Showing posts with label Agro Advisory. Show all posts
Showing posts with label Agro Advisory. Show all posts

Sunday, April 14, 2024

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती दिनांक १४ एप्रिल रोजी साजरी करण्‍यात आली. यावेळी भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले आणि भन्ते संघरत्न यांच्याद्वारे वंदना घेण्यात आली. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके,  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ खिजर बेग, संशोधन संचालक (बियाणे) डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव श्री. पुरभा काळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईलडॉ. जया बंगाळेडॉ. राजेश क्षीरसागरडॉ. गजेंद्र लोंढेडॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांनी अध्यक्षीय भाषणात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त शुभेच्‍छा दिल्या आणि पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ही राष्ट्रपुरुषांची भूमी असून भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातून देशाला मिळालेले महान राष्ट्रपुरुष आहेत. भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जेचे उच्चविद्याविभूषित होते. त्यांनी शंभर वर्षापूर्वी द प्रोब्लेम ऑफ रुपी या विषयावर आपला प्रबंध सादर केला आणि त्यातील शिफारशी तत्कालीन सरकारने विचारात घेवून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. त्यांनी अपार संघर्ष आणि कठोर परिश्रम आपल्या जीवनामध्ये घेतले आणि हीच समानता सर्व महापुरुषांमध्ये होती. त्यांचे व्यक्तिमत्व उच्चविचारी, प्रतिभावंत, प्रभावशाली, कल्याणकारी, अन्याय दूर करणारे अश्या व्यापक विचारधारेचे होते. त्‍यांचे विचार आजही जीवंत आहेत. त्‍यांचा आदर्श आणि त्यांनी दाखविलेल्‍या मार्गाचा आपण सर्वांनी अवलंब केल्‍यास भविष्यातील विकसित भारत २०४७ ची संकल्पना उत्कृष्ठरीतीने साध्य होईल असे नमूद केले आणि विद्यापीठ मुख्यालय तसेच मुख्यालयाबाहेरील महाविद्यालयात जयंती निमित्‍त विद्यार्थ्‍यांनी राबविलेल्‍या सलग अठरा तास अभ्‍यास उपक्रम तसेच इतर विविध उपक्रमाचे कौतुक केले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थी ज्ञानेश्वर खटिंग यांनी केले तर आभार डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारीकर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.






Monday, August 9, 2021

सद्य परिस्थितीत कपाशीमधील रसशोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

सतत ढगाळ वातावरणामुळे मावा व तुडतुडे किंडींचा प्रादुर्भाव

मराठवाडयात कपाशी वाढीच्या अवस्थेत असून कपाशी काही ठिकाणी पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. तसेच मागील काही दिवसापासून पाऊस उघडला असून सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासोबतच काही प्रमाणात तुडतुडे सुद्धा दिसून येत आहेत. माव्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम होताना दिसून येत आहे. उशिरा लागवड केलेल्या कपाशी दोन ते चार पानावर आहेत त्यावर मावा किडीमुळे फार मोठा परिणाम होऊन त्या ठिकाणी कपाशीची वाढ खुंटते. म्हणून मावा किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. 

किडींचे व्यवस्थापनकरिता उपाय योजना  - मावा किडीचा प्रसार शेतामध्ये मुंगळ्यांद्वारे होतो, त्यामुळे कपाशीचा शेताच्या आजूबाजूला असलेले मुंगळ्याची वारुळे नष्ट करावीत जेणेकरून मावा किडीचा प्रसार कमी होईल. रसशोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) १ कि. ग्रॅ किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के ६० ग्रॅम किंवा डायनेटोफ्युरॉन २० टक्के ६० ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन २५ टक्के ४०० मिली किंवा असिटामाप्रीड २० टक्के ४० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. सदरिल प्रमाण सर्व प्रकारच्या पंपाकरिता आहे. या कीटकनाशकासोबत कुठलेही इतर कीटकनाशक, बुरशीनाशक, खते, संप्रेरक मिसळून फवारणी करु नये.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी संपर्क करावा. संपर्कासाठी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९०००.

संदर्भ - वनामकृवि संदेश क्रमांक - ०५/२०२१ (०५ ऑगस्ट २०२१)



Friday, July 16, 2021

बी.टी. कपाशीवरील मावा व तुडतुडे किडींचे करा एकात्मिक व्यवस्थापन

वनामकृवितील किटकशास्‍त्र विभागाचे आवाहन

छायाचित्र – मावा


सद्यपरिस्थितीत कपाशी पिक रोप अवस्थेत असुन सुरुवातीच्या काळात कपाशी पिकावर प्रामुख्याने मावा आणि तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसुन येतो. कोरडवाहू कापुस पिकावर मावा या किडीचा प्रादुर्भाव जुलैच्या दुस-या आठवडयापासुन आढळुन येतो. तर तुडतुडयांचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवडयापासुन आढळून येतो. मावा हि किड रंगाने पिवळसर किंवा फिकट हिरवी असुन आकाराने अंडाकृती असते. मावा व त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजुने आणि कोवळया शेंडयावर समुहाने राहून त्यातील रसशोषण करतात. अशी पाने निस्तेज होउन आकसतात व खालच्या बाजुस मुरगळलेली दिसतात, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. मावा आपल्या शरिरातुन गोड चिकटद्रव बाहेर टाकतो, त्यामुळे पानावरील भाग चिकट बनतो कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून पानावर काळा थर जमा झालेला दिसतो. त्यामूळे पानाच्या अन्न निर्माण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.


तुडतुडयांची प्रौढ व पिल्ले फिकट हिरव्या रंगाचे असुन पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांच्या समोरच्या पंखावर एक काळा ठिपका असतो. तुडतुडयांच्या पिल्लांना पंख नसतात. तुडतुडयांचे एक वैशिष्ट म्हणजे ते नेहमी तिरके चालतात व चटकन उडी मारतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजुने राहून त्यातील रसशोषण करतात. अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होउन नंतर तपकिरी रंगाची होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपुर्ण पाने लाल तांबडी होउन त्यांच्या कडा मुरगळतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते. अशा झाडांना पाते, फुले आणि बोंडे फारच कमी प्रमाणात लागतात. 10 मावा प्रति पान किंवा 2 ते 3 तुडतुडे प्रति पान आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा.

या किडींच्‍या व्‍यवस्‍थापनाकरिता पुढील प्रमाणे उपाय योजना करावी

वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांदया, पाने व इतर पालापाचोळा जमा करुन किडींसह नष्ट करावा. खुरपणी, कोळपणी करुन पिक तणविरहीत ठेवावे. बांधावरील पर्याइ खाद्य तणे जसे कोळशी, अंबाडी, रानभेंडी नष्ट करावीत. मृदा परिक्षणानुसार नत्र खतांचा योग्य वापर करावा. जेणेकरुन कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही. अशा पिकावर किडही कमी प्रमाणात राहील. कपाशीमध्ये चवळी, मुग, उडीद यांचे आंतर पिक घेतल्यास मित्र किटकांचे संवर्धन होईल. निसर्गत: रसशोषण करणा-या किडीवर उपजिवीका करणारे मित्र किटक उदा. ढालकिडा, सिरफिड माशी, क्रायसोपा, ॲनसियस हि परोपजीवी किटक आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकाचा वापर टाळावा. पिक वाढीच्या सुरुवातीपासून 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.


वरील सर्व उपाय करुनहि किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास डायफेन्थीरॉन 50 टक्के 12 ग्रॅम किंवा बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 20 मिली किंवा फिप्रोनील 5 टक्के प्रवाही 30 मिली किंवा फलोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यातुन फवारणी करावी. किटकनाशकाचे हे प्रमाण साध्‍या पंपाकरिता असुन पॉवर स्‍प्रे करिता किटकनाशकाचे प्रमाण तीन पट वापरावे. फवारणी करताना दोन किटकनाशकांचे मिश्रण न करता केवळ एकाच किटकनाशकाची शिफारशीनुसार योग्य मात्रा वापरुन फवारणी करावी.


अशा प्रकारे एकात्मिक किड व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍यातचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभागाच्‍या वतीने करण्यात आले आहे.


छायाचित्र - तुडतुडे

सोयाबीन पिकावरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडींचे करा वेळीच व्यवस्थापन

छायाचित्र – चक्रीभुंगा अळी अवस्था


ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची पेरणी जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात केली त्यांचे पीक २५ ते ३० दिवसांचे आहे, या पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. तर ज्या शेतक-यांनी जुलै महिन्याच्या दुस-या आठवडयात पाउस झाल्यानंतर पेरणी केली आहे अशा पिकावरसुद्धा पुढील काही दिवसात खोडमाशी व चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधुनी जागरूक राहून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभागाने केले आहे.  

खोडमाशी प्रादुर्भाव : 

खोडमाशी लहान काळया रंगाची असुन पानांवर व देठावर अंडी देते. अंडयातुन निघालेली फिकट पिवळया रंगाची प्रथम पानाच्या शिरेला छिद्र करते नंतर पानाच्या देठातून फांदीत किंवा झाडाच्या मुख्य खोडात प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते. अळी खोडमाशीचा प्रादुर्भाव पिक लहान असतानाच सहजपणे ओळखु येतो. जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमांशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता असते. असा शेंडा मधोमध कापल्यास आत मध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही. अळी व कोष अवस्था फांदयात व मुख्य खोडात असते. शेवटी फक्त प्रौढ माशी निघून छिद्र फांदीच्या खोडाजवळील बाजूस दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत झाल्यास झाड वाळते, अशा कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते शेंगातल दाण्याचे वजन कमी होउन १५ ते ३० टक्क्या पर्यंत उत्पादनात घट येते.

