मराठवाड्यात मागील आठवाड्यात पडलेल्या परतीच्या पावसामूळे बी टी कपाशीत आकस्मिक मर (झाडे उमळणे) बऱ्याच ठिकाणी दिसून येत असुन कपाशीचे पिक जास्त पाण्यास संवेदनशील असल्यामुळे काळ्या व कमी निचऱ्याच्या जमिनीमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करावा, कपाशीची झाडे उंमळत किंवा मरत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बनडेंझीम २० ग्रॅम अधिक १५० ग्रॅम युरिया व १५० ग्रॅम पोटॅश प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी तसेच आळवणी सुद्धा करावी. आळवणी करतेवेळेस दुपारच्या वेळेस झाडाची सावली पडते, त्याठिकाणी रिंगण पद्धतीने झाडाच्या उंचीनुसार ५०० ते ७५० मिली प्रति झाड याप्रमाणे आळवणी करून झाडांच्या बुडाजवळील माती पायाने दाबुन घ्यावी.
ज्या ठिकाणी बुरशीजन्य करपा (अल्टरनॅरिया ब्लाईट) या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे त्या ठिकाणी मॅनकोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. जीवाणूजन्य करपा रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोमायसिन
सल्फेट १ ते १.५ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व कापूस संशोधन केंद्र, नांदेड
येथील कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी केले आहे.