महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा संपन्न
पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक
उत्पन्न राज्यातील शेतक-यांना खात्रीशीरपणे मिळावे हा उद्देश ठेऊन संपुर्ण
महाराष्ट्रात कृषि विभागाच्या वतीने दिनांक 25 मे ते 8 जुन दरम्यान ‘उन्नत शेती - समृध्द शेतकरी’
अभियान पंधरवाडा म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. कृषि विभागाच्या वतीने
मराठवाडयात राबविण्यात येणा-या या अभियानास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे तांत्रिक पाठबळ व मार्गदर्शनाबाबतचा आराखडा निश्चित करण्यासाठी दिनांक
5 मे रोजी प्रशिक्षण नियोजन कार्यशाळा कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांच्या
अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस विभागीय सहसंचालक औरंगाबाद श्री आर. एस. भताने,
नांदेड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ टी एस मोठे, औरंगाबाद जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी श्री संजीवजी पडवळ, हिंगोली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. विजय
लोखंडे, जालना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दशरथ तांभाळे, आत्मा संचालक
श्री चपळे, डॉ यु एन आळसे, श्री चोले, विविध कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य,
उपविभागीय कृषि अधिकारी, संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख,
विद्यापीठ शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
म्हणाले की, सिंचन क्षेत्र व कोरडवाहु क्षेत्र यांच्या मध्ये येणा-या पिक उत्पादनात
व खर्चात तफावत आहे तसेच विविध पिकांची एकरी रोपांची संख्या, लागवड तंत्रज्ञान हे
त्या त्या पिक व भौगोलिक क्षेत्रानुसार बदलत असतात, तेव्हा पिकांचे शेतक-यांच्या
शेतावरील प्रत्यक्ष उत्पादन व पिकाच्या वाणांचे अनुवंशीक उत्पादन यांचात
तफावत आहे. याबाबींचा शेतक-यांचे उत्पन्न वाढीसाठी विचार करावा लागेल. विभागीय
सहसंचालक औरंगाबाद श्री आर एस भताने आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की,
प्रशिक्षणाच्या माध्यमातुन कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञांनी विविध पिकातील
अद्यावत पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करावे म्हणजे पिकांचे अनुवंशील
उत्पादन व प्रत्यक्ष उत्पादन यांच्यातील तफावत कमी करणे शक्य होईल, या
कार्यासाठी मराठवाडयातील प्रत्येक तालुक्यासाठी कृषि विद्यापीठातील एक शास्त्रज्ञ
उपलब्ध करून द्यावा अशी विनंतीही त्यांनी केली. बैठकीत विस्तार शिक्षण संचालक
डॉ बी बी भोसले यांनी सदर अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी मराठवाडा विभागातील
सर्व 76 तालुक्यामध्ये शेतक-यांना तांत्रिक माहिती देण्यासाठी जिल्हास्तरवर विविध
समित्यांचे गठण करून विद्यापीठांतर्गत असलेले घटक व संलग्न कृषि महाविद्यालये,
संशोधन केंद्रे, विस्तार शिक्षण केंद्रे तसेच शासकीय व अशासकीय कृषि विज्ञान केंद्रे
येथील शास्त्रज्ञ उपलब्ध करून देण्याबाबतचा आराखडा सादर केले.