Monday, January 26, 2015

कृषि विद्यापीठाकडुन शेतक-यांच्या व समाजाच्या असलेल्या अपेक्षा पुर्ण करण्याचा करूया संकल्प...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यं‍कटेश्वरलु यांचे प्रतिपादन

वनामकृवित ६६ व्‍या प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा



परभणी:मराठवाडयातील शेतकरी गेल्‍या तीन वर्षापासुन अवेळी पाऊस, दुष्‍काळ, गारपिटी अश्‍या अनेक नैसर्गिक आपत्‍तीचा सामना करीत असुन या आपत्‍तीतील शेती समस्‍यांना तोंड देण्‍यासाठी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ कृषी तंत्रज्ञानाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करित आहे. परंतु कृषि विद्यापीठाकडुन शेतक-यांच्‍या व समाजाच्‍या अनेक अपेक्षा असुन त्‍या सर्वाच्‍या सहकार्याने येणा-या काळात पुर्ण करण्‍याचा संकल्‍प करूया, असे प्रतिपादन ६६ व्‍या प्रजासत्‍ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा देतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी आपल्‍या भाषणात केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, गेल्‍या वर्षी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उन्‍हाळयात फळबागा व मोसंबीबागा वाचविण्‍यासाठी विशेष अभियान घेतले. यावर्षी दुष्‍काळ परिस्थितीत शेतक-यांना उभारी देण्‍यासाठी विस्‍तार शिक्षण संचालनालयाव्‍दारे उमेद उपक्रम राबविण्‍यात येत असुन आजपावतो साधारणत: ६० गावांत उपक्रम घेण्‍यात आला, त्‍यास शेतक-यांचा चांगला प्रतिसाद असुन विद्यापीठ शास्‍त्रज्ञ दुष्‍काळ परिस्थितीत उपयुक्‍त विविध शेती तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करीत आहेत. याची दखल राज्‍याचे माननीय राज्‍यपाल यांनी त्‍यांच्‍या उस्‍मानबाद जिल्‍हयाच्‍या दौरात घेऊन विद्यापीठाच्‍या या उपक्रमाबाबत समाधान व्‍यक्‍त केले. मराठवाडयातील शेतीला बदलत्‍या हवामानाचा मोठा फटका बसत असुन याचा अभ्‍यास करून उपाययोजना आखण्‍यासाठी व दुष्‍काळावर मात करण्‍यासाठी विद्यापीठाने नुकताच बदनापुर येथे कृषी हवामान संशोधन केंद्राचा प्रस्‍ताव शासनास सादर केला आहे, असे त्‍यांनी सांगितले.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, यावर्षी कमी पर्जन्‍यमान असुनही खरिप हंगामात विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर अनेक अडचणी असतांना साधारणत: ५०० एकर वर सोयाबीन व तुर या पीकांची लागवड करण्‍यात आली. यापासुन २००० क्विंटल बियाण्याचे अपेक्षित उत्‍पादन होणार असुन यामुळे विद्यापीठाच्‍या बियाणाबाबत शेतक-यांमध्‍ये असलेली मागणी काही प्रमाणात पुर्ण होऊ शकेल. गेली काही वर्षापासुन विद्यापीठातील कर्मचारी व प्राध्‍यपाकांची भरती प्रक्रिया रखडली गेली असुन येणा-या सहा-सात महि‍न्‍यात नवीन भरती प्रक्रियास गती देण्‍यात येऊन मर्यादीत मनुष्‍यबळाचा प्रश्‍न सोडविण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येईल. विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांचे काही मुलभुत सुविधांचे प्रश्‍न गेल्‍या वर्षी निधी अभावी पुर्ण करता आल्‍या नाहीत, याबाबत यावर्षी लक्ष देण्‍यात येईल. विद्यापीठातील सेवानिवृत्‍त कर्मचा-यांचे पेन्‍शंनचे अनेक प्रश्‍न निधी अभावी प्रलंबित होते, परंतु गेल्‍या हिवाळी अधिवेशात राज्‍य शासनाने निधी मंजुर केल्‍यामुळे येत्‍या मार्चपर्यंत पेन्‍शनबाबतचे प्रश्‍न मार्गी लावण्‍यात येतील. केंद्र शासनाच्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानात मागील आठवडयापासुन विद्यापीठातील विद्यार्थ्‍यानी मोठा सहभाग नोंदविला असुन हे अभियान विद्यापीठ परिसरापुरतेच मर्यादीत न राहता, शहरातील मुख्‍य ठिकाणे जसे रेल्‍वे स्‍टेशन व बस स्‍थानक परिसर स्‍वच्‍छतेसाठी उपक्रम विद्यार्थ्‍यानी हाती घ्‍यावा, अशी अपेक्षा यावेळी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी व्‍यक्‍त केली. 

 या प्रसंगी राष्‍ट्रीय ध्‍वजाला मानवंदना देण्‍यात येऊन राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या स्‍वयंसेवकांनी संचलन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उदय वाईकर यांनी केले. यावेळी विविध महावि़द्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.