Saturday, July 18, 2020

वनामकृवितील क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत हिंगोली जिल्ह्यात अधिकारी व कर्मचा-याकरिता ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) २०२०-२१ अंतर्गत" हिंगोली जिल्हयातील कृषि विभागातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासाठी कोरोना रोगाच्‍या पार्श्वभुमीवर डिजीटल प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक १६ जुलै रोजी करण्यात आल होत. या प्रशिक्षणाच्‍या उद्घाटन कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी क्रॉपसॅप प्रकल्पाचे राज्यस्तरीय सकाणू समिती सदस्य विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड हे होते तर उपविभागीय हिंगोलीचे कृषि अधिकारी श्री. बी. एस. कच्छवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात श्री. बी. एस. कच्छवे यांनी सांगितले की, हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन खालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून दिवसेंदिवस सोयाबीन मध्ये नवनवीन किड रोगाचे प्रश्न निर्माण होत आहेत, त्यासाठी क्षेत्रीय कर्मचा-यांनी जबाबदारीने सर्वेक्षनाचे काम करावे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजीव बंटेवाड म्‍हणाले की, क्रॉपसॅप हा महाराष्ट्र शासनाचा अभिनव प्रकल्प असून या मध्ये कृषि विभाग राज्यातील चारही कृषि विद्यापीठा सोबतच राष्ट्रीय स्तरावरील आठ संशोधन संस्था अत्यंत समन्वयाने काम करत आहेत. अचूक व वेळेवर सल्ला मिळाल्यास किड रोगाचे वेळीच प्रभावीपणे व्यवस्थापन करने शक्य होइल. किड व्यवस्थापना बाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी कृषि किटकशास्त्र विभाग सदव तत्पर आहे.

तांत्रिक प्रशिक्षणटोळधाड किड व्यवस्थापनावर डॉ. संजीव बंटेवाड, सोयाबिन पिकावरील प्रमुख किडींचे सर्वेक्षण व व्यवस्थापनावर डॉ. बस्वराज भेदे, कापुस पिकावरील प्रमुख कीडींचे सर्वेक्षण व व्यवस्थापनावर डॉ.अनंत बडगुजर, मका, ज्वारी पिकावरील नवीन लष्करी अळी चे व्यवस्थापनावर डॉ. धीरज कदम, तर उस पिकावरील हुमणी अळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनावर डॉ. पुरूषोत्तम नेहरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक क्रॉपसॅप प्रकल्पाचे समन्वय अधिकारी डॉ.अनंत बडगुजर यांनी केले. प्रशिक्षणास हिंगोली जिल्ह्यातील कृषि विभागाचे जवळपास १८५ अधिकारी कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला.

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान पदवी अभ्‍यासक्रम




Friday, July 17, 2020

संत्री व मोसंबीवरील पाने खाणारी अळी व सिट्रस सायला किडींचा प्रादुर्भाव

वनामकृविचा शास्‍त्रज्ञांचा कीड व्यवस्थापनकरिता सल्‍ला

पाने खाणारी अळी

सध्यस्थितीत संत्रा व मोसंबीच्या फळबागांना नवीन नवती फुटत असुन मोठया बागांना मृगबहाराची फुलधारणा होत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या फळपिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरतन खंदारे यांनी मौजे जांब, मांडाखळी, सोन्ना, पेडगाव, मानवत आदीं ठिकाणी शेतक-यांच्‍या फळबागाची पाहणी केली असता मोसंबी व संत्रा पिकावर पाने खाणारी अळी (लेमन बटरफ्लाय) व सिट्रस सायला या कीडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळुन आला आहे. या कीडींचे व्यवस्थापन करण्‍यात करिता पुढील उपाय योजना शास्‍त्रज्ञांनी सुचविल्‍या आहेत.

पाने खाणारी अळी - या किडीचा त्रास प्रामुख्याने रोपवाटीकेत होतो. याचे पतंग काळया पिवळया आकर्षक रंगाचे असतात. लहान अळया तपकिरी रंगाच्या व त्यावर पांढरे ठिपके असतात, त्यामुळे त्या पक्षाची विष्ठा पडल्यासारख्या दिसतात. मोठया अळया हिरवट रंगाच्या असतात. या अळया कोवळी पाने खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाड पर्णविरहीत दिसते.

