Friday, July 16, 2021

सोयाबीन पिकावरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडींचे करा वेळीच व्यवस्थापन

छायाचित्र – चक्रीभुंगा अळी अवस्था


ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची पेरणी जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात केली त्यांचे पीक २५ ते ३० दिवसांचे आहे, या पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. तर ज्या शेतक-यांनी जुलै महिन्याच्या दुस-या आठवडयात पाउस झाल्यानंतर पेरणी केली आहे अशा पिकावरसुद्धा पुढील काही दिवसात खोडमाशी व चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधुनी जागरूक राहून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभागाने केले आहे.  

खोडमाशी प्रादुर्भाव : 

खोडमाशी लहान काळया रंगाची असुन पानांवर व देठावर अंडी देते. अंडयातुन निघालेली फिकट पिवळया रंगाची प्रथम पानाच्या शिरेला छिद्र करते नंतर पानाच्या देठातून फांदीत किंवा झाडाच्या मुख्य खोडात प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते. अळी खोडमाशीचा प्रादुर्भाव पिक लहान असतानाच सहजपणे ओळखु येतो. जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमांशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता असते. असा शेंडा मधोमध कापल्यास आत मध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही. अळी व कोष अवस्था फांदयात व मुख्य खोडात असते. शेवटी फक्त प्रौढ माशी निघून छिद्र फांदीच्या खोडाजवळील बाजूस दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत झाल्यास झाड वाळते, अशा कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते शेंगातल दाण्याचे वजन कमी होउन १५ ते ३० टक्क्या पर्यंत उत्पादनात घट येते.

चक्रीभुंगा प्रादुर्भाव : 

चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर मुख्य खोडावर एकमेकास समांतर दोन (चक्र) काप तयार करु त्यामधे अंडी टाकते. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रीभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते. पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असण्याची तसेच त्यातून लवकरच अळी निघून ती नुकसान सुरु करण्याची शक्यता असते. चक्रीभुंग्याने केलेल्या खापेमुळे वरच्या खापेच्या वरील भाग वाळून जातो. अंडयातून निघालेली अळी पानाचे देठ, फांदी व खोड आतून पोखरत जमिनीच्या दिशेने जाते. साधारणता पीक दिड महिन्याचे झाल्यानंतर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यास झाड न वळ ता कमी शेंगा लागतात त्यामुले उत्पादनात घट येते.


खोडमाशी व चक्रीभुंगा किडींच्‍या व्यवस्थापन करिता पुढील उपाय योजना कराव्‍यात

ज्या भागामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव नेहमीच मोठ्या प्रमाणात दिसून येतो,  त्या ठिकाणी  पिकाची पेरणी जून अखेर पर्यंत करायला पाहिजे. सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास कीटकनाशकाची फवारणी करणे सोयीस्कर होते. एकात्मिक किड व्यवस्थापन करताना शेतात सुरवातीपासून खोडमाशी व चक्री भुंगा प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या व झाडे या आतील किडीसह नष्ट कराव्यात. पिकाच्या सुरुवातीपासुन 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

खोडमाशीमुळे 10 ते 15 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे व चक्रीभुंगा 3 ते 5 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे ही आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच लेबलक्लेम नुसार थायमिथोक्झाम 12.6 अधिक लॅमडासाहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 2.5 मिली किंवा ईथीऑन 50 ईसी 30 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 एससी 3 मिली या कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. स‍दरिल किटकनाशकाची मात्रा साध्‍या पंपाकरिता असुन पॉवर स्‍प्रे करिता किटकनाशकाची मात्रा तीन पट करावे. दोन किटकनाशकाचे मिश्रण न करता केवळ एकच किटकनाशकाची संरक्षक कपडे घालून सकाळी किंवा सांयकाळच्या वेळेस फवारणी करावी.

शेतकरी बांधवानी सुरुवातीपासुन सोयाबीन पिकावरील खोडकिडींचे बारकाईने निरीक्षण करावे जेणे करुन उत्पादनात घट येणार नाही. पिकाच्या सुरुवातीपासुन एकात्मिक किड व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


छायाचित्र – खोडमाशी अळी अवस्था


Thursday, July 15, 2021

दिनांक ११ जुलै रोजीच्या अतिवृष्टीमुळे वनामकृवि अंतर्गत परभणी मुख्यालयातील बीजोत्पादन कार्यक्रमाचे मोठे नुकसान


