Tuesday, December 2, 2025

ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या डॉ. सिंधू शेरॉन यांच्या संवादात्मक सत्राचे वनामकृवित आयोजन

विद्यापीठ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांशी जोडणारे माध्यम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

मोठे यश मिळवायचे असेल, तर सुखाच्या क्षेत्रातून (Comfort Zone) बाहेर पडणे अत्यावश्यक डॉ. सिंधू शेरॉन

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार 

संशोधन कार्यक्रम समन्वयक डॉ. सिंधू शेरॉन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण संचालनालयाच्या वतीने ‘ग्लोबल अ‍ॅग्रीकल्चर एज्युकेशन कनेक्ट’ या विषयावरील विशेष संवाद सत्राचे आयोजन दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. या संवादात्मक सत्रासाठी ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रम समन्वयक डॉ. सिंधू शेरॉन या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांची उपस्थिती होती.

माननीय कुलगुरूंनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जात राहावे. दृढ निश्चयाने कार्य केल्यास अनेक संधी आपोआप उपलब्ध होत जातात. तुम्ही हवे तेवढे मोठे यश मिळवू शकता—तुमच्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, असे ते म्हणाले. पूर्वी या विद्यापीठात मोजक्या मुली शिक्षण घेत असत; परंतु आज ५० टक्क्यांहून अधिक मुली येथे प्रवेश घेत आहेत आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्राविण्य मिळवत आहेत. तसेच सध्या देशभरातून अनेक विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेत आहेत. हे विद्यार्थी अभ्यासाबरोबरच क्रीडा, संस्कृती आणि इतर गुणांनीही समृद्ध आहेत. त्यांच्या गुणांना वाव देण्याचे महत्त्वाचे कार्य विद्यापीठ प्रभावीपणे पार पाडत आहे. विद्यार्थी विकास, प्रक्षेत्र विकास आणि शेतकरी कल्याण या सर्वच क्षेत्रांत विद्यापीठाचे उल्लेखनीय योगदान आहे. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ बनवण्यासाठी डॉ. सिंधू शेरॉन यांचे मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. सिडनी विद्यापीठात पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांचा अनुभव या विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल.

प्रभावी विद्यार्थी घडवण्यासाठी आणि त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची व्याख्याने, प्रशिक्षण कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यापीठाने सिडनी विद्यापीठासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार केले असून, यामुळे विद्यार्थ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत होत आहे. याच माध्यमातून विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन आपले ज्ञान वाढवतात; त्यांचे आकलन विस्तारते, अडचणी कमी होतात आणि जग अधिक जवळचे, अधिक समजण्यासारखे वाटू लागते.

पुढे माननीय कुलगुरूंनी नमूद केले की विद्यापीठ विद्यार्थी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ यांच्यात दुवा निर्माण करणारे एक महत्वाचे माध्यम म्हणून कार्य करते. विद्यार्थ्यांनी अशा प्रत्येक ओळखीचे ‘सोनं’ करून त्यातून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेवटी, विद्यार्थ्यांनी मनात भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, कठोर परिश्रम करावेत आणि आपले जीवन यशस्वी घडवावे, असा मौल्यवान संदेश त्यांनी दिला.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी या संवाद सत्राचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, जागतिक स्तरावरील कृषि शिक्षणातील नव्या घडामोडी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनातील उदयोन्मुख प्रवाह आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय संधी यांची सखोल माहिती मिळवण्यासाठी असे सत्र अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यांनी विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवरील स्पर्धा, कौशल्यविकास आणि संशोधन संस्कृती आत्मसात करून कृषि क्षेत्रात नवी उंची गाठावी असे आवाहनही केले.

डॉ. सिंधू शेरॉन यांनी संधी कशा मिळवाव्यात आणि त्या संधींचे सोने कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. राज्याबाहेर किंवा देशाबाहेर शिक्षण घेण्यासाठी अथवा नोकरीसाठी जाण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण बाबी त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. बर्‍याचदा विद्यार्थ्यांना भाषा हा मोठा अडथळा वाटतो, परंतु प्रत्यक्षात भाषा ही कधीच खरी अडचण नसते, कारण जगभर भारतीयांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना डॉ. शेरॉन म्हणाल्या की, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) पूर्ण करण्यामध्ये हे विद्यापीठ जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे. येथील शास्त्रज्ञांमधून दरवर्षी एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ निवडला जातो. यापूर्वी या मानासाठी प्रामुख्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या शास्त्रज्ञांची निवड होत असे. परंतु दृढ निश्चय, जिद्द आणि सततच्या परिश्रमाच्या जोरावर त्यांनी २०२२ मध्ये 'वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील उत्कृष्ट शास्त्रज्ञ' हा पहिला क्रमांक मिळवला, असे त्यांनी सांगितले.

सिडनी विद्यापीठात भारतीय सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तेथील राहणीमान, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध सोयी–सुविधांची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांमध्ये परदेशातील अन्नाविषयी भीती वाटते; मात्र जगभर भारतीय अन्न, मसाले आणि खाद्यपदार्थ सहज उपलब्ध असतात, तसेच सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि उत्तम निवास सुविधाही प्रत्येक ठिकाणी मिळतात. विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवायचे असेल, तर सुखाच्या क्षेत्रातून (Comfort Zone) बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. योग्य वेळेचे नियोजन आणि सुयोग्य व्यवस्थापन केल्यास यश नक्की मिळते, असे नमूद केले. यावेळी त्यांनी सिडनी विद्यापीठातील शिक्षण पद्धतीची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिंपोजियम हॉलमध्ये आयोजित या सत्रास सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संवादाचे डॉ वीणा भालेराव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी यांनी  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.








