Wednesday, August 19, 2015

स्‍वरक्षनार्थ वनामकृविच्‍या विद्यार्थीनीनी घेतले कराटेचे प्रशिक्षण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व परभणी पोलिसचे रणरागीनी पथक यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थींनीसाठी वीस दिवसीय कराटे प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्‍यात आले होते, या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दि 15 ऑगस्‍ट रोजी झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, पोलीस अधिक्षीका मा. नियती ठक्‍कर, प्राचार्या प्रा विशाला पटणम, रणरागीनी पथक प्रमुख पोलीस अधिकारी डॉ अंजली जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यीनीना स्‍व:रक्षणार्थ या प्रशिक्षणाचा निश्चितच लाभ होणार असुन विद्यार्थ्‍यींनीनी समाजातील महिलांच्‍याही संरक्षणासाठी कार्य करावे. प्रमुख पाहुणे पोलीस अधिक्षक मा. नियती ठक्‍कर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनीनी समाज सेवेसाठी प्रशासनात यावे, यासाठी विविध स्‍पर्धापरिक्षेत यशस्‍वीतेसाठी कठोर परिश्रम घ्‍यावे.

या प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थींना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. यावेळी प्रशिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थींनीनी कराटेचे प्रात्‍यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बदाम पवार हीने केले तर आभार प्रदर्शन प्रा मेधा उमरीकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थींनी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या.