दिनांक ११ जुलै रोजीच्‍या झालेल्‍या अतिवृष्टीमुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी मुख्यालयाच्या विविध संशोधन केंद्रे व इतर कार्यालये अंतर्गत घेण्‍यात आलेल्‍या या वर्षीच्‍या खरीप हंगामातील बीजोत्पादन कार्यक्रम धोक्‍यात आला आहे. विद्यापीठाच्या वतीने खरीप २०२१ हंगामात एकुण ६२३.४६ हेक्‍टर क्षेत्रावर विविध पिकांच्या मुख्यत: सोयाबीन, तूर, मुग व उडीद आदी पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला होता. परंतु दिनांक ११ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे (२३२.५ मिमी) विद्यापीठाच्या मुख्यालयी राबविण्यात येत असलेल्या १०८.० हेक्‍टरी (१७.३२ टक्के) क्षेत्रावरील बीजोत्पादन कार्यक्रम बाधित झाला आहे. विद्यापीठ मुख्यालयातील पाउसाची वार्षिक सरासरी ७७३.०० मिमी इतका असून यावर्षी दिनांक १ जून ते दिनांक १४ जुलै पर्यंत ७४०.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्‍हणजेचे जून व जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्‍या ९५.७ टक्के एवढा पाउस हा झाला आहे.

या अनुषंगाने कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३ जुलै रोजी विविध संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी, कार्यालय प्रमुख, विविध विषयांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ आदींची आयोजित बैठकीत नुकसानीचा आढावा घेण्‍यात आला. यात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी अतिवृष्टीमुळे खरीप २०२१ बीजोत्पादन कार्यक्रमाच्या केंद्र / कार्यालय निहाय नुकसानीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे सोयाबीन व मुग बीजोत्पादनाचे क्षेत्र सर्वात जास्त बाधित झाले असल्‍याचे निदर्शनास आले आहे. बैठकीत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी नियोजित बीजोत्पादन कार्यक्रमाचे उदिष्ट गाठण्यासाठी आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. 

या बैठकीत सर्व संबंधीतांना बीजोत्‍पादनाचे उदिष्‍ट गाठण्‍याकरिता बाधित क्षेत्रातून पावसाचे साचलेले पाणी त्‍वरीत निचरा करून घेणे व परिस्थिती लक्षात घेवून दुबार पेरणी करण्यात यावी,असे सुचित करण्‍यात आले असुन पावसामुळे बाधित झालेल्या प्रत्येक प्रक्षेत्रावर जेथे शक्य असेल तेथे वापसास्थिती आल्यानंतर आहे त्याच पिक / वाणाची दुबार पेरणी करून घ्यावी तसेच अबाधित क्षेत्रावर खुरपणी, कोळपणी आदी आंतरमशागतीची कामे शेत जमीन परिस्थीतीनुसार हाती घेवून पिक परिस्थित सुधारण्यासाठी प्रयत्न करावे, अश्‍या सुचना देण्‍यात आल्‍या. दिनांक १३ जुलै रोजी देखिल ५२.३० मिमी पाउस झाल्यामुळे बीजोत्पादन कार्यक्रमाचे अधिक क्षेत्र बाधित होण्याची शक्यता असल्‍याचे विद्यापीठाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे. 





Thursday, July 8, 2021

क्रॉपसॅप अंतर्गत विभागीय ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 2021-22 अंतर्गत मराठवाडयातील कृषि अधिकारी व कर्मचारी यांच्‍या करिता कोरोना संक्रमणाच्‍या पार्श्‍वभुमीवर ऑनलाईन प्रशिक्षणाचे दिनांक जुलै रोजी आयोजन करण्यात आल होत.

प्रशिक्षणाच्‍यादघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक डॉ.दिनकर जाधव,  लातुर विभागीय कृषि सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर, कृषि किटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.संतोष आळसे, क्रॉपसॅपचे  समन्वय अधिकारी डॉ. अनंत लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, मागिल दहा वर्षापासुन क्रॉपसॅप प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात येत असुन मराठवाडयातील विविध पिकांवर येणारी कीडींचे व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोह‍चविण्‍याचे चांगले कार्य होत आहे. या प्रकल्‍पामुळे मित्र किटकाचे संवर्धन कसे करावे, निंबोळी अर्काचा वापर करुन कमीत कमी घातक किटकनाशकाचा वापर करुन पर्यावरणस्नेही किड व्यवस्थापन कसे करावे याबाबत वेळोबेळी मार्गदर्शन करण्‍यात येत आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्र अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर म्‍हणाले की, किड-रोग सर्वेक्षण योग्य प्रकारे करून त्यानुसार विद्यापीठाकडुन व कृषि विभागाकडुन व्यवस्थापनाबाबत वेळोवेळी किड रोग नियोजनाचा सल्ला शेतक-यांना देण्यात यावा. यावर्षीच्‍या हंगामात कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व मक्यावरील लष्करी अळी यावर विशेष लक्ष देण्यात यावे असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक डॉ. दिनकर जाधव महणाले की, कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचा-यांनी किड रोग हॉटस्पॉट ओळखून व त्या ठिकाणी जाउन शेतक-यांना किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करावे. मकावरील लष्करी अळीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झालेले आहे, तरी त्याबाबत सतर्क राहून नियंत्रणाचे सल्ले वेळोवेळी दयावे. व शास्त्रज्ञ व कृषि विभाग दोघांनी क्षेत्रीय क्षेत्रावर जाउन काम करावे.

