. बैठकीत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी सदर अभियान यशस्‍वीपणे राबविण्‍यासाठी मराठवाडा विभागातील सर्व 76 तालुक्‍यामध्‍ये शेतक-यांना तांत्रिक माहिती देण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरवर विविध समित्‍यांचे गठण करून विद्यापीठांतर्गत असलेले घटक व संलग्‍न कृषि महाविद्यालये, संशोधन केंद्रे, विस्‍तार शिक्षण केंद्रे तसेच शासकीय व अशासकीय कृषि विज्ञान केंद्रे येथील शास्‍त्रज्ञ उपलब्‍ध करून देण्‍याबाबतचा आराखडा सादर केले.

मराठवाडयातील चालु आठवडयातील हवामान अंदाज व कृषि सल्ला


Sunday, May 14, 2017

वनामकृवित विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्‍त खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

विद्यापीठ बियाणे विक्रीचे उद्घाटन तसेच खरीप पीक परिसंवाद, कृषि प्रदर्शनाचेही आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या 45 व्‍या वर्धापन दिना‍निमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचे कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप शेतकरी मेळावा आयोजन गुरूवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 11.00 वाजता विद्यापीठ प्रशासकीय इमारतीजवळील नवीन पदव्‍युत्‍तर वसतिगृह मैदानात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचे उद्घाटन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. किसनराव लवांडे यांच्‍या हस्‍ते होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्‍हणुन राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाचे संचालक तथा विस्‍तार व प्रशिक्षण (कृषि) संचालक मा. डॉ. एस. एल. जाधव उपस्थित राहणार असुन खासदार मा. श्री. संजय जाधव, आमदार मा. श्री. सतीश चव्‍हाण, आमदार मा. श्री. विक्रम काळे, आमदार मा. श्री. अब्‍दुल्‍ला खान दुर्राणी (बाबाजानी), आमदार मा. श्री. रामराव वडकुते, आमदार मा. डॉ. राहुल पाटील, आमदार मा. श्री. विजय भांबळे, आमदार मा. डॉ. मधुसुदन केंद्रे, आमदार मा. श्री. मोहन फड आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्‍यानिमित्‍त खरीप पीक परिसंवादात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ कापुस, सोयाबीन, तुर आदीसह खरीप पीक लागवड, शेतीपुरक जोडधंदे, सेंद्रिय बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन विषयावर मार्गदर्शन करणार असुन कृषि तंत्रज्ञानाबाबत शेतक-यांच्‍या शंकाचे निरसनही करण्‍यात येणार आहे. याप्रसंगी कृषि प्रशदर्शनाचेही आयोजन करण्‍यात आले असुन यात कृषि तंत्रज्ञान व कृषि औजारे वर आधारीत विद्यापीठाचे दालने, शेतकरी बियाणे उत्‍पादक कंपन्‍या, खाजगी बी-बियाणे, कृषि निविष्‍ठाच्‍या कंपन्‍या व बचत गटाचे दालनाचा समावेश राहणार आहे.  याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित विविध पीकांच्‍या वाणाच्‍या बियाणे विक्रीचे उद्घाटनही करण्‍यात येणार आहे. सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बी. आर. शिंदे व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख यांनी केले आहे.

Friday, May 12, 2017

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विदयापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष मा. प्रा. डॉ. सुखदेव थोरात यांचे व्याख्यान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठाच्‍या कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या वतीने विश्‍वरत्‍न बाबासाहेब डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांच्‍या १२६ व्‍या जयंती निमित्‍त जवाहरलाल नेहरू विदयापीठाचे मानद प्राध्‍यापक तथा नवी दिल्‍ली येथील विदयापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्‍यक्ष मा. प्रा. डॉ. सुखदेव थोरात यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारत पुन:निर्मितीमध्‍ये सहभाग आणि विचार या विषयावर व्‍याख्‍यानाचे आयोजन परभणी कृषि महाविदयालय सभागृहात दिनांक १५ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्‍यात आले आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार असुन शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघ शाखा, वनामकृवि, परभणीचे अध्‍यक्ष डॉ. गजेंद्र लोंढे, सचिव श्री. अनिस कांबळे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. 

