Tuesday, February 25, 2025

वनामकृविच्या जिरेवाडी (ता. परळी वैजनाथ) येथील कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत जिरेवाडी (ता. परळी वैजनाथ) येथे नव्याने स्थापन झालेल्या कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी भेट दिली. त्यांच्या समवेत शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड (अंबाजोगाई), डॉ. दिनेश सिंग चौहान (जीरेवाडी), विद्यापीठ उपभियांता डॉ. दयानंद टेकाळे, श्रीमती जयश्री मिश्रा, वैद्यनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सदाशिवभाऊ आप्पा मुंडे, वैद्यनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती अर्चना चव्हाण व उपप्राचार्य श्री पी. एल. कराड आदी मान्यवर उपस्थित होते.

या दौऱ्यादरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कठोर मेहनत, जिद्द आणि शिस्त यांचा अवलंब करून अभ्यासात उत्तम कामगिरी करण्याचा सल्ला दिला. "यश हे सततच्या प्रयत्नांतून मिळते. आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे," असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधन आणि नवोपक्रमांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले.

त्यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. "ही इमारत केवळ विटा आणि सिमेंटची नव्हे, तर ती ज्ञानाच्या पायावर उभी राहिली पाहिजे. इमारत मजबुतीने उभी राहावी आणि येत्या शंभर वर्षांसाठी एक प्रेरणादायी शिक्षण मंदिर ठरावी," असे मार्गदर्शन त्यांनी दिले. वैद्यनाथ शिक्षण संस्थेचे इमारती मध्ये  विद्यापीठाचे महाविद्यालये सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय कुलागुरुनी संस्थेचे अध्यक्ष श्री सदाशिवभाऊ आप्पा मुंडे यांचे आभार मानले.

विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर यांनी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा सादर केला, तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिनेश सिंग चौहान यांनी शैक्षणिक कार्याचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. विनोद शिंदे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.






वनामकृविच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले युवकांमध्ये असलेला सळसळता उत्साह क्रीडा व कलेच्या माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त होतो. यामुळे त्यांना नव्या प्रेरणा मिळतात आणि त्यांची ऊर्जा अधिक वृद्धिंगत होते. खेळामुळे सांघिक भावना, बंधुभाव आणि सजग समाजभान निर्माण होते, तर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देतात. अशा उपक्रमांमुळे व्यक्तिमत्त्व विकासास मदत होते आणि विद्यार्थी सर्वांगाने सक्षम बनतात.

कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. दिनेशसिंह चौहान, श्रीमती जयश्री मिश्रा, विद्यापीठ उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, विस्तार विद्यावेत्ता डॉ. वसंत सुर्यवंशी, प्राचार्य डॉ. एम. आय. खळगे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश वाघमारे यांनी करून आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरला.







वीजेची बचत म्हणजेच वीज निर्मिती – सौर ऊर्जा समृद्ध भविष्यासाठी!... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परिसरात छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उभारणी रीन्युवेबल एनर्जी सर्व्हिस कंपनी मोड (RESCO Modeअंतर्गत पूर्णत्वास आलेला आहे. याद्वारे विद्यापीठाची प्रशासकीय इमारत तसेच मुख्यालयातील  महाविद्यालयांच्या इमारतींच्या छतावर ५०० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि यांच्या हस्ते दिनांक २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, हा प्रकल्प विद्यापीठासाठी पथदर्शी ठरणार असून, सौर उर्जेचे महत्त्व अधोरेखित करेल. सौर ऊर्जा ही आजच्या काळातील सर्वाधिक स्वच्छ, पुनर्नवीनीकरणीय आणि दीर्घकालीन टिकणारा अक्षय ऊर्जा स्रोत आहे. प्रदूषणमुक्त आणि कमी खर्चिक असलेल्या या ऊर्जेचा उपयोग वाढविणे काळाची गरज बनली आहे. भारतात मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे सौर ऊर्जा निर्मितीला मोठा वाव असून अक्षय ऊर्जा मध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करण्याची गरज आहे. सूर्य आणि चंद्र हे खरे अक्षय ऊर्जेचे स्त्रोत आहेत. त्यांचा वक्तशीरपणा अनमोल असून तो सर्वांनी अंगीकारावा, सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच खरी सूर्याची पूजा असे यावेळी माननीय कुलागुरुनी प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, या प्रकल्पामुळे विद्यापीठाच्या वीज खर्चात ५० ते ६० टक्के बचत होणार असून, त्यामुळे विद्यापीठाची आर्थिक बचत होईल. विद्यापीठाच्या परभणी येथील मुख्यालय तसेच बाहेरील कार्यालयास विद्युत बिलाचा खर्च शून्य व्हावा, या दृष्टीने सर्व ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्व क्षमतेने उभारण्यात येतील. याबरोबरच “विजेची बचत म्हणजेच वीज निर्मिती” असे सांगून विजेची बचत करण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी व आवश्यकतेनुसारच विजेचा वापर करावा. यासाठी त्यांनी “तुम्हाला आराम आणि थंडावा मिळण्यासाठी मी जळत आहे”, “बाहेर जाताना माझे बटन बंद करा” असे विद्युत बचतीसाठी वाक्य प्रत्येक कार्यालयात आणि विजेचा उपकरणा जवळ लावून मोहीम उभारण्याचे आवाहन केले.  

