जागतिक हवामान बदल व त्यांचे कृषि आणि
जलक्षेत्रावर होणार परिणाम यावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप
अध्यक्षीय समारोप करतांना वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु
|
हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे, भविष्यात येणा-या आव्हानाना तोंड देण्यासाठी हवामान बदलावरील संशोधनास बळकटी देण्यासाठी राज्यात स्वंतत्र संशोधन केंद्राची गरज आहे, असे मत कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी केले. महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हवामान बदल व त्यांचे कृषि आणि जलक्षेत्रावर होणारे परिणाम या विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चासञ दि. १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत वाल्मी औरंगाबाद येथे आयोजीत करण्यात आले होते, चर्चासत्राचा समारोपात (दिनांक १४ डिसेंबर रोजी) अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी
व्यासपीठावर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथा, दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण
कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ तपस भट्टाचार्य, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे डॉ एस भास्कर, वाल्मीचे महासंचालक मा. श्री. एच. के. गोसावी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, अनेक
शेतकरी स्वत: संशोधक असुन बदलत्या हवामानात स्वत:चे तंत्र विकसित करून शेतीत
चांगले उत्पादन घेत आहेत, या संशोधक शेतक-यांच्या नवतंत्रज्ञानास प्रोत्साहन देण्याची
गरज आहे, यासाठी राज्यातील चारही कृषि विद्यापीठाने शासनाच्या मदतीने स्वतंत्र
निधी उभारून त्यांच्या संशोधनास चालना द्यावी लागेल. राज्यात तालुकास्तरावर स्वतंत्र
स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करावी लागतील. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट
करण्यासाठी सुक्ष्म सिंचनाचा वापर वाढवावा लागेल. तसेच किड – रोग
प्रादुर्भावाबाबत अचुक पुर्वानुमान शेतक-यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी
प्रयत्न करावे लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथा आपल्या भाषणात म्हणाले की, सदरिल आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात
देशविदेशातील हवामान बदलाशी संबंधीत ७२ सर्वात्कृष्ट शास्त्रज्ञांनी आपले
संशोधनाचे सादरिकरण केले. या चर्चासत्रातील शिफारसी राज्यासाठी हवामान बदलाबाबत
लघुकालीन, मध्यम कालीन व दिर्घकालीन धोरण ठरविण्यास मार्गदर्शक ठरणार आहे.
कुलगुरू मा. डॉ तपस भट्टाचार्य आपल्या भाषणात म्हणाले की, हवामान बदलाचा कोकणातील
सागरी किनारावरील शेती मोठा परिणाम होत असुन जमिनीची धुप थांबविण्यासाठी त्वरित
उपाय योजना करणे गरजेचे आहे.
सदरिल आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात प्राप्त ज्ञान युवा कृषि शास्त्रज्ञांना
संशोधन करतांना दिशादर्शक ठरेल, असे मत माजी कुलगुरू मा. डॉ एस एन पुरी यांनी व्यक्त
केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले तर आभार
डॉ ए एस गरूडकर यांनी मानले.
कार्यक्रमात बदलत्या हवामानात स्वत:च्या
तंत्राच्या आधारे यशस्वी शेती करणारे शेतकरी उस्मानाबाद येथील शिवाजी नवगिरे,
जळगांव येथील प्रतापराव देशमुख व अकोला येथील गणेश नानोटे यांना क्लॉमेट स्मार्ट
शेतकरी पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्माननीत करण्यात आले तसेच विविध
संशोधनात्मक विषयावरील उत्कृष्ट भितीपत्रकासाठी शास्त्रज्ञांना सन्मानित करण्यात
आले.
तीन दिवसीय चर्चासत्रात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, श्रीलंका, व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ आदीं देशांतील
नामवंत शास्त्रज्ञासह सुमारे ८०० हुन
अधिक शास्त्रज्ञ व संशोधक विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. एकुण बारा विविध विषयावरील तांत्रिक सत्रात
देशविदेशातील ७२
सर्वात्कृष्ट शास्त्रज्ञांनी आपले संशोधनात्मक सादरिकरण केले. चर्चासत्राचे
संयोजक वनामकृविचे संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होत तर सहसंयोजक मफुकृवि, राहुरीचे डॉ. सुनिल गोरंटीवार व वाल्मी औरंगाबादचे डॉ. अविनाश गरुडकर होत तसेच आयोजन सचिव मुख्यशास्त्रज्ञ डॉ.
भगवान आसेवार होते. चर्चासत्राचे सहआयोजक
महिको, जालना असुन सहभागी संस्था
भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, जैन इरीगेशन, जळगांव, