Sunday, April 12, 2020

वनामकृविच्‍या औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांना केले ऑनलाईन मार्गदर्शन


फळपिकांतील फळगळ कमी करण्‍यासाठी दिला फवारणीचा सल्‍ला
कोरोना विषाणु रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दुष्‍टीने राज्‍यात सुरू असलेल्‍या लॉकडाऊन दरम्‍यान कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञांना शेतकरी बांधवाना शेतावर जाऊन मार्गदर्शन करणे शक्‍य होत नाही, यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ एम बी पाटील व विस्‍तार कृषिविद्यावेत्‍ता डॉ एस बी पवार यांनी झुम क्‍लाउड अॅपच्‍या माध्‍यमातुन दिनांक 12 एप्रिल रोजी औरंगाबाद व जालना जिल्‍हयातील शेतक-यांशी संवाद साधला. डॉ एम बी पाटील यांनी मोसंबी, डाळिंब व ऊस पिकावर मार्गदर्शन केले. सध्‍या मोसंबी व आबा फळपिकात फळगळ होत असल्‍याचे शेतक-यांनी सांगितले. यासाठी मोसंबी पिकातील फळगळ कमी करण्‍यासाठी दोन फवारणीच्‍या शिफारस डॉ एम बी पाटील यांनी केली, यात एनएए 2 ग्रॅम व 1 किलो युरिया शंभर लिटर पाण्‍यात मिसळुण एक फवारणी घेऊन पंधरा दिवसांनी 13:00:45 दिड किलो व जिब्रलिक अॅसिड 2 ग्रॅम शंभर लिटर पाण्‍यात मिसळुण फवारणी करण्‍याचा सल्‍ला दिला. तसेच आंबा पिकातील फळगळ कमी करण्‍यासाठी 13:00:45 दिड किलो व जिब्रलिक अॅसिड 2 ग्रॅम शंभर लिटर पाण्‍यात मिसळुण फवारणी करण्‍याचा सल्‍ला दिला.
यावेळी डॉ एस बी पवार यांनी कोरोना विषाणुच्‍या पार्श्‍वभुमीवर शेतकरी बांधवानी कोणती काळजी घ्‍यावी याविषयी भारतीय कृषि संशोधन परिषदेने दिलेल्‍या सुचनेनुसार शेतीत करावायाच्‍या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले तसेच उन्‍हाळी हंगामात ऊस पिकाचे आंतरमशागत, किड व रोग व्‍यवस्‍थापन, खत व पाणी व्‍यवस्‍थापन यावर चर्चा करण्‍यात आली.
ऑनलाईन चर्चेमध्‍ये औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्राचे डॉ किशोर झाडे, जालना कृषि विज्ञान केंद्राचे डॉ सोनुने यांनीही सहभाग घेतला. तसेच औरंगाबाद व जालना जिल्‍हयातील 25 ते 30 शेतकरी बांधवानी सहभाग घेतला व त्‍यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली.

Saturday, April 11, 2020

वनामकृविच्या वतीने शास्त्रज्ञ - शेतकरी ऑनलाइन संवादाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजता फळबाग व्यवस्थापन या विषयावर झुम क्‍लाउड मिटिंग (Zoom Cloud meeting) माध्यमाद्वारे ऑनलाईन शास्‍त्रज्ञ-शेतकरी संवादाचे आयोजन करण्‍यात आला असुन विद्यापीठातील फळबाग तज्ञ डॉ. बी. एस. कलालबंडी हे मार्गदर्शन करणार आहे. तरी शेतकरी बांधवानी यात सहभागी व्हावे, असे आवाहन विस्तार कृषीविद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले आहे. यासाठी आपल्या मोबाइलवर झुम क्‍लाउड मिटिंग अॅप (zoom Cloud meeting app) डाउनलोड करावे लागेल. 
डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=us.zoom.videomeetings येथे क्लिक करा. या तंञाची आपण पुर्ण पडताळणी करूनच सहभागी व्हावे
मिटिंग आयडी 6209695593 असुन मिटिंग पासवर्ड kph4567 आहे.  

Thursday, April 9, 2020

झुम क्‍लाउड मिटिंगच्‍या माध्‍यमातुन कृषि विद्यापीठाचा शेतक-यांशी ऑनलाईन संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्‍त्रज्ञ शेतक-यांच्‍या वेळोवेळी शेतावर प्रत्‍यक्ष जाऊन तसेच केंद्रास शेतकरी भेटी दरम्‍यान कृषि सल्‍ला देतात. परंतु कोरोना विषाणू संसर्ग रोखण्‍यासाठी देशात लॉकडाऊन सुरू असल्‍यामुळे शेतावर जाण्‍यासाठी मर्यादा आल्‍या आहेत. त्‍यामुळे दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 12 यावेळेत कृषी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी झुम क्‍लाउड मिटिंग या मोबाईल अॅपव्‍दारे शेतक-यांशी संवाद साधण्‍यात आला. यासाठी कृषी विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे व डॉ शंकरी पुरी यांनी पुढाकार घेतला. यावेळी डॉ आनंद दौडे, डॉ डि डी पटाईत, डॉ प्रविण कापसे आदी शास्‍त्रज्ञ मोबाईल व्हिडिओच्‍या माध्‍यमातुन सहभागी झाले होते. तर या व्हिडिओ बैठकीमध्‍ये मराठवाडयातील परभणी, उस्‍मानाबाद, हिंगोली, बीड, वाशिम आदी जिल्‍हयातील 25 शेतकरी सहभागी झाले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी संवाद साधत विविध पिकांची सद्याची परिस्थिती जाणुन घेऊन येत्‍या खरीप हंगामात कीड, रोगाचा प्रादुर्भाव रोखण्‍याकरिता पिकांचे फेरपालट करणे आवश्‍यक असल्‍याचा सल्‍ला दिला. कापसावरील गुलाबी बोंडअळी व मक्यावरील लष्‍करी अळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात होऊ नये याकरिता उन्‍हाळयात करावयाची उपाय योजना, कोरोना रोगाच्‍या पार्श्‍वभुमीवर शेतकरी बांधवानी शेतात काम करतांना घ्‍यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. शेतक-यांनी विचारलेल्‍या शंकाचे समाधान विद्यापीठ शास्‍त्रज्ञानी केले
या पुढील काळात शेतक-यांशी आठवडयातील एक किंवा दोन दिवस ऑनलाईन संवाद साधण्‍यावर भर दिला जाणार असुन येत्‍या सोमवारी दिनांक 13 रोजी सकाळी 11 ते 12 दरम्‍यान फळबाग व्‍यवस्‍थापन या विषयावर शेतक-यांशी ऑनलाईन संवाद साधला जाणार आहे, या‍करिता ऑनलाईन बैठकीचा आयडी व पासवर्ड रविवारी पाठविण्‍यात येणार आहे, तरी शेतक-यांनी यात सहभागी होण्‍याचे आवाहन डॉ यु एन आळसे यांनी केले.

Saturday, April 4, 2020

वनामकृविस करडई संशोधनाकरिता प्रकल्‍प मंजुर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत करडई संशोधन प्रकल्‍पास भारत सरकारच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्‍या जैवतंत्रज्ञान शास्‍त्र विभागाच्‍या मार्फत करडई संशोधनाकरिता नेटवर्क प्रकल्‍प पुढील पाच वर्षाकरिता मंजुर झाला आहे. या संशोधन प्रकल्‍पात हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्‍था, नवी दिल्‍ली येथील राष्‍ट्रीय वनस्‍पती अनुवांशिक संशोधन ब्‍युरो, दिल्‍ली विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ व लुधियाना येथील पंजाब कृषि विद्यापीठ या प्रमुख संस्‍था एकत्रितरित्‍या संशोधनात सहभागी आहेत.
करडई या प्रमुख तेलबिया पिकाच्‍या संशोधनाकरिता विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांच्‍या कडुन या नेटवर्क प्रकल्‍पास रू 19.59 कोटी इतके अनुदान मंजुर झाले असुन यात परभणी येथील अखिल भारतीय सन्‍मवयीत करडई संशोधन प्रकल्‍पास रू 48.65 लाख इतके अनुदान संशोधनासाठी प्राप्‍त होणार आहे. या प्रकल्‍पाचा मुख्‍य उद्देश करडई सुधारणेकरिता जनुकीय विविधतेचा शोध (Exploring Genetic Diversity for improvement of safflower through genomic – assisted discovery of QTLs / Genes Associated with Agronomic Traits) हा आहे. यात कोरडवाहु करडई पिकांच्‍या उत्‍पादन वाढीसोबतच बियातील तेलाचे प्रमाण व गुणवत्‍तेत वाढीकरिता फेनोटाईप व आण्विक मोलेक्‍युलार संच तयार करणे अंर्तभुत आहे. तसेच तेलबिया पिकाखालील क्षेत्र वाढीचे उ‍द्देष्‍ट आहे. या संशोधन प्रकल्‍पाच्‍या मुख्‍य अन्‍वेषक पदाची जबाबदारी प्रभारी अधिकारी डॉ एस बी घुगे व सहाय्यक मुख्‍य अन्‍वेषक करडई कृषि विद्यावेत्‍ता प्रा प्रितम भुतडा यांच्‍या कडे सोपवण्‍यात आली आहे. या प्रकल्‍पासाठी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व हैद्राबाद येथील तेलबिया संशोधन संचालनालय यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले, अशी माहिती डॉ एस बी घुगे यांनी दिली.  

Saturday, March 28, 2020

कृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय

विशाल सरवदे
महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2020 सामा‍ईक प्रवेश परिक्षेत कृषी शाखेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे हा राज्‍यात प्रथम आला असुन केशव सुर्यवंशी हा व्दितीय क्रमांकाने उत्‍तीर्ण झाला आहेतसेच महाविद्यालयाचा शिवसंदिप रणखांब आठवा क्रमांकाने तर ऋ‍तुजा पाटील तेराव्‍या, दिनेश कांबळे पंधरा तर मदन जमदाडे सोळाव्‍या क्रमांकाने उर्त्‍तीण झाले आहेत. परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी राज्‍यात प्रथम येण्‍याचे हे तिसरे वर्ष आहे. सदरिल परिक्षेसाठी महाविद्यालयातील शिक्षण विभाग व प्राध्‍यापकवृंदाच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्‍यात येऊन सराव परिक्षा घेण्‍यात येते. यशाबाबत कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी अभिनंदन केले सदरिल परिक्षा राज्‍यातील चारही कृ‍षि विद्यापीठातील साडेसात हजार पेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यांनी दिली.    
केशव सुर्यवंशी

Friday, March 27, 2020