यावेळी सौर प्रकल्पाविषयी अपारंपारिक ऊर्जा विभाग प्रमुख तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके यांनी माहिती दिली.

सौर प्रकल्प उभारणीचे कार्य ठाणे येथील मे. इ ऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीद्वारे करण्यात येत आहे. सध्या ५०० किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प उभारला जात असला, तरी भविष्यात ६४० किलोवॅट पर्यंत सौर ऊर्जा क्षमता वाढविण्याचे प्रस्तावित आहे. विद्यापीठ आणि कंपनी यांच्यात पुढील पंचवीस वर्षांसाठी दर युनिट रु. ४.९९ प्रमाणे वीज खरेदी करार करण्यात आला आहे. या कालावधीत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल. तसेच, कंपनी विद्यापीठाला कार्बन क्रेडिट मिळवून देण्यासाठीही मदत करणार आहे.

उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, संशोधन संचालक डॉ खिजर बेग, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, अपारंपारिक ऊर्जा विभाग प्रमुख तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके, विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, उप अभियंता डॉ.  दयानंद टेकाळे, कनिष्ठ विद्युत अभियंता अनिल जोधळे, इ - ऊर्जा कंपनीचे प्रतिनिधी श्री. पुर्वांक शहा आणि श्री प्रशांत तिवारी आदी मान्यवर यांच्या सह अभियंता कार्यालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.



Sunday, February 23, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि राष्ट्रीय परिसंवाद व प्रदर्शनात विशेष अतिथी म्हणून उपस्थित

 

                                वनामती येथे मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


जी. एच. रायसोनी कृषी विद्यापीठासअभ्यास दौरा दरम्यान मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

नागपूर येथील प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र आणि मध्यप्रदेशच्या सायखेडा येथील जी. एच. रायसोनी कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) सभागृह, नागपूर येथे दोन दिवसांचा राष्ट्रीय परिसंवाद व प्रदर्शनी – सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती या विषयावर भव्य आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमाच्या  उद्घाटन समारंभात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या समारंभास आयएनएम विभागाच्या माजी सहसचिव श्रीमती रानी कुमुदिनी, पद्मश्री शेतकरी डॉ. भारत भूषण त्यागी (बुलंदशहर, उत्तर प्रदेश), पद्मश्री शेतकरी श्री. चिंताला वेंकट रेड्डी (तेलंगणा), व्यक्ती विकास केंद्राच्या संचालक श्रीमती उमा माहेश्वरी प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्राचे संचालक डॉ. ए. एस. राजपूत, जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान शाळेचे अधिष्ठाता डॉ. केविन गवळी, श्रीमती जयश्री मिश्रा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या अंतर्गत दिनांक २३ फेब्रुवारी रोजी जी. एच. रायसोनी कृषी विद्यापीठास, अभ्यास दौरा आयोजित केला होता. या राष्ट्रीय परिसंवादात जैविक व नैसर्गिक शेतीच्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषत: शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी जैविक शेतीत उल्लेखनीय यश मिळवलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या यशोगाथा सादर केल्या. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राज्य कृषि विद्यापीठ आणि कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी जैविक शेतीच्या विविध तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले.