पाने खाणारी अळीचे व्यवस्थापन :अंडी, अळया व कोष हातांनी गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात बुडवून मारणे. झाड हालवून खाली पडलेल्या अळया वेचून नष्ट करणे. बागेतील अथवा आजुबाजूस असलेले बावची या तणाचा बंदोबस्त करावा. तसेच मित्र कीटक जसे ट्रायकोग्रामा, अपेन्टेलस, कॅरोप्स, ब्रॅचीमेरीया, टेरोमॅल्स आदींचे संवर्धन करावे.

फवारणी - बॅसिलस थुरीनजिएन्सीस (बीटी) पावडरची प्रति दहा लिटर पाण्‍यात 20 ग्रॅम याप्रमाणे मिसळुन फवारणी करावी. किंवा क्विनालफॉस 20 ईसी 30 मि. ली. किंवा थायोडीकार्ब 70 डब्लुपी 10 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

सिट्रस सायला कीड - या किडीचा प्रौढ पिवळसर करडया रंगाचा असतो. पंखाच्या विशिष्ट रचनेमुळे त्याचा मागील भाग उंचावल्यासारखा दिसतो. पिल्ले मळकट रंगाची असतात. या किडींचे पिल्ले कवळी पाने व फांदया यातुन रसशोषण करतात. त्यामुळे कवळी पाने व कळयांची गळ होते व त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

सिट्रस सायला कीडीचे व्यवस्थापन : या कीडीचे पर्यायी खादय वनस्पती (कडीपत्ता) मोसंबीच्या बागेमध्ये असु नये. पिवळया चिकट सापळयाचा वापर करावा. ढालकिडा, क्रायसोपा,सिरफीड माशी, टॅमरॅक्सीया रॅडीयाटा आदी मित्रकीडीचे संवर्धन करावे.

फवारणी - इमिडाक्लोप्रीड 17.8 एसएल 1 मि.ली. किंवा थायामिथॉक्झाम 25 डब्ल्यु जी 1 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून नवती फुटण्याच्या वेळी म्हणजे जुन-जुलै मध्ये सायलाचा प्रादुर्भाव दिसताच करावा. गरज पडल्यास पंधरा दिवसाच्या आंतराने दुसरी फवारणी करावी, परंतु कीटकनाशक बदलुन वापरावे.

वरील कीडीचे व्यवस्थापन करून होणारे संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.संजीव बंटेवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पाने खाणारी अळीचा कोष
पाने खाणारी अळीची अंडीी

पाने खाणारी लहान अळी
पाने खाणारी अळीचा पतंग

सिट्रस सायला

Wednesday, July 15, 2020

वनामकृवि व आयआयटी खरगपुर संयुक्‍त विद्यमाने आयोजित डिजिटल तंत्रज्ञानाची कृषिक्षेत्रातील उपयोगिता या विषयावर प्रशिक्षणास प्रारंभ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍प आणि आयआयटी, खरगपुर यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची उपयोगिता या विषयावर दोन आठवड्यच्या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 13 ते 24 जुलै दरम्यान करण्यात आले असुन प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक 13 जुलै रोजी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटी, खरगपुर चे संचालक मा. डॉ. व्ही. के. तिवारी उपस्थित होते. तर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, आयआयटी खरगपुरचे उपसंचालक डॉ. एस. के. भट्टाचार्य, अधिष्ठाता डॉ. सुमन चक्रवर्ती, नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

मार्गदर्शनात डॉ. व्ही.के. तिवारी म्‍हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करणे शक्य आहे. कोरोनोत्तर काळात कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागणार आहे. संशोधनाच्‍या माध्‍यमातुन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी शास्त्रज्ञ, पदवीत्तर विद्यार्थी, प्राध्यापक यांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी करून प्रशिक्षण आयोजनाबद्दल नाहेप खरगपूर सेंटरचे अभिनंदन केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले यांनी प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देऊन सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ यांना निश्चितच लाभ होईल, अशी आशा व्यक्त केली.