Thursday, May 4, 2017

वनामकृविचा मौजे मूरूंबा येथे उमेद कार्यक्रम संपन्न

अनुभव आधारीत शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यीनीनी केले शेतक-यांना आंळबी उत्‍पादनावर मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केद्र, वनस्‍पती विकृतीशास्‍त्र विभाग, कृषि महाविदयालय, परभणी व कृषि विज्ञान केद्र, परभणी यांच्‍या संयुक्‍त विदयमाने मौजे मुरुंबा (ता. जि. परभणी) येथे उमेद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 2 मे रोजी करण्‍यात आले होते. उमेद कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठाच्‍या वतीने सन २०१४-२०१५ पासून राबविण्‍यात येत असुन सदरील उपक्रमातंर्गत मराठवाडयातील विविध गावांमध्‍ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येते. आप्‍तकालीन व दुष्‍काळी परिस्थितीत शेतक-यांना कृषि तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन तसेच शेतक-यांना कृषि पुरक जोडधंदे, नवीन उदयोग, कमी खर्चाचे तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन तसेच शेतक-यांना आत्‍महत्‍या करण्‍यापासून परावृत्‍त करण्‍यासाठी समुपदेश केले जाते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले हे होते, तर प्राध्‍यापक डॉ. के. टी. आपेट, परभणी कृषी विज्ञान केंद्राचे मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, प्रा. डी. डी. पटाईत, प्रा अंबाडकर, प्रगतशील शेतकरी श्री. बिभीषन चोपडे, श्री. विजयकुमार झाडे, पंडीत अशोक आदींची प्रमुख उपस्थितीत होती.  
अध्‍यक्षीय भाषणात डॉ बी बी भोसले म्‍हणाले की, शेतकरी हा जगाचा पोंशिदा आहे, त्‍याने कुठल्‍याही परिस्थितीत डगमगून जाऊ नये, आजची वेळ उदया राहणार नाही. विदयापीठ, शासन, कृषि विभाग, हे सदैव शेतक-यांचे पाठीशी आहेत. समाजात शेतक-यांची प्रतिष्‍ठा व उच्‍च स्‍थान अबाधित आहे. आत्‍महत्‍येचा मार्ग अवलंब न करता बिकट परिस्थितीमधून मार्ग काढला पाहिजे, असे सांगुन त्‍यांनी विदयापीठाचे तंत्रज्ञान, जोडधंदे, कमी खर्चाचे तंत्रज्ञान याविषयी शेतक-यांना अवगत केले. कार्यक्रमात धानोरा काळे येथील प्रगतशील शेतकरी प्रताप काळे व मजलापूर येथील बालासाहेब हिंगे यांनीही अनुभव सांगितले. 
यावेळी कृषी महाविदयालयाच्‍या अनुभव आधारीत शिक्षण कार्यक्रमाच्‍या विदयार्थींनींनी मयुरी ठोंबरे व प्रियंका वालकर यांनी उपस्थिती शेतकरी व महीला शेतक-यांना आंळबी उत्‍पादन तंत्रज्ञानावर प्रात्‍यक्षिकावर दाखवुन आळंबी उत्‍पादन तंत्र, उपयोग, बाजारभाव, उत्‍पन्‍न व फायदा या विषयी सविस्‍तर सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रिया जाधव हिने केले तर आभार प्रदर्शन शिल्‍पा नरवाडे हिने केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आठव्‍या सत्राच्‍या विदयार्थीनी विद्यार्थींनी व गावातील शेतक-यांनी परीश्रम घेतले.

Tuesday, May 2, 2017

वनामकृवित महाराष्‍ट्र दिन साजरा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक १ मे रोजी महाराष्‍ट्र दिन साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य क्रिडा प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. याप्रसंगी महाराष्‍ट्र दिन व कामगार दिनाच्‍या कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. विलास पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री विनाेद गायकवाड, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.