या परिसंवादात पीजीएस-इंडिया प्रमाणित जैविक उत्पादने, तसेच विविध जैविक निविष्ठा उत्पादकांनी आपली उत्पादने प्रदर्शनात मांडली. देशातील सर्वोत्तम जैविक शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मराठवाड्यातील हादगाव (जिल्हा नांदेड) च्या सुषमा देव आणि रुईभर (जिल्हा धाराशिव) चे श्री सुरज जाधव यांचा समावेश होता.  या कार्यक्रमास परभणी विद्यापीठाचे सेंद्रिय शेतीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ आनंद गोरे, मृदा शास्त्रज्ञा डॉ पपिता गौरखेडे, राष्टीय पातळीवरील विविध शास्त्रज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आणि मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाद्वारे जैविक व नैसर्गिक शेतीच्या प्रचार-प्रसाराला चालना मिळाली असून, शेतकऱ्यांनी जैविक शेतीचा अवलंब करून अधिक उत्पादन घ्यावे, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.



 जी. एच. रायसोनी कृषी विद्यापीठ,  सायखेडा, मध्यप्रदेश

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) सभागृहनागपूर
 श्री सुरज जाधव, रुईभर, जिल्हा धाराशिव 
श्रीमती सुषमा देव, हादगाव, जिल्हा नांदेड

विद्यापीठाच्या नवीन विकसित होणाऱ्या मध्यवर्ती प्रक्षेत्राला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; संशोधन व व्यवस्थापनास मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी २२ फेब्रुवारी  रोजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्राच्या नवीन विकसित होणाऱ्या क्षेत्राला भेट दिली. त्यांनी शेतजमिनीच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन केले तसेच जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आणण्याच्या सूचना दिल्या.

माननीय कुलगुरूंनी जे फार्म आणि त्याच्या संशोधन क्षेत्राला भेट देत पीजी व पीएचडी विद्यार्थ्यांनी कीड व रोग व्यवस्थापन तसेच अचूक शेतीतील खत व्यवस्थापनावर संशोधन करावे, असे आवाहन केले.

त्यानंतर सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन टोमॅटो व कांदा संशोधन प्रयोग, हरभऱ्यावर योगिक प्रयोग, गांडूळ खत निर्मिती यांसारख्या विविध उपक्रमांची पाहणी केली. त्यांनी उच्च दर्जाचे गांडूळ खत उत्पादनावर भर द्यावा तसेच विद्यापीठांतर्गत उच्च तंत्रज्ञान आंबा व विदेशी फळ संशोधन केंद्राद्वारे मध्यवर्ती प्रक्षेत्रातील १०० हेक्टर पडीक जमिनीवर फळबाग लागवडीसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या प्रक्षेत्रास सिंचनासाठी नवीन दोन बोरवेलचे उद्घाटन करून फळबाग लागवडीच्या कार्याची प्रगती पहिली. याबरोबरच विद्यापीठातील विविध संशोधन योजनांतर्गत उत्पादित होणाऱ्या फळे व भाजीपाला विक्रीसाठी एकाच ठिकाणी लिलाव पद्धती लागू करावी, असे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी मध्यवर्ती प्रक्षेत्रातील बीटी कापूस (एनएच १९०१ बीटी व एनएच १९०२ बीटी) आणि परभणी शक्ती ज्वारीच्या बियाणे उत्पादन प्लॉट्सला भेट देऊन समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ. व्ही. एस. खंदारे, डॉ. एस. पी. मेहत्रे, डॉ. जी. पी. जगताप, डॉ. एस. एल. बडगुजर, डॉ. आनंद गोरे, डॉ. अनंत लाड, अभियंता कार्यालयाचे श्री. शेख, जे फार्मचे श्री. शिवपुजे, आणि ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे डॉ. रोडगे आणि श्री. तांदळे उपस्थित होते.









Saturday, February 22, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात चौतिसावा ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रम संपन्न

 शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे प्रथःकरण करावे !... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि कीटक शास्त्र विभागाद्वारा ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा चौतिसावा भाग माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २१ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेती उद्योग किफायतशीर होण्याच्या दृष्टीने शेतीमध्ये कमीत कमी निविष्ठाचा वापर होऊन अधिक उत्पादन मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले. सध्या नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी  शेतकऱ्यांनी रासायनिक घटकांचा कमीत कमी वापर करावा आणि सेंद्रिय घटकास प्राधान्य द्यावे. यातूनही निष्ठावरील खर्च कमी होण्यास मदत होते. शेती हा व्यवसाय असून जमाखर्चांचा ताळेबंद ठेवणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठाने शेतकऱ्यांची शेती फायद्याची करून त्यांना अधिक अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने विविध संशोधन आणि विस्तार कार्य अवलंबलेले आहे. यासाठी दर मंगळवारी आणि शुक्रवारी ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवादामध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे प्रथःकरण करावे. यातून शेतकऱ्यांची मानसिकता ओळखून त्यांना आवश्यक ते तंत्रज्ञान दिले जाईल असे नमूद केले. ऑनलाईन कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या यशोगाथा त्यांच्या वाणीतून शेतकऱ्यांसमोर मांडल्या जात आहे. यातूनही शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या माहिती त्यांच्याच जवळच्या व्यक्तीकडून त्यांना मिळत आहेत. यावेळी माननीय कुलगुरूंनी त्यांच्या आजपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा आणि जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला. ते म्हणाले की मार्गदर्शनातून उभारलेल्या शेतकऱ्यांना अधिकचे आणि दर्जेदार उत्पादन मिळाले यामुळे बाजारात त्या मालाची मागणी वाढली आणि अल्पावधीत विक्री झाली. यामुळे शेतकऱ्यांना इतर कामासाठी अधिकचा वेळ मिळाला असे अनेक फायदे झाले. हा कार्यक्रम असाच असून यातूनही अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळेल या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रात प्रशंसा होत आहे. यामुळे त्यांनी सर्व सहभागी शेतकरी आणि शास्त्रज्ञांचे आणि आयोजकांचे आभार म्हणून अभिनंदन केले आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी, सध्या आंबा पिकावर समस्या येऊ शकतात, या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे आणि शेतकऱ्यांना आंबा पिकासह इतर शेती विषयक समस्या उस्फूर्तपणे विचाराव्यात असे आवाहन केले.

प्रस्ताविकात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी रेशीम तज्ञ कृषी मित्र श्री सोपानराव शिंदे यांनी त्यांच्या रेशीम उद्योगातील यशोगाथा शेतकऱ्यांना सांगून त्यांनी रेशीम व्यवसायात यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण बाबी नमूद केल्या.

या कार्यक्रमात संपूर्ण मराठवाड्यातून गटाने शेतकरी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. संजय पाटील, डॉ. अनंत लाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. सूर्यकांत पवार आदी शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.

वनामकृविच्या नांदेड येथील कृषी तंत्र विद्यालयात परिसर मुलाखती संपन्न

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रेरणा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथील कृषी तंत्र विद्यालयातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांसाठी सांगलीच्या प्रतीक इंडस्ट्रीज द्वारे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. या मुलाखती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे होते. यावेळी प्रतीक इंडस्ट्रीजचे संचालक श्री. प्रतीक शहा उपस्थित होते. मुलाखतींसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, एकूण ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, यामध्ये १६ विद्यार्थिनींचा समावेश होता.

मुलाखतीच्या प्रक्रियेतून प्रतीक इंडस्ट्रीज सांगली यांनी कृषी विस्तार अधिकारी या पदासाठी एकूण आठ विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनींची निवड केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये तीन लक्ष मानधन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे म्हणाले की, कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांतून शेतीसाठी सक्षम मनुष्यबळ विकास करण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रोत्साहन लाभते. त्यांच्या प्रेरणेतूनच असे उपक्रम राबविले जात आहेत असे नमूद करून या उपक्रमाचे कौतुक करत अशा संधी मराठवाड्यातील इतर कृषी तंत्र विद्यालयांमध्येही उपलब्ध व्हाव्यात, असे मत व्यक्त केले.  त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निवड झालेल्यांनी अधिक प्रयत्न करून आपल्या क्षेत्रात भरारी घ्यावी आणि ज्यांची निवड झाली नाही त्यांनी खचून न जाता नव्या संधींसाठी मेहनत करावी.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी कृषी शिक्षणाच्या नव्या धोरणावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेता, त्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

प्रतीक इंडस्ट्रीजचे संचालक श्री. प्रतीक शहा यांनी नांदेड कृषी तंत्र विद्यालयाच्या शिक्षणाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. प्रकाश सिंगरवाड, कनिष्ठ संशोधन सहाय्यक तथा प्रभारी शिक्षण श्री. विजय जाधव, कृषी सहाय्यक श्री. श्रीकृष्ण वारकड, वरिष्ठ लिपिक श्रीमती स्वाती ताटपल्लेवार, कनिष्ठ लिपिक श्रीमती महानंदा उत्तरवाढ, कनिष्ठ लिपिक श्रीमती माधवी कल्याणकर व कृषी तंत्र विद्यालय नांदेडच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.