 

डॉ. एस.के.भट्टाचार्य यांनी आयआयटी खरगपूर येथील संशोधन कार्याची माहीती देऊन प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले तर प्रशिक्षणाचे आयोजक प्रा. डॉ. राजेंद्र माचावरम यांनी प्रशिक्षणा विषयी माहिती दिली तसेच डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्प विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन आयआयटीतील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख डॉ. टि.के. भट्टाचार्य यांनी केले तर आभार डॉ. .के. देब यांनी मानले. प्रशिक्षण वर्गासाठी पदव्युत्त्तर-आचार्य पदवीचे विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ असे एकूण 80 जणांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे नियोजन नाहेप खरगपुर चे सहप्रमुख अन्वेषक डॉ. राजेंद्र मचावरम यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रशिक्षण समन्वयक प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ.अनिकेत वाईकर, इंजि. अपूर्वा देशमुख, इंजि. रश्मी बंगाळे, इंजि.शिवानंद शिवपुजे आदींचे तांत्रिक पाठबळ मिळाले.

 


Tuesday, July 14, 2020

वनामकृवित क्रॉपसॅप अंतर्गत जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

प्रकल्‍पा अंतर्गत मराठवाडयातील मुख्‍य पिकांचे प्रक्षेत्र सर्वेक्षण करून कीड – रोगांबाबत दर आठवडयाला देण्‍यात येतो सल्‍ला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग व कृषि विभागमहाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 2020-21 अंतर्गत" परभणी जिल्हयातील कृषि विभागातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासाठी कोविड-19 रोगाच्‍या पार्श्वभुमीवर ऑनलाईन प्रशिक्षणाचे दिनांक 10 जुलै रोजी आयोजन करण्यात आल होतप्रशिक्षण उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी विस्तार शिक्षण संचालक डॉदेवराव देवसरकर हे होते तर क्रॉपसॅप प्रकल्प राज्यस्तरीय सकाणू समितीचे सदस्य तथा कृषि किटकशास्त्र विभाग विभाग प्रमुख डॉसंजीव बंटेवाडपरभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे, उप विभागीय कृषि अधिकारी श्री. सागर खटकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 2020-21 अंतर्गत" परभणी जिल्हयातील कृषि विभागातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासाठी कोविड-19 रोगाच्‍या पार्श्वभुमीवर ऑनलाईन प्रशिक्षणाचे दिनांक 10 जुलै रोजी आयोजन करण्यात आल होत. प्रशिक्षण उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर हे होते तर क्रॉपसॅप प्रकल्प राज्यस्तरीय सकाणू समितीचे सदस्य तथा कृषि किटकशास्त्र विभाग विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे, उप विभागीय कृषि अधिकारी श्री. सागर खटकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय मार्गदर्शनात डॉ. देवराव देवसरकर यांनी येत्या हंगामात किड रोगांचे सर्वेक्षण वेळेवर करुन विद्यापीठाव्दारे देण्यात येणारा सल्ला शेतकऱ्यांना त्‍वरित पोहचण्याची महत्वाची जबाबदारी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांवर असुन कपाशीतील बोंडअळी व्यवस्थापनासाठी किडींचे अचूक सर्वेक्षण करणे, तसेच कामगंध सापळयांचा प्रभावी वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा शेतक-यांमधील जास्‍तीत जास्‍त अवलंब होणे गरजेचे आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

श्री. संतोष आळसे यांनी कीड सर्वेक्षणाचे महत्व विषद करून पिकांवरील कीड - रोगांबाबत शासन अत्यंत गंभीर आहे. कृषि विभागातील सर्व कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांनी सर्वेक्षणाचे काम जबाबदारीने द काटेकोरपणे करण्‍याचा सल्‍ला दिला. श्री.सागर खटकाळे यांनी क्रॉपसॅप प्रकल्प मार्गदर्शक सुचना व गावांची व प्लॉटची निवड याबाबत मार्गदर्शन केले.

तांत्रिक प्रशिक्षणत डॉ. संजीव बंटेवाड यांनी मका, ज्वारी पिकावरील नवीन लष्करी अळी व टोळधाड या किडींचे सर्वेक्षण व व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले तर उस पिकावरील हुमणी अळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनबाबत डॉ. पुरूषोत्तम झंवर, सोयाबिन पिकावरील प्रमुख किडींचे सर्वेक्षण व व्यवस्थापनाबाबत डॉ.बस्वराज भेदे, कापुस पिकावरील प्रमुख कीडींचे सर्वेक्षण व व्यवस्थापनाबाबत डॉ.अनंत बडगुजर यांनी मार्गदर्शन केले.