लातुर विभागीय कृषि सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर मार्गदर्शनात सांगितले की कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांना किड सर्वेक्षण हंगामाच्या सुरुवातीपासुन सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वेक्षणातून आर्थिक नुकसान पातळी कळावी व त्यानुसार किड रोग नियंत्रणात सल्ले शेतक-यांना गाव पातळीवर ग्रामपंचायत फलकावर लावावीत तसे  दुरध्वनी संदेश वेळोवेळी द्यावेत. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. संजीव बंटेवाड यांनी कीड सर्वेक्षणाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले. तांत्रिक सत्रात कपाशीवरील किडींचे व्यवस्थापन या विषयावर डॉ. बस्वराज भेदे यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी मका, ज्वारी, व उस पिकावरील लष्करीअळीचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ. संजीव बंटेवाड यांनी तुर पिकावरील किडींचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. सोयाबीन पिकावरील किडींचे व्यवस्थापनावर डॉ. अंनत लाड, सोयाबिन पिकावरील रोग व्यवस्थापनावर डॉ. श्रीकृष्ण झगडे, कापुस आणि तुर पिकावरील रोग व्यवस्थापन  याविषयावर डॉ. संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले. क्रॉपसॅप प्रपत्र नोंदणी, प्रात्याक्षिक व तपासणी याबाबत डॉ. अनंत लाड व डॉ. राजरतन खंदारे यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणात मराठवाडयातील आठही जिल्‍हयातील चारशे पेक्षा अधिक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व कृषि पर्यवेक्षक आदींनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजोग बोकन, श्री. दिपक लाड व श्री.मधुकर मांडगे यांनी परिश्रम घेतले.

Wednesday, July 7, 2021

विद्यापीठाचे माजी विद्यार्थी संघटनेच्या रूपात एकत्रित आल्यास समाज उभारणीचे मोठे कार्य घडु शकते...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

सुवर्ण महोत्‍सवी वर्षानिमित्‍त वनामकृवि, परभणी अॅल्‍युमिनी सदस्‍य नोंदणी अभियानास सुरूवात 


परभणी कृषि विद्यापीठातुन पदवीधर झालेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. शासकीय-अशासकीय संस्‍था, प्रशासकीय क्षेत्रात, बॅकिंग क्षेत्रात, सैनिक दल, खासगी क्षेत्रात तसेच अनेकजण स्‍वयंरोजगार करित असुन कृषि उद्योजक आहेत. आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा वापर करणारे प्रगतशील शेतकरी आहेत. कृषि पदवीधर त्‍यास आपण अॅग्रीकोस म्‍हणतो त्‍याचे म‍हाविद्यालयीन वर्गमित्राचे मोठे जिव्‍हाळाचे नाते असते. मातृसंस्‍थेबाबतची त्‍यांची आस्‍था असते. अनेक सामाजिक उपक्रमात ते हिरारिने सहभाग घेतात. जर हे संघटनेच्‍या रूपाने एकत्रित आल्‍यास समाज उभारणीचे मोठे कार्य आपण करू शकतो, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन 2021-22 हे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष आहे याचे औचित्‍य साधुन विद्यापीठ स्‍थापनेपासुनच्‍या सर्व माजी विद्यार्थ्‍यांची अॅल्‍यमिनी सदस्‍य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक 7 जुलै रोजी झाले, त्‍या प्रसंगी ते बोलत हेाते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन विद्यापीठाचे माजी विद्यार्थी अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर, माजी विद्यार्थी मनपा आयुक्‍त श्री देविदास पवार, स्‍टेट बॅक ऑफ इंडियाचे मकृवि शाखाचे व्‍यवस्‍थापक श्री शिवराम खेडुलकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धीरज कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, ते स्‍वत: परभणी कृषि महाविद्यालयाचे सन 1981 च्‍या बॅचेचे विद्यार्थी आहेत, प्रशासकीय पदावर काम करतांना शेतकरी बांधवासाठी काम करण्‍याची मोठी संधी मला मिळाली. दोन अॅग्रीकोस मित्रात मोठा जिव्‍हाळा असतो, आजही त्‍यांचे मातीशी नात जपुन आहे. सामाजिक बांधिलकी व अॅग्रीकोस यांचे अतुट नाते आहे. विद्यापीठातील काही जमीन कृषि उद्योजकांना फुट पार्क उभारणी करिता दिल्‍यास शेतकरी व कृषि उद्योजकांचा फायदा होऊ शकेल. विद्यापीठ राबवित असलेला हरित विद्यापीठ उपक्रमास अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. याप्रमाणे चांगल्‍या सामाजिक उपक्रम राबविण्‍याकरिता अनेक माजी विद्यार्थी पुढे येतील, यातुन विधायक कार्य आपण करू शकु.

