वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे आवाहन
"पिक संरक्षण" हा पिक उत्पादन वाढीसाठी,
आवश्यक असणा-या इतर अनेक घटकापैकी एक अत्यंत महत्वाचा
घटक आहे. पिक संरक्षणासाठी आपण किटकनाशके, रोगनाशके व तणनाशके यांचा वापर करतो. पण काही वेळा
किटकनाशके वापरुन ही आपणाला त्याचा अपेक्षीत परिणाम मिळत नाही. कारण कोणत्याही
पीकसंरक्षण शिफारशी कृषि विद्यापीठामध्ये सलग दोन अथवा तीन हंगामात घेतलेल्या
प्रयोगाअंती निष्कर्षीत केलेल्या असतात. ब-याचवेळा एखाद्या किडीच्या नियंत्रणासाठी
कृषि विभागाने शिफारस केलेल्या किडनाशकाबाबत शेतकरी बांधवांना तसेच किडनाशक
विक्रेत्यांना माहिती नसते त्यामुळे चुकीची किडनाशके वापरली जातात, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्या किडीचे / रोगाचे योग्य नियंत्रण
होत नाही. त्यासाठी किटकनाशकांच्या योग्य व परिणामकारक वापरासाठी अनेक बाबीकडे
लक्ष दयावे लागते. पण सामान्यत: आपण त्यांकडे दुर्लक्ष करतो. अशा काही बाबी आपण
किटकनाशक वापरताना विचारात घेतल्या पाहिजेत.
(1) योग्य किटकनाशक : संबंधीत
किडीसाठी शिफारस केलेली मानक संस्थेचे (आय.एस.आय.) चिन्ह असलेली जी आपल्या नावाला
जपतात, अशा खात्रीच्या उत्पादकांची व आपल्या माहितीच्या
विक्रेत्याकडूनच किटकनाशके घ्यावीत. किटकनाशके विकत घेताना त्यावरील नोंदणी
क्रमांक, गट (बॅच) क्रमांक,
उत्पादनाचा दिनांक, वापरण्याची मुदत संपल्याचा दिनांक आदीं माहिती
असल्याची खात्री करुनच घ्या व किटकनाशक विक्रेत्याकडून पक्के बिलच घ्या. किटकनाशक
वापरण्याची मुदत व किटकनाशकाच्या प्रतिबाबत काही शंका असल्यास ताबडतोब कृषि
विभागाच्या स्थानिक अधिका-यास भेटावे.
(2) किडीनुसार योग्य किटकनाशक : किडीनुसार योग्य किटकनाशकाची निवड करावी. उदा. रसशोषण
करणा-या किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही किटकनाशक तर अळयांच्या नियंत्रणासाठी
स्पर्शजन्य / पोटविष वापरावे.
(3) योग्य प्रमाणात : पिक
संरक्षण वेळापत्रकात शिफारस केल्याप्रमाणेच योग्य प्रमाणात किटकनाशकाची मात्रा
वापरावी.
(4) योग्य वेळी : किडीची
वाढ जास्त होवू न देता ती थोडया प्रमाणात व किडनाशकांना चांगला प्रतिसाद देण्याच्या अवस्थेत असतांनाच
त्यांचे नियंत्रण करावे म्हणजे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी वाढली असल्यास
नियंत्रणाचे उपाय योजावेत.
(5) योग्य प्रकारे वापर : रसशोषण करणा-या किडी उदा. मावा, तुडतुडे यासारख्या किडी पानांच्या मागील बाजूस राहून अन्नरस
शोषण करतात, या किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशके पानांच्या मागील
बाजूस फवारणे जरुरी असते. तसेच ज्वारीवरील मिजमाशीच्या बाबतीत फक्त कणसावरच
उपायोजना करणे गरजेचे असते.
फवारणीची योग्य पध्दत
फवारणीसाठी योग्य किटकनाशकांची व योग्य फवारणी यंत्राची
निवड करावयास हवी. तसेच फवारणी करतांना काही नैसर्गिक घटकांकडे लक्ष
दयावयास हवे जसे वा-याचा वेग व दिशा.
