Thursday, June 14, 2018

मराठवाडया करिता चालु आठवडयातील हवामान अंदाज व कृषि सल्‍ला


दिनांक 15 जुन ते 28 जुन पावसाच्‍या खंडाची शक्‍यता, पेरणीची घाई न करण्‍याचा वनामकृविचा सल्‍ला

Wednesday, June 13, 2018

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंग्याच्‍या नियंत्रणासाठी पेरणीच्‍या वेळीच विशेष काळजी घेण्‍याचे वनामकृविचे आवाहन

मराठवाडयातील सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असुन यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढण्‍याची शकता आहे. गेल्या वर्षीच्या सोयाबीनवरील विविध किंडीच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहिल्यास चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे ब-याच ठिकाणी शेतक-यांचे नुकसान झाले. त्यामुळे या किडींच्या व्यवस्थापनासाठी यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून आणि पेरणीच्या वेळी विशेष लक्ष देण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने केले आहे.

सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाची उगवण झाल्यावर लगेच सुरुवात होते. यावेळेस प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. अंडयातून अळी निघाल्यानंतर बीजदल पोखरते व नंतर मुख्य खोडामध्ये शिरते. त्यामुळे अशी रोपे कोमेजातात व वाळून जातात. पीक मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही.

चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत आढळतो. अळी पानाचे देठ, खोड पोखरुन आत शिरते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त भाग सुकुन जातो. खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. तसेच या किडी खोडामध्ये राहत असल्यामुळे त्यांचे व्यवस्थपन करणे अवघड जाते. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून त्यांचे विविध पध्दतीवदारे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

हंगाम संपल्यानंतर शेतातील काडीकचरा वेचून नष्ट करावे. त्यामुळे त्यात असणा-या सुप्तावस्था नष्ट होतील.
उन्हाळी नांगरट केल्यास किडीच्या सुप्तावस्था कडक उन्हामुळे किंवा पक्षी खाल्यामुळे नष्ट होतील.
पेरणी जुलैच्या दुस-या आठवडयापर्यत संपवावी.
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे.
प्रादुर्भावग्रस्त पाने, फांदया आतील किडीसह नष्ट कराव्यात.
पेरतेवेळी जमिनीमध्ये फोरेट 10 टक्के सीजी 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणे जमिनीत मिसळावे.
कीडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ट्रायझोफॉस 40 ईसी 12 मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी 3 मिली यांची फवारणी करावी.

सदरिल किडींच्‍या योग्‍य व्यवस्थापनासाठी वरील प्रकारे एकात्मिक व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले कृषि कीटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले आहे.


खोडमाशी
चक्रीभुंगा
चक्रीभुंगा
चक्रीभुंगा

Monday, June 11, 2018

वनामकृविचे माजी विद्यार्थ्‍यी मेजर संतोष मोहिते यांचा माननीय कुलगुरु यांचे हस्ते सत्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व राष्‍ट्रीय छात्र सेनाचे माजी छात्र सैनिक संतोष मोहिते हे लेह लडाख येथे गोरखा रायफल रेजीमेंट अंतर्गत मेजर म्‍हणुन कार्यरत असुन दि. 11 जुन रोजी मेजर संतोष मोहिते यांचा कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. मेजर संतोष मोहिते हे परभणीचे रहिवासी असुन 2010 बॅचचे कृषि अभियांत्रिकी पदवीधर आहेत. सिडीएस परीक्षेव्दारे अधिकारी पदास पात्र होऊन भारतीय सैन दलात 2012 साली प्रवेश मिळवला.
या प्रसंगी माननीय कुलगुरु डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मेजर संतोष यांचा विद्यापीठाला सार्थ अभिमान असुन जय जवान जय किसानया उक्तीप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी शेतीक्षेत्राचा विकासासाठी तसेच देशाच्‍या संरक्षणासाठी आपले योगदान देत आहेत. मेजर संतोष मोहिते म्‍हणाले की, मराठवाडयातील विद्यार्थ्‍यांना लष्करात उपलब्ध असलेल्या रोजगार संधीबाबत फारशी माहिती नसल्यामुळे आपल्या भागातील विद्यार्थी या क्षेत्रात मागे राहतात परंतु आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हया संधी शोधणे फारसे अवघड नाही.  
या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, मध्यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाचे डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. जयकुमार देशमुख आदींची उपस्थिती होती.  