सदरिल प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाडयातील कापुस, सोयाबिन, तुर, मका, ज्वारी व उस या पिकाचे प्रक्षेत्रावर सर्वेक्षण करून कीड रोगांबाबतची माहिती ऑनलाईन संकलीत करून माहितीचे विश्लेषण कृषि विदयापीठाव्दारे केले जाते, त्‍याआधारे कीड व रोग व्यवस्थापनाबाबतचा सल्ला आठवडयातुन दोनदा संगणकीय प्रणालीव्दारे उपलब्ध करून देण्यात येते. कार्यक्रमाचे प्रास्‍‍ताविक श्री संतोष आळसे यांनी केले तर आभार तंत्र अधिकारी श्री. संदिप जगताप यांनी मानले. प्रशिक्षणासाठी जवळपास 200 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.


Saturday, July 11, 2020

वनामकृवित डिजिटल शेती तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी महिलांची आत्मनिर्भरता या राज्यस्तरीय एक आठवड्याच्या वेबिनारचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) सेंटर ऑफ एक्सलन्स कृषी उत्पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती या प्रकल्पाच्‍या वतीने डिजिटल शेती तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी महिलांची आत्मनिर्भरता या राज्यस्तरीय एक आठवड्याच्या वेबिनारच्या समारोप समारंभ दिनांक १० जुलै रोजी पार पडला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे नाहेप प्रकल्‍पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर. सी.  अग्रवाल, पुणे येथीलअभिनव फार्मर्स क्लबचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बोडके, भारताच्या प्रथम महिला शेतकरी पुरस्कार प्राप्त  बारामती येथील प्युर ऑरगॅनिक ग्रुपच्‍या अध्यक्षा सौ स्वाती शिंगाडे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज  गोखले, आयोजक प्राचार्या डॉ. जयश्री झेंड, नाहेपचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाळ शिंदे, आयोजन सचिव डॉ  वीणा भालेराव उपस्थित होते.

मार्गदर्शनात प्रमुख अतिथी मा डॉ आर. सी. अग्रवाल म्‍हणाले की, महिला शेतकऱ्यांची कृषि विकासात महत्‍वाची भूमिका आहे. आज शेतकरी बांधव मोबाईल फोन उपयोग कृषी तंत्रज्ञानाची माहिती प्राप्‍त करण्‍यासाठी करत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा आधारेच कृषिक्षेत्रात चौथ्या हरितक्रांती कडे वाटचाल चालू आहे. केवळ मोठ्या प्रमाणावर अन्न उत्पादनापेक्षा ही सकस आहार, पोषक अन्न निर्मितीकडे आपण वळलो आहोत. शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग फवारणीसाठी करण्यात येऊ लागला आहे. पिकावरील कीड – रोग प्रादुर्भाव ड्रोन व रिमोट सेन्‍सींन तंत्रज्ञानद्वारे शोधून केवळ तेवढ्याच वनस्पतींवर कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचु शकतो, पिकावर होणारा अतिरिक्‍त किडकनाशकांचा मारा कमी होतो, पोषक अन्न मिळण्यास मदत होते असेही ते म्हणाले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतकरी महिलांना डिजिटल शेतीद्वारे अनेक अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्क्रांतीची दालने उघडली आहेत. अगदी साक्षर असलेल्या महिला देखील स्मार्टफोनचा उपयोग करून स्मार्ट शेती करत आहेत. कोरोना रोगाच्‍याकाळात उत्पादक हे ग्राहकाच्या शोधात, तर ग्राहक शुद्ध, सकस, सेंद्रिय शेती उत्पादनाच्या शोधात असताना ही संधी ओळखून डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग हा या दोघांमधील दुवा म्हणून करता येईल. डिजिटल तंत्रज्ञानाची जोड शेतकरी महिलांनी दिल्यास त्या स्वतः, सुशिक्षित मुली, बेरोजगार व इतर अनेकांना या साखळीमध्ये जोडून आर्थिक क्रांती घडू शकते, असे ते म्हणाले.

श्री ज्ञानेश्वर बोडके आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, महिलांना मार्केटिंग अधिक चांगल्या प्रकारे करता येते. महिलांमधील व्यावसायिका वाढवुन ग्राहक हाताळण्यास शिकले पाहिजे. कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव अनेक परप्रांतातील व्‍यवसायिक. महाराष्‍ट्र राज्‍य सोडुन गेले असुन राज्‍यातील युवकांना व्‍यवसायाच्‍या उपलब्‍ध संधीचा उपयोग घ्यावा. महिलांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती उत्पादनांची विक्री अगदी सहज सोप्या पद्धतीने शेतकरी महिला करू शकतील अशी अनेक उदाहरणे देऊन त्‍यांनी महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित केले.