चक्रीभुंगा प्रादुर्भाव : 

चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर मुख्य खोडावर एकमेकास समांतर दोन (चक्र) काप तयार करु त्यामधे अंडी टाकते. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रीभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते. पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असण्याची तसेच त्यातून लवकरच अळी निघून ती नुकसान सुरु करण्याची शक्यता असते. चक्रीभुंग्याने केलेल्या खापेमुळे वरच्या खापेच्या वरील भाग वाळून जातो. अंडयातून निघालेली अळी पानाचे देठ, फांदी व खोड आतून पोखरत जमिनीच्या दिशेने जाते. साधारणता पीक दिड महिन्याचे झाल्यानंतर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यास झाड न वळ ता कमी शेंगा लागतात त्यामुले उत्पादनात घट येते.


खोडमाशी व चक्रीभुंगा किडींच्‍या व्यवस्थापन करिता पुढील उपाय योजना कराव्‍यात

ज्या भागामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव नेहमीच मोठ्या प्रमाणात दिसून येतो,  त्या ठिकाणी  पिकाची पेरणी जून अखेर पर्यंत करायला पाहिजे. सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास कीटकनाशकाची फवारणी करणे सोयीस्कर होते. एकात्मिक किड व्यवस्थापन करताना शेतात सुरवातीपासून खोडमाशी व चक्री भुंगा प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या व झाडे या आतील किडीसह नष्ट कराव्यात. पिकाच्या सुरुवातीपासुन 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

खोडमाशीमुळे 10 ते 15 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे व चक्रीभुंगा 3 ते 5 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे ही आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच लेबलक्लेम नुसार थायमिथोक्झाम 12.6 अधिक लॅमडासाहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 2.5 मिली किंवा ईथीऑन 50 ईसी 30 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 एससी 3 मिली या कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. स‍दरिल किटकनाशकाची मात्रा साध्‍या पंपाकरिता असुन पॉवर स्‍प्रे करिता किटकनाशकाची मात्रा तीन पट करावे. दोन किटकनाशकाचे मिश्रण न करता केवळ एकच किटकनाशकाची संरक्षक कपडे घालून सकाळी किंवा सांयकाळच्या वेळेस फवारणी करावी.

शेतकरी बांधवानी सुरुवातीपासुन सोयाबीन पिकावरील खोडकिडींचे बारकाईने निरीक्षण करावे जेणे करुन उत्पादनात घट येणार नाही. पिकाच्या सुरुवातीपासुन एकात्मिक किड व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


छायाचित्र – खोडमाशी अळी अवस्था


Monday, September 14, 2020

कपाशीतील बोंड सड : कारणे व उपाय योजना














कपाशीमध्ये मागील एक - दोन वर्षांपासून बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या दिसून येत आहे. त्याची कारणे व त्यावर करावयाच्या उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत.

बोंड सडण्याचे प्रकार व कारणे:

बोंड सडण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात

१) बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग : या प्रकारात मुख्यतः काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोंडावरील जिवाणू करपा कारणीभूत असतो. साधारणतः बोंडे परिपक्व व उमलण्याच्या अवस्थेत असे प्रकार आढळून येतात. बहुतेक वेळा बोंडावर बुरशींची वाढ झाल्याचे दिसते. सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि हवामानातील अधिक आर्द्रता असे घटक ह्या प्रकारच्या बोंड सडण्याला पोषक असतात.

२) आंतरिक बोंड सडणे रोग : ही समस्या प्रामुख्याने संधिसाधू व कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात अंर्तवनस्पतीय रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होतो. अशी बोंडे बाहेरून निरोगी दिसतात. मात्र, ती फोडली असता आतील रुई पिवळसर-गुलाबी ते लाल-तपकिरी रंगाची होऊन सडल्याचे दिसते. अगदी विकसित अवस्थेतील बियासुद्धा सडल्याचे आढळते. बोंडावर पाकळ्या चिकटून राहिल्याने बोंडाच्या बाह्यभागावर ओलसरपणा राहतो. अशा ठिकाणी जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. पावसाळ्यात होणारा संततधार व रिमझिम पाऊस, सतत ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता, कळ्यांवर व विकसित होणाऱ्या बोंडावरील रसशोषणारे ढेकूण यांचा प्रादुर्भाव अशा घटकांमुळे आंतरिक बोंड सडण रोगाची समस्या आढळते.

उपाय योजना :

१. बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच संधिसाधू जिवाणू व बुरशींची वाढ होणार नाही.

२. पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रसशोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात.

३. पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडण रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्लू.पी.) २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी.

४. बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठीपायराक्लोस्त्रोबीन (२०% डब्ल्यू.जी.) १० ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्लू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ई.सी.) १० मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२% डब्लू डब्लू) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४% एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १० मिली किंवा प्रोपीनेब (७०% डब्लू.पी.) २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

५. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९००० यावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

संदर्भ 

केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

वनामकृवि संदेश क्रमांक- १४/२०२० (१३ सप्टेंबर २०२०)