Friday, June 8, 2018

वनामकृविच्या अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रात साठ हजार दर्जेदार सीताफळांच्यां रोपांची निर्मिती

कोरडवाहु भागात मध्‍यम ते हलक्‍या जमिनीवर घेता येऊ शकते उत्‍तमरित्‍या सिताफळाची फळशेती
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रात यावषीं सीताफळाची 60 हजार दर्जेदार कलम केलेली रोपे तयार करण्यात आली असुन हि रोपे प्रती कलम रूपये 40 दराने उपलब्ध करण्यात आले आहेत. या विविध प्रकारची वाण असुन बालानगर, धारुर 6, टी.पी. 7, लाल सीताफळ आदींचा समावेश आहे. ही रोपे दर्जेदार असल्यामुळे चांगली फळधारणा अधिक उत्पादन मिळते, ही रोपे कलम केलेली असल्याने तीन वर्षात फळधारण होते. सीताफळ हे कोरडवाहु फळपीक म्हणुन मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये 15 जूलै ते 15 ऑगस्ट दरम्यान लागवड करता येते. सीताफळाची फळशेती करण्यासाठी शासनाकडुन अनुदानही मिळते, हे अनुदान तीन टप्यात तीन वर्षामध्ये देण्यात येते. सीताफळा हंगामामध्ये चांगला बाजारभाव मिळतो. कोरडवाहु शेतक­ऱ्यांना सिताफळाची फळशेती अर्थप्राप्तीचे एक चांगले स्त्रोत होऊ शकते, अशी माहिती सीताफळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ गोविंद मुंडे यांनी दिली.  

सौजन्‍य: डॉ. गोविंद मुंडेप्रभारी अधिकारी, सीताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई

Tuesday, June 5, 2018

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आले प्लॉस्टिक मुक्त अभियान

कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी परिसर स्‍वच्‍छतेसाठी सर्वांनी आग्रही राहण्‍याचे केले आवाहन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनाच्‍या माध्‍यमातुन दिनांक 5 जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त प्‍लॉस्टिक व कचरा मुक्‍त अभियान राबविण्‍यात आले. या अभियानाचे उदघाटन कुलगूरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते झाले तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, पर्यावरणाचे संरक्षण करणे प्रत्‍येक नागरिकांची जबाबदारी असुन प्‍लॉस्‍टीकचा वापर न करण्‍याचा प्रत्‍येकांनी मानस करावा. परिसर स्‍वच्‍छतेसाठी सर्वांनी आग्रही राहावे, परभणी कृषि विद्यापीठाचा परिसर हरित व स्‍वच्‍छ ठेवण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न असतोच परंतु काही समाजातील नकारात्‍मक प्रवृत्‍तीच्‍या व्‍यक्‍तींमुळे विद्यापीठ परिसरात अस्‍वच्‍छता होत असेल तर त्‍यास प्रतिबंध करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
यावेळी सर्व विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक व कर्मचारी यांनी महाविद्यालयातील विविध विभाग, ग्रंथालय, वसतीगृह आदी परिसरातील प्‍लॉस्टिक कचरा वेचुन स्‍वच्‍छ केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक, सर्व वसतीगृह अधिक्षक, रासेयोचे सर्व कार्यक्रमाधिकारी आदींसह प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यींनी पुढाकार घेतला. 


Saturday, June 2, 2018

नुतन कुलगरूच्या नेतृत्वात परभणी कृषी विद्यापीठाचे नाव उंचावणारे कार्य व्हावे..... आमदार मा. डॉ राहुल पाटील

वनामकृविचे नुतन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांचा माननीय आमदार मा. डॉ राहुल पाटील यांच्‍या हस्‍ते सत्‍कार


मराठवाडयातील शेतक-यांची परभणी कृषी विद्यापीठाकडुन मोठी अपेक्षा आहे, या भागातील शेतीचे चित्र बदलण्‍यासाठी नुतन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या नेतृत्‍वाखाली भावी काळात कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार क्षेत्रात उल्‍लेखनिय कार्य होऊन विद्यापीठाचे नाव उंचावण्‍याचा प्रयत्‍न व्‍हावा, अशी भावना आमदार मा. डॉ राहुल पाटील यांनी व्‍यक्‍त केली. विद्यापीठाचे अठरावे कुलगुरू म्‍हणुन दिनांक 1 जुन रोजी मा. डॉ अशोक ढवण यांनी पदाभार स्‍वीकारला, विद्यापीठाच्‍या वतीने आयोजित सत्‍कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांना देखिल निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हाधिकारी मा. श्री पी शिवशंकर हे होते तर जिल्‍हा पोलिस अधिक्षक डॉ दिलीप झळके, कार्यकारी परिषदेचे सदस्‍य डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, शेतीनिष्‍ठ शेतकरी मा. श्री गंगाधरराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ राहुल पाटील पुढे म्‍हणाले की, मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या कार्यकाळात विद्यापीठाच्‍या कोरडवाहु संशोधनास एक चांगली दिशा प्राप्‍त झाली. विद्यापीठाचे नांदेड-44 हे कापसाचे वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यात आले, ही कौतुकास्‍पद गोष्‍ट असुन भ्रष्‍टाचार मुक्‍त प्रशासन दिल्‍याची भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
यावेळी आमदार मा. डॉ राहुल पाटील यांच्‍या हस्‍ते माजी कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु व नुतन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांचा सत्‍कार करण्‍यात आला. माजी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व नुतन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी सत्‍कारास उत्‍तर दिले तसेच अध्‍यक्षीय समारोप जिल्‍हाधिकारी मा श्री पी शिवशंकर यांनी केला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अनेक मान्‍यवरांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार डॉ सय्यद ईस्‍माइल यांनी मानले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख, अॅड अशोक सोनी आदीसह प्रतिष्ठित नागरीक, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Friday, June 1, 2018

कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व अधिकारी कर्मचा-यांना जास्‍त क्षमतेने कार्य करावे लागेल.... नवनियुक्‍त कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वनामकृविच्‍या वतीने नवनियुक्‍त कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांचा स्‍वागत तर माजी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा निरोप समारंभ संपन्‍न


मराठवाडयातील शेतक-यांच्‍या गरजेच्‍या दृष्‍टीने कृषी संशोधनाच्‍या आधारे विद्यापीठाने अनेक चांगले कृषि तंत्रज्ञान विकसित केले आहे, हे तंत्रज्ञान विद्यापीठाची कृषी विस्‍तार यंत्रणा व कृषी विभाग यांच्‍या सहकार्याने प्रभावीपणे शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतील, विद्यापीठातील अनेक पदे रिक्‍त असल्‍यामुळे मनुष्‍यबळाची मोठी कमतरता आहे. त्‍यामुळे विद्यापीठाच्‍या कृषि शिक्षण, संशोधन व कृषी विस्‍तार कार्यावर मर्यादा येत आहेत. परंतु शेतक-यांना व विद्यार्थ्‍याना विद्यापीठाकडुन अनेक अपेक्षा आहेत, यासाठी विद्यापीठातील उपलब्‍ध शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचा-यांना प्रभावीपणे जास्‍त क्षमतेने कार्य करावे लागेल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नुतन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी केले.
विद्यापीठाचे अठरावे कुलगुरू म्‍हणुन दिनांक 1 जुन रोजी मा. डॉ अशोक ढवण यांनी पदाभार स्‍वीकारला, विद्यापीठाच्‍या वतीने आयोजित सत्‍कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांना देखिल निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हाधिकारी मा. श्री पी शिवशंकर हे होते तर व्‍यासपीठावर आमदार मा. डॉ राहुल पाटील, जिल्‍हा पोलिस अधिक्षक डॉ दिलीप झळके, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, शेतीनिष्‍ठ शेतकरी मा. श्री गंगाधरराव पवार आदींसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानात काही कृषी तंत्रज्ञान कालबाहय झाले असुन बदलत्‍या हवामानस अनुकूल तंत्रज्ञान निर्मितीसाठी भर दयावा लागेल. मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या कार्यकाळात विद्यापीठाच्‍या कोरडवाहु संशोधनास एक चांगली दिशा प्राप्‍त झाली असुन तेच कार्य पुढे नेणार आहे. कृषी शिक्षणात विद्यार्थ्‍याच्‍या कौशल्‍य विकासावर भर देऊन त्‍यांना कृषी उद्योजकतेचे धडे दयावी लागतील, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
माजी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठाच्‍या कुलगुरू पदाच्‍या चार वर्षाच्‍या कार्यकाळात विद्यापीठातील कर्मचारी, मराठवाडयातील शेतकरी, तसेच लोकप्रतिनिधी यांनी मोठे सहकार्य केले. यामुळेच विद्यापीठातील प्रकल्‍पग्रस्‍त शेतक-यांचा प्रश्‍न मार्गी लावता आला. प्रशासनात निर्णय घेतांना प्रत्‍येकांचा सहभाग घेण्‍याचा प्रयत्‍न केला, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
आमदार मा डॉ राहुल पाटील यांनी आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मा. डॉ बी व्‍यं‍कटेश्‍वरलु यांनी विद्यापीठाच्‍या संशोधन व कृषि विस्‍तार कार्यास मोठी दिशा देण्‍याचे काम केले असुन त्यांनी भ्रष्‍टाचार मुक्‍त प्रशासन दिल्‍याची भावना व्‍यक्‍त केली.
अध्‍यक्षीय भाषणात जिल्‍हाधिकारी मा श्री पी शिवशंकर यांनी जिल्‍हा प्रशासनास शेतक-यांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठाचे मोलाचे योगदान लाभले असे सांगून त्‍यांच्‍या कार्यकाळात मराठवाडयातील शेतक-यांमध्‍ये आशेचा किरण निर्माण करण्‍यासाठी राबविण्‍यात आलेला उमेद कार्यक्रम निश्चितच उल्‍लेखनिय ठरला, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.   
कार्यक्रमात मा. डॉ अशोक ढवण व मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमात डॉ पी आर शिवपुजे, डॉ विलास पाटील, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ डि एन गोखले, श्री रमेशराव गोळेगांवकर, महेश देशमुख, प्रा. विशाला पटणम, विजय सांवत आदींनी मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार डॉ सय्यद ईस्‍माइल यांनी मानले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख, अॅड अशोक सोनी आदीसह प्रतिष्ठित नागरीक, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.