एसबीआय शाखा व्‍यवस्‍थापक श्री शिवराम खेडुलकर यांनी अॅल्‍युमिनी सदस्‍य नोंदणी करिता लवकर एसबीआय बॅक ऑनलाईन सुविधा उपलब्‍ध करून देणार असल्‍याचे सांगितले.

प्रास्‍ताविकात डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, विद्यापीठात प्रवेश घेणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातुन येतात, अनेक वेळेस घरची परिस्थिती हलाखीची असल्‍यामुळे शिक्षणात अडथळे येतात, यात बरेच वेळेस प्राध्‍यापक मंडळी या विद्यार्थ्‍यांना मदत करतात. परंतु सर्व माजी विद्यार्थ्‍यांनी एकत्रित संघटीत प्रयत्‍न केल्‍यास गरजु विद्यार्थ्‍यांना आपण चांगल्‍या प्रकारे मदत करू शकतो, हा प्रामाणिक उद्देश ठेऊन माजी विद्यार्थ्‍यांची अॅल्‍युमिनी स्‍थापन करण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 

यावेळी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी आपली स्‍वत:ची प्रथम अॅल्‍युमिनी सदस्‍यत्‍व नोंदणी केली, त्‍याबाबत त्‍यांना सदस्‍यत्‍व प्रमाणपत्र देण्‍यात आले.  तसेच  अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर, व माजी विद्यार्थी मनपा आयुक्‍त श्री देविदास पवार यांनी ही सदस्‍यत्‍व नोंदणी केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


मौजे माखणी येथे शेतकरी कुटुंबाच्या सक्षमीकरणासाठी कार्यशाळा संपन्न

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालय, माखणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पुर्णा तालुक्यातील माखणी येथे शेतकरी कुटुंबाचे सक्षमीकरण करण्यासाठी दिनांक ६ जुलै रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्यान पंडीत श्री प्रतापराव काळे, सरपंच श्री गोवींदराव अवरगंड उपस्थित होते तर डॉ. इरफाना सिदृदीकी, डॉ. जयश्री रोडगे, डॉ. फरजाना फारुखी, प्रा. निता गायकवाड, डॉ शंकर पुरी आदींची उपस्थिती होती.

कार्यशाळेत महाविद्यालयाच्या तज्ज्ञ प्राध्यापकांनी सहभागी महिलांना मार्गदर्शन केले. यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बाजारपेठेत सध्या मास्कला प्रचंड मागणी असल्याने डॉ. इरफाना सिदृदीकी यांनी अर्थाजनाच्या दृष्टीने व सर्वसामान्यांना वापरण्यासाठी सुविधाजनक असणारे विविध मास्क तयार करण्याचे प्रात्याक्षिकाव्‍दारे मार्गदर्शन केले. डॉ. जयश्री रोडगे यांनी शेतीकामामध्ये महिलांचे श्रम बचतीचे साधने घरातील स्वच्छतेचे व्यवस्थापन याबाबत उपलब्ध असणा-या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. कोरोना विषाणू आजारावर प्रतिबंध करण्याकरिता, कुटुंबाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार आणि प्रक्रिया उद्योग या विषयी डॉ. फरजाना फारुखी यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रा. निता गायकवाड यांनी कोरोना संकटाशी लढण्यासाठी महिलांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करुन महिलांनी स्वत:चे कुटुंबाचे मानसीक स्वास्थ जोपासण्यासाठी आवाहन केले. 

उद्यान पंडीत श्री प्रतापराव काळे यांनी शासनाच्या विविध योजनांचा तसेच विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा सक्षम व्हावे असे आवाहान केले तर सरपंच श्री गोवींदराव अवरगंड यांनी कार्यशाळेत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत समाधान व्यक्त करुन भविष्यात अशा प्रकारचे उपयुक्त कार्यक्रम वारंवार आयोजित केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यशाळेतील लाभार्थ्यांना अभाससंप्र (मानव विकास) विकसीत घडीपत्रिका पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. प्रास्‍ताविकात डॉ. शंकर पुरी यांनी कोरेाना परिस्थितीत शेतीकामामध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली. सुत्रसंचालन माधवराव अवरगंड यांनी केले तर आभार संशोधक सहाय्यक शितल मोरे यांनी मानले. कार्यशाळेचे आयोजन प्राचार्या डॉ जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधक डॉ.शंकर पुरी यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्विततेसाठी धनश्री चव्हाण, शितल मोरे, ग्रामस्थ माधवराव अवरगंड आदीसह समस्त गावकरी यांनी सहकार्य केले.