Friday, April 25, 2014

राज्‍याच्‍या कृषि विभागाचा कोरडवाहू शेती अभियानातंर्गत खरिप २०१४ चा कृती आराखडा तयार

वनामकृवित आयोजीत कोरडवाहू शेती अभियांनातर्गत दोन दिवसीय कार्यशाळेची सांगता
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना अतिरिक्‍त मुख्‍य सचिव (कृषि व पणन)  मा. डॉ सुधीरकुमार गोयल, व्‍यासपीठावर कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगटवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्‍वरलु, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. राजाराम देशमुख आदी. 
****************************************
महाराष्‍ट्र शासनाच्‍या कोरडवाहू शेती अभियांनातर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळाची सांगता दि २५ एप्रिल रोजी झाली. या समारोपीय कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अतिरिक्‍त मुख्‍य सचिव (कृषि व पणन)  मा. डॉ सुधीरकुमार गोयल हे होते तर कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. राजाराम देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्‍वरलु, महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारोपीया भाषणात मा. डॉ सुधीरकुमार गोयल म्‍हणाले की, दोन दिवसीय कार्यशाळेत कृषि शास्‍त्रज्ञांनी कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्‍त तंत्रज्ञानाबाबत चांगले मार्गदर्शन केले असुन उपस्थित कृषि विभागाच्‍या अधिका-यांनी या आधारे तयार केलेल्‍या कृति आराखडा प्रभावीपणे राबवावा. तालुका व गावपातळीवरील कृषि कर्मचा-यांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या मदतीने याबाबत प्रशिक्षीत करावे. खरिप हंगामात सोयाबीन बियाणाची कमतरता लक्षात घेता, गाव पातळीवर सोयाबीन बियाणे उपलब्‍धतेबाबत त्‍वरित सर्व्‍हेक्षण करून नियोजन करावे. कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाच्‍या प्रसाराकरिता घडी‍पत्रिका, पोस्‍टर तसेच प्रसारमाध्‍यमातुन त्‍याला प्रसिध्‍दी देऊन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी त्‍वरित पावले उचलण्‍यात यावीत, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्‍वरलु आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कोरडवाहू शेती अभियानामध्‍ये मुलस्‍थानी जलसंधारण, पडणा-या पाऊसाचे संकलन व साठवण (वॉटर हार्वेस्‍टींग), विहीर पुनर्भरण, चारा पिकांची लागवड, आंतरमशागत आदी बाबींवर भर दयावा तसेच कोरडवाहू शेतीच्‍या यांत्रिकीकरण्‍याच्‍या दृष्‍टीने गावात अभियानातंर्गत एखादे शेती औचारे सेंटर उभारून तेथे भाडेतत्‍वावर किंमती शेती अवचारे व मशिन शेतक-यांना उपलब्‍ध करून देण्‍याची कल्‍पना त्‍यांनी मांडली.
कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतक-यांच्‍या बांधावर पोहचविण्‍यासाठी खरिप हंगामात कृषि विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी सच्‍च राहाण्‍याचे आवाहन यावेळी कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट यांनी केले. तसेच मातीची सुपिकता वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची गरज असुन प्रत्‍येक शेतक-यांनी माती परिक्षण केल्‍यास योग्‍य प्रमाणात खतांचा वापर केला जाऊन अतिरिक्‍त खतांचा वापर टाळता येईल, असे मत अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. राजाराम देशमुख यांनी व्‍यक्‍त केले.
या दोन दिवसीय कार्यशाळेत चारही कृषि विद्यापीठातील अधिकारी व शास्‍त्रज्ञ, हैद्राबाद येथील केंद्रिय कोरडवाहू संशोधन संस्‍थेतील शास्‍त्रज्ञ, महाबीजचे अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याआधारे कार्यशाळेत बियाणे उगवणक्षमता परिक्षण, माती परिक्षण, बीज प्रक्रिया, रूंद सरी व वंरबा पध्‍दत, सुक्ष्‍म अन्नद्रव्‍यांचा वापर, आंतरपिक पध्‍दती, बाष्‍परोधकाचा वापर, एकात्मिक किड व रोग व्‍यवस्‍थापन, मुलस्‍थानी जलसंधारण, सघन कापुस लागवड, मल्जिंग आदी तंत्रज्ञानाचा समावेश खरिप २०१४ च्‍या कृ‍ती आराखडात करून कृषि विस्‍तार करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले. यावेळी राज्‍यातील कृषि विभागातील विविध विभागाचे संचालक, सहसंचालक, सर्व जिल्‍हा अ‍धीक्षक कृषि अधिकारी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.