थेंबाचा आकार - मध्यम
आकाराचे थेंब (100 ते 300 मायक्रॉन) योग्य असतात. यापेक्षा लहान आकाराचे थेंब पडत
असतील तर फवारल्यानंतर पिकावर योग्य ठिकाणी पडण्यापूर्वीच ते वा-याने इतरत्र
पडण्याची शक्यता असते. जर थेंबाचा आकार प्रमाणापेक्षा मोठा असेल तर ते पिकांच्या
सर्व भागावर व्यवस्थित पडत नाहीत व त्यामुळे योग्य प्रकारे कीड नियंत्रण होत नाही.
स्वयंचलित फवारणी यंत्र (पॉवर स्प्रे)
असल्यास किटकनाशकाची मात्रा तिप्पट करावी.
वारा - फवारणी
वा-यांच्या दिशेनेच व जेव्हा वा-याचा वेग प्रति तास 5 कि.मी. पेक्षा कमी असेल तेव्हाच करावी. फवारणी दिवसाच्या
कमी तापमानाच्या वेळी म्हणजेच सकाळी किंवा दुपारनंतर करावी.
किटकनाशकाची वाहतूक व साठवण
1) किटकनाशकाची वाहतूक खाद्यवस्तु, बियाणे, किंवा
प्रवाशांबरोबर करु नये, ती स्वतंत्र्यरित्या किंवा खताबरोबर करावी.
2) किटकनाशके नेहमी काळजीपूर्वक हाताळावीत.
3) किटकनाशके थंड व कोरडया ठिकाणी नेहमी कडी,
कुलुपांत लहान मुलांपासून, पाळीव प्राण्यापासून व राहण्याच्या खोलीत न ठेवता दूर
ठेवावीत.
किटकनाशकाचे रिकामे डबे / बाटल्या
यांची विल्हेवाट
किटकनाशके ही कागदी किंवा जाड पुठठयाचे पॉकेट,
प्लॉस्टीक किंवा धातूचे डबे / बाटल्या यामध्ये उपलब्ध
असतात. किटकनाशके वापरुन झाल्यावर रिकामे डब्बे / बाटल्या यांचा वापर पाणी
पिण्यासाठी अन्नपदार्थ किंवा जनांवराचे खाद्य ठेवण्यासाठी करु नये. तसेच ते
शेतातही इतस्तत: पडू देवू नये. कारण त्यामुळे लहान मुले जनावरे,
पाळीव प्राणी यांना धोका पोहचू शकतो. त्यासाठी अशी
किटकनाशके वापरुन झाल्यावर कागदी पुठठयाचे पॉकेट कापून त्याचे तुकडे करावेत व ते
जमिनीत गाडावे. रिकामे डब्बे / बाटल्या पाण्याने स्वच्छ धूवून त्यांना छिद्रे
पाडून, ठोकून ती
पसरट करावीत व नंतर ती जमिनीत गाडून टाकावीत.
किटकनाशके वापरतांना सर्वसाधारणपणे
घ्यावयाची काळजी
1) गळके फवारणी यंत्र न
वापरता ते दुरुस्त करुन वापरावे.
2) किटकनाशक फवारणी यंत्रात
भरतांना सांडू नये यासाठी नरसाळयाचा वापर करावा.
3) तणनाशक फवारणीसाठी वेगळा
पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरु नये.
4) किटकनाशक वापरतांना
संरक्षक कपडे वापरावेत.
5) फवारणीसाठी वापरलेले
सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावेत.
6) झिजलेले,
खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.
7) किटकनाशकाला हुंगणे
किंवा त्याचा वास घेणे टाळावे.
8) फवारणीचे मिश्रण हाताने
न ढवळता लांब लाकडी दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा.