यावेळी सौ स्वाती शिंगाडे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाल्‍या की, महिलांनी संघटित होऊन विविध व्यवसाय संधी द्वारे आत्मनिर्भर व्हावे. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग ऑनलाइन पेमेंट करणे, ऑनलाईन ऑर्डर स्वीकारणे, ऑनलाइन फोनवर मालाच पुरवठा करणे इत्यादी अनेक कामे केली जात आहेत. पूर्वापार चालत आलेली मेहनतीची कामे कमी करून स्मार्ट महिला शेतकरी बनावे, असेही त्यांनी महिलांना आवाहन केले. याप्रसंगी संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी महिलांना कृषी उद्योग आधारित अनेक व्यवसाय सेवा संधीची उदाहरणे देऊन शेतकरी महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याचे आवाहन केले.

डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्‍पाच्‍या वतीने कोरोनाच्या काळात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विविध ऑनलाईन घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गांची माहिती दिली. सहभागी प्रशिक्षणार्थ्‍यी सौ वंदना पाटेकर जालना, अंजुषा कुलकर्णी औरंगाबाद, मोनिका भावसार जळगाव, रूपाली देशमुख ठाणे, लक्ष्मी कोकाटे उस्मानाबाद यांनी या वेबिनार  च्या उपयुक्ततेविषयी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले तर आभार आयोजन सचिव डॉ गोदावरी पवार मानले. प्रशिक्षणात पाचशे जास्‍त महिला, युवती व विद्यार्थी सहभागीझाले होते.

Friday, July 10, 2020

कृषि यांत्रीकीकरणाचे तंत्र या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचे औचीत्य म्हणुन दि. 01 जुलै हा राज्यात कृषि दिन म्हणुन साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल मा. श्री भगत सिंह कोश्‍यारी व मा. कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतुन यावर्षी दि. 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान कृषि संजीवनी सप्ताहकुलगुरु मा डॉ अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्या संयुक्त वतीने मराठवाडयातील आठही जिल्‍हयात शेतक-यांच्या शेतावर भेट देवून मार्गदर्शन तथा ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजीत करण्यात आले. विद्यापीठातील कृषि अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषि यंत्र व क्ती विभाग आणि अपारंपारिक उर्जा यांच्या वतीने कृषि यांत्रीकीकरणाचे तंत्र, सुधारीत शेतीचे मंत्रया विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. 7 जुलै रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ उदय खोडके म्‍हणाले की, शेतकरी बंधुनी उत्‍पन्‍न वाढीकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. वाढती मजुरी व योग्‍य वेळी मजुरांची अनुपलब्‍धता यामुळे कृषि यांत्रिकीकरणाचा कास धरावी लागेल. जमीन धारणेनुसार कृषि विभागाच्या विविध योजनेतुन यांत्रिकीकरणाकरित उपलब्ध अनुदानावर असलेली शेती अवचारे व यंत्रे घ्‍यावीत व जास्‍तीत जास्‍त वापर करावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यशाळे प्रमुख वक्ते डॉ. स्मिता सोलंकी यांनी कृषि यांत्रीकीकरण विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. आर.टी. रामटेके यांनी सौर उर्जा चलीत विविध कृषि अवजारे या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. पंडीत मुंडे यांनी ग्रामीण युवकासाठी कृषि यांत्रीकीकरणातील संधी, डॉ. गोपाळ शिंदे यांनी डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे स्मार्ट शेती आणि डॉ. डि. डी. टेकाळे यांनी ट्रॅक्टरची निवड व देखभाल या विषयावर मार्गदर्शन व ऑनलाईन सादरीकरण केले. सहभागी प्रशिक्षणार्थ्‍यींनी विचारलेले कृषि यांत्रीकीकरणावर कृषि अभियंतानी उत्‍तरे दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयोज प्रा. दत्तात्रय पाटील यांनी केले तर आभार प्रा. दयानंद टेकाळे यांनी मानले. कार्यक्रम यस्वीतेसाठी नाहेप प्रकल्पातील वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहाय्यक अभियंत्या यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेत राज्‍यातील शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि अभियंते, व विद्यार्थ्‍यी सहभागी झाले होते.