Saturday, August 1, 2015

कृषि विद्यापीठ व कृषि विभागांनी आपत्का‍लीन पिक व्यवस्थापन शिफारशींचा प्रसार करावा..... कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु

क्रॉपसॅप प्रकल्‍पाची एक दिवसीय विभागीय कार्यशाळा संपन्‍न 
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ डि पी वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदी
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार, व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, संशोधन संचालक डॉ डि पी वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, , विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदी
 *****************
मराठवाडा विभागात यावर्षी आजपर्यंत पाऊसाचे प्रमाण अत्‍यल्‍प झाले असुन देशाचा विचार करता सर्वात बिकट अवस्‍था मराठवाडयात पाहावयास मिळत आहे. काही भागात पेरणीच झाली नाही तर काही भागात पेरणी झाली परंतु पिके जगण्‍याची शाश्‍वतता नाही. अशा परिस्थितीत पुढील काही दिवसात पाऊस पडला तर कोणती पिके लागवडीसाठी योग्‍य असतील याबाबत विचारमंथन करून कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांनी आपत्‍कालीन पिक व्‍यवस्‍थापनाच्‍या शिफारशींचा प्रसार करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचा कीटकशास्‍त्र विभाग यांचया संयुक्‍त विद्यमाने सोयाबीन, कापुस, तूर व हरभरा पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्‍ला (क्रॉपसॅप) प्रकल्‍पांतर्गत दि १ ऑगस्ट रोजी कृषि विभागातील अधिका-यांसाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ डी पी वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार, कुलसचिव डॉ डि एल जाधव, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, बियाण्‍याची उपलब्‍धता, बाजारपेठेतील मागणी, आर्थिक लाभ आदीं बाबींचा विचार करूनच कृषि विद्यापीठ व कृषी विभाग यांनी पुढील काळासाठी शेतक-यांना योग्‍य पिक लागवडीबाबत शिफारस करावी, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार मार्गदर्शन आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मराठवाडातील काही भागात पाऊसाचा ४० दिवसांपेक्षाही जास्‍त खंड पडला असुन पिके होरपळत आहेत. हलक्‍या जमिनीवरील पिके जवळपास सुकली असुन मध्‍यम ते भारी जमिनीवरील पिके काहीअंशी तग धरून आहेत. पिकांना सरंक्षित पाणी देण्‍यासाठीही पाण्‍याची  उपलब्‍धता नसुन कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांनी एकत्रितपणे शेतक-यांना या परिस्थितीतही तंत्रज्ञानाचे बळ देण्‍याची गरज असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
मराठवाडातील भुजल पातळी अधिकाधिक घटत असुन पाण्‍याचे दुर्भक्ष निर्माण होत असल्‍याचे संशोधन संचालक डॉ डि पी वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले म्‍हणाले की, मराठवाडातील काही जिल्‍हयात हुमणी किडीचा प्रादुर्भाव आढळुण येत असुन विद्यापीठ याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे, हुमणी किडीच्‍या नियंत्रणासाठी कृषि विद्यापीठ कृषि विभागाच्‍या सहकार्यातुन लवकरच प्रकल्‍प हाती घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कार्यशाळेत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी सद्यस्थितीत मराठवाडयातील बहुभक्षी किडींचा प्रादुर्भाव यावर मार्गदर्शन केले तर आपत्‍कालीन पीक नियोजनावर डॉ यु एन आळसे, मराठवाडयातील किडींची अति प्रादुर्भावग्रस्‍त ठिकाणे यावर डॉ पी आर झंवर यांनी मार्गदर्शन केले. वातावरण बदलाचा किडींवरील परिणाम यावर प्रा बी व्‍ही भेदे यांनी तर खरिप पिकातील आपत्‍कालीन रोग व्‍यवस्‍‍थापन यावर प्रा पी एच घंटे व सर्वेक्षण प्रपत्र नोंदी व सर्वेक्षणाच्‍या पध्‍दती यावर डॉ ए जी बडगुजर यांनी मार्गदर्शन केले तसेच विविध जिल्‍हयातील सद्य पिक परिस्थितीबाबत कृषि विभागातील अधिका-यांनी सादरीकरण केले.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात क्रॉपसॅप प्रकल्‍पाची माहिती दिली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे यांनी केले. कार्यक्रमात कीटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या प्रमुख पिकावरील एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापनयावर चलचित्राच्‍या सीडीचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास लातुर विभागातील कृषि विभागातील अधिकारी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
कार्यक्रमात कीटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या प्रमुख पिकावरील एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन’ यावर चलचित्राच्‍या सीडीचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले त्‍याप्रसंगी.