9) किटकनाशक पोटात जाण्याची
शक्यता असल्यामुळे फवारणीचे मिश्रण करतांना किंवा
फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे.
10) फवारणीचे काम पुर्ण
झाल्यानंतरच हात साबणाने स्वच्छ धूवून खाणे पिणे करावे.
11) फवारणीच्या वेळी लहान
मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या
ठिकाणापासून दूर ठेवावे.
12) उपाशी पोटी फवारणी न
करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी.
13) फवारणी करतांना वापरलेली
भांडी इ. साहित्य नदी ओढे किंवा विहीरीजवळ धूवू नयेत. तर धूतांना वापरलेले पाणी त्यात
विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावे अथवा मातीत गाडावे.
14) किटकनाशकांच्या रिकाम्या
बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात.
15) फवारणी करतांना नोझल बंद
पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुकू नये किंवा हवा
तोडाने आत ओढू नये त्यासाठी सोयीस्कर तार,काडी किंवा टाचणी वापरावी.
16) किटकनाशके फवारण्याचे
काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्त वेळ करु नये. हे काम करणा-या प्रत्येक व्यक्तीने
ठराविक कालावधीने डॉक्टरांकडून स्वत:ला तपासून घ्यावे.
17) किटकनाशके फवारण्याचे
काम करतांना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावेत व वेळोवेळी स्वच्छ धूवून काढावेत.
18) किटकनाशके अंगावर पडू
नयेत म्हणून वा-याच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये.
19) किटकनाशके मारलेल्या
क्षेत्रावर गुरांना चरण्यास कमीत कमी दोन आठवडे जावू देवू नये.
20) जमिनीवर सांडलेले
किटकनाशक हातानी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती / चिखल यांच्या सहाय्याने
शोषून घ्यावेत व जमिनीत गाडून टाकावीत.
21) डब्यावरील मार्गदर्शक
चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष दयावे. लाल रंगाचे चिन्ह / खून असलेली औषधी सर्वात
अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो.
किटकनाशकांचे विषारीपणाचे वर्गवारी
किटकनाशकांच्या विषारीपणाचे
मोजमाप एल डी 50 मध्ये केले जाते व ते मिली ग्रॅम / किलो शरीराचे वजन या एककामध्ये
दर्शविले जाते. रसायनांचा एल डी 50 काढण्यासाठी सर्वसाधारणपणे उंदीर, घुस, ससा,
डुक्कर आदी प्राण्यांवर प्रयोग केले जातात.
लाल - मोनोक्रोटोफॉस 36 टक्के,
डायक्लोरोवॉस 36 टक्के ई.सी, मिथोमिल 40 टक्के एस. पी., मिथिलपॅराथीऑन 2 टक्के
डी.पी, मिथिलपॅराथीऑन 50 टक्के ई.सी, फोरेट 10 सी जी.
पिवळा - ॲसिटामाप्रिड
20 टक्के एस पी, ,क्लोरोपारीफॉस 20 टक्के ई.सी, इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के ई.सी,
फीप्रोनिल 5 टक्के एस सी., इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के एस एल, लॅम्बडा सायलोथ्रीन 5
टक्के ई.सी, प्रोफेनोफॉस 50 टक्के ई.सी, क्विनॉलफॉस 25 टक्के ई.सी ट्रायझोफॉस 40
टक्के ई.सी,
निळा - ॲसिफेट
15 टक्के एस.पी, डायफेन्थुरॉन 50 टक्के डब्ल्यु पी, डायनोटेफयुरॉन 20 टक्के एस
जी., फलोनिकॅमीड 50 टक्के डब्लयु जी.
हिरवा - बुप्रोफेझीन
25 टक्के एस सी, क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 टक्के एस सी, क्लोरॅनट्रानीलीप्रोल 0.4
टक्के जी आर
सौजन्य
विभाग
प्रमुख, कृषि
किटकशास्त्र विभाग, वनामकृवि,
परभणी
दुरध्वनी
क्रमांक 02452 228235