वनामकृवित आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत कृषि महाविद्यालय, परभणीला विजेतेपद

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघाला ट्रॉफी व पदके प्रदान

विजेता संघ : कृषि महाविद्यालय, परभणी

उपविजेता संघ : कृषि महाविद्यालय, बदनापूर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, परभणी यांच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या माननीय महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या स्पर्धेत विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील एकूण १८ संघांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. सेमीफायनलमध्ये पहिल्या गटात कृषि महाविद्यालय बदनापूर विरुद्ध कृषि महाविद्यालय आंबेजोगाई, तर दुसऱ्या गटात कृषि महाविद्यालय परभणी विरुद्ध कृषि महाविद्यालय दहेगाव असे सामने खेळविण्यात आले. अंतिम फेरीसाठी कृषि महाविद्यालय, बदनापूर आणि कृषि महाविद्यालय, परभणी हे संघ पात्र ठरले.

दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या अटीतटीच्या रोमांचक अंतिम सामन्यात कृषि महाविद्यालय, परभणी संघाने कृषि महाविद्यालय, बदनापूर संघाचा ५ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील निकाल :

  • विजेता संघ : कृषि महाविद्यालय, परभणी
  • उपविजेता संघ : कृषि महाविद्यालय, बदनापूर
  • उत्कृष्ट फलंदाज : अनिकेत घोरपडे
  • उत्कृष्ट गोलंदाज : सार्थक धुमाळ
  • मालिकावीर : अनिकेत घोरपडे

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघाला ट्रॉफी व पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या वेळी संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, संचालक विस्तार डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. दीपक पाटील व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम उपस्थित होते.

या स्पर्धेचे आयोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि कृषि महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य व जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धीरज पाथ्रीकर, मारोती शेलाळे, मनोज कऱ्हाळे, विजय गारकार, हनुमान बनसोडे, संतोष यादव, शेख जमीर, संजय घायाळ, माणिक ढगे व अनिल ढगे यांनी अथक परिश्रम घेतले.

शिव छत्रपती क्रिकेट अकॅडमीचे आशिष अलेवार यांनी कृषि महाविद्यालय, परभणी संघाला दिलेल्या उत्कृष्ट कोचिंग व मार्गदर्शनामुळे संघाने विजेतेपद संपादन करण्यात यश मिळविले.








Monday, December 1, 2025

वनामकृविच्या चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेच्या नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला

आपल्या महाविद्यालयाचे नाव उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहा... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था, चाकूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांमध्ये विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ. अच्युत भरोसे, डॉ. दिनेशसिंह चौहान आणि धेनू टेक सोल्युशन्स प्रा. लि., पुणे यांचे संचालक श्री. संतोष खवळे, रूरल हॉस्पिटल, चाकूरचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. जितेन जैस्वाल आणि आयसीटीसी कौन्सलर श्री. रामदास पुंडकरे यांची विशेष उपस्थिती लाभली.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, कोणत्याही परिस्थितीत कधीही हार मानू नका. चांगले व्यक्तिमत्व जोपासा आणि आपल्या महाविद्यालयाचे नाव उंचावण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक दिमाखदार आणि अर्थपूर्ण बनला. त्यांनी कृषि व्यवसाय व्यवस्थापन आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे सांगितले आणि नव्या पिढीने तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि शाश्वत शेती यांचा समन्वय साधून भारताला कृषिक्षेत्रात जागतिक महासत्ता बनवावे, असे आवाहन केले. त्यांनी नवागत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि संस्थेला अधिक उंची गाठण्याचा विश्वास व्यक्त केला.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक व्हा. स्वतःच्या कल्पनांना व्यवसायात रूपांतरित करण्याची क्षमता विकसित करा, जोखीम घेण्याची तयारी ठेवा आणि सतत शिका. तसेच त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सुरू झालेल्या ड्युअल डिग्री प्रोग्रामची माहिती दिली आणि सांगितले, विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विषयांच्या पदवी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे आवडीच्या आणि करिअरसाठी उपयुक्त दोन क्षेत्रांचा समन्वय साधता येईल.

श्री संतोष खवळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आरोग्याची काळजी घ्या, लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा, आर्थिक नियोजन शिका आणि आपल्या आवडी-निवडी ओळखून त्यांचा पाठपुरावा करा. यामुळे यशस्वी व समाधानी आयुष्य घडेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी केले. कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट सादरीकरण व आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी मिस्टर फ्रेशर २०२५” हा किताब जगन्नाथ केंद्रे यांना तर मिस फ्रेशर २०२५” हा किताब बसवचैतन्या यांना प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमातील उत्कृष्ट सहभागाबद्दल अभिजित कुलकर्णी व धारणा मदस्वार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमात १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले. रूरल हॉस्पिटलचे डॉ. जितेन जैस्वाल व श्री. रामदास पुंडकरे यांनी एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, सुरक्षित जीवनशैली आणि तरुणाईची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी यानिमित्त रिबन लावून व शपथ घेऊन सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी जयेश बोरसे व संस्कृती महाजन यांनी अत्यंत सुरेख आणि तरल पद्धतीने केले.

डॉ. संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ज्योती झिरमिरे, श्रीमती पूजा डांगे, श्री. अभिषेक राठोड, श्री. सुधाकर मोरे, श्री. कृष्णकुमार कुलकर्णी, डॉ. श्रीकांत पंड्या, श्री. आशिष महेंद्रकर, श्री. पितांबर पिरंगे, श्री. सादिकमिया हरणमारे, श्री. कैलास शिंदे, श्री. निखिल सूर्यवंशी, श्री. शिवानंद चिकाळे, श्री. विष्णू कांबळे, श्री. वाजिद शेख, सौ. सुनीता जाधव, सौ. रुख्मिणी गवळी, श्रीमती चांदबी सय्यद यांच्यासह संपूर्ण प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांनी अविरत परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.