राज्याचे माननीय कृषिमंत्री महोद्यांच्या हस्ते उद्घाटन
तीन दिवशीय बैठकीत तीनशे कृषि शास्त्रज्ञांचा
सहभाग, ३० नवीन वाणासह साधारणतः २८० तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्त
कृषि संशोधन व विकास समितीच्या ४५ व्या बैठकीनिमित्त दिनांक २६ मे रोजी माननीय
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्न
झाली. सदरिल पत्रकार परिषदेत संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण
संचालक डॉ बी बी भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. विविध प्रसार माध्यमांचे
प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन संशोधन उपसंचालक डॉ
अशोक जाधव यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी मानले.
प्रेस नोट
महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन
शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाचा टप्पा मानल्या जाणा-या संयुक्त कृषि
संशोधन व विकास समितीची ४५ वी बैठक दिनांक २९ ते ३१ मे दरम्यान परभणी येथे
महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. सदरिल बैठकीचे उद्घाटन
राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली
दिनांक २९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.
बैठकीस महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा.
डॉ. राम खर्चे, कृषि व फलोत्पादनाचे अप्पर मुख्य सचिव मा. श्री. विजय कुमार (भाप्रसे),
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि
विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. तपस भट्टाचार्य, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे
कुलगुरु मा. डॉ. के. पी. विश्वनाथा, कृषि परिषदेचे महासंचालक तथा सदस्य सचिव मा. डॉ. के. एम. नागरगोजे (भाप्रसे) यांची
प्रमुख उपस्थिती लाभणार असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा.
डॉ. बी. व्यंकटेश्वरलु हे बैठकीचे स्वागताध्यक्ष आहेत. यावेळी विद्यापीठ
तंत्रज्ञान व उपक्रमावर आधारित प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील कृषि विद्यापीठांनी
केलेल्या संशोधनामुळे नजीकच्या काळात विविध पिकांचे उत्पादन व उत्पादकता यात
लक्षणीय वाढ दिसुन येत आहे, तरी हवामान बदल, दुष्काळग्रस्त परिस्थिती, लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या अन्न सुरक्षतेचा
प्रश्न, जमिनीच्या सुपीकताचा हास व विविध कारणांमुळे होणारे कृषि उत्पादनाचे नुकसान यामुळे कृषि उत्पादन वाढीवर
मर्यादा येत आहेत. या अनुषगांने राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेल्या
संशोधनातुन शेतकयांना शाश्वत उत्पादन देणारे विविध पिकांचे सुधारीत व संकरीत वाण, पशुधनाच्या सुधारीत प्रजाती, पीक लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, मृद व जलसंधारण आदीसह अनेक महत्वाच्या शिफारसीबाबत बैठकीच्या
माध्यमातून विचारमंथन होऊन शेतकयांसाठी प्रसारीत केल्या जातात. शेतक-यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची बाब
म्हणजे सदरिल बैठकीत विविध पिकांचे अधिक उत्पादन देणारे ३० नवीन वाणासह साधारणतः २८०
तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार आहेत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
४९ शिफारशींचे सादरीकरण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांमार्फत संशोधनावर आधारीत एकुण ४९ शिफारशी बैठकीत सादर करण्यात येणार
असुन यात तीन प्रसारीत वाण, दोन पुर्व प्रसारीत वाण, चार कृषि औजारे आदीसह तेरा (१३) कृषिविद्या, पाच (५) पाणी व्यवस्थापन, पाच (५) गृहविज्ञान, चार (४) पिक संरक्षण, चार (४) कृषि अंभियांत्रिकी, तीन (३) अन्नतंत्रज्ञान, दोन (२) कृषि अर्थशास्त्र, प्रत्येकी एक एकात्मिक पीक पद्धती (१), उद्यानविद्या (१), मृदविज्ञान (१), रेशीम (१) शिफारशी या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. वनामकृविच्या जवस, संकरीत बाजरी, टोमॅटो या पिकांच्या प्रत्येकी एक वाणाची शिफारस
प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषि
विद्यापीठाच्या ८९ शिफारशींचे सादरीकरण
महात्मा फुले कृषि विद्यापीठामार्फत
संशोधनावर आधारित एकुण ८९ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात ११ प्रसारित वाण, ७ पूर्वप्रसारीत वाण, २ कृषि अवजारांसह इतर ६९ तंत्रज्ञान शिफारशी
प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देश्मुख
कृषि विद्यापीठाच्या ८१ शिफारशींचे सादरीकरण
डॉ. पंजाबराव देश्मुख कृषि
विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण ८१ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात ११
प्रसारित वाण, ६ पूर्वप्रसारीत वाण, ५ कृषि अवजारांसह इतर ५९ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार
आहेत.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत
कोकण कृषि विद्यापीठाच्या ६२ शिफारशींचे सादरीकरण
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि
विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण ६२ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात ५
प्रसारित वाण, ३ कृषि अवजारांसह ५४ सुधारीत तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार
आहेत.
तांत्रिक चर्चासत्रात साधारणत: ३००
शास्त्रज्ञांचा सहभाग
तीन दिवस चालणाया या बैठकीच्या तांत्रिक चर्चासत्रात चारही कृषि
विद्यापीठातील साधारणत: ३०० कृषि शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार असुन वरील सर्व
शिफारशींवर विचारमंथन होऊन शेतकयांसाठी प्रसारीत करण्यासाठी त्यास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. प्रथम
सत्रामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील नऊ
संशोधन संस्थांचे संचालक तसेच शास्त्रज्ञ, राज्यशासनाच्या विविध विभागाचे अठरा आयुक्त पदाचे
अधिकारी, कृषि विषयक खात्याचे प्रमुखांचे व राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील संशोधन
संचालक अहवालाचे सादरीकरण करणार आहेत.
राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांचे विशेष सादरीकरण
राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांचे विशेष सादरीकरण
नागपुर येथील केंद्रीय कापुस
संशोधन केंद्राचे संचालक तथा राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळसंशोधन केंद्राचे संचालक डॉ.
एम. एस. लदानीया तर मुंबई येथील केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक
डॉ. पी. जी. पाटील यांचे सादरीकरण होणार आहे. मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण
संस्थेचे संचालक डॉ. गोपाल क्रिष्णा तसेच बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण
व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. एन. पी. सिंग, सोलापुर येथील राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे
संचालक डॉ. रामकृष्ण पाल, पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, नागपुर येथील राष्ट्रीय मृद सर्वेक्षण व जमीन वापर
योजना केंद्राचे संचालक डॉ. सुरेंद्रकुमार सिंग, पुणे येथील कांदा व लसुण संशोधन संचालनालयाचे संचालक
डॉ. विजय महाजन आणि फुलशेती संशोधन संचालनालय, कृषि महाविद्यालय पुणे येथील संचालक डॉ. के. व्ही.
प्रसाद यांचे त्यांच्या क्षेत्रातील विविध विषयावर संशोधनात्मक सादरीकरण राहणार
आहे. याप्रकारच्या वैविध्यपुर्ण संशोधनात्मक सादरीकरण प्रथमच या बैठकीतून करण्याचे
मा. कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांच्या कल्पनेतुन आयोजीत केले असुन सदरिल
सादरीकरणे राज्यातील कृषि संशोधनकांना मार्गदर्शक ठरणार आहेत.
तांत्रिक सत्राच्या एकुण १२
गटांमार्फत विविध शिफारशीवर विचारमंथन होणार आहे. तांत्रिक सत्राच्या पहिल्या गटात
शेत पीके (पीक सुधारणा व तंत्रज्ञान सुधारात्मक व्युहरचना) यावर शिफारशी प्रसारीत
होणार आहेत. नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, उद्यानविद्या आणि पशु व मत्स्य विज्ञान या वरील
शिफारशी अनुक्रमे गट क्र. २, ३ व ४ मध्ये मांडण्यात येणार आहेत. गट क्र. ५ मध्ये मुलभुत शास्त्रे, अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयावरील शिफारशी
मांडण्यात येणार आहेत तर गट क्रमांक ६, ७ व ८ मध्ये पीक संरक्षण, कृषि अभियांत्रिकी व सामाजीक शास्त्र या विषयावरील शिफारशी मांडण्यात येणार
आहेत. शेती पीके आणि उद्यानविद्या वाण प्रसारण तसेच कृषि यंत्रे व अवजारे
प्रसारणावर चर्चा गट क्र. ९, १० व ११ मध्ये होणार आहे. जैविक ताण सहन करणारे स्त्रोत नोंदणी प्रस्ताव गट
क्र. १२ मध्ये मांडण्यात येणार आहे.
शेतक-यांना हंगामापुर्वी कोणत्या पिकांस किती मागणी राहील व किती भाव राहील
हा अंदाज बाधण्यासाठी राज्यापातळीवर सर्वांच्या सहभागातुन एक यंत्रणा निर्माण
करण्याच्या दृष्टीने सदरिल बैठकित विचार मंथन करण्यात येणार असल्याची माहिती
कुलगूरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी दिली.
सदरील बैठकीचा समारोप ३१ मे रोजी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली होणार
असून प्रमुख पाहुणे म्हणून कृषि परीषदेचे उपाध्यक्ष मा. ना. डॉ. राम खर्चे यांची
उपस्थिती लाभणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे माननीय राज्यपाल मा. श्री. चे.
विद्यासागर राव, मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आदींसह अनेक
मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे
गठण करण्यात आल्याची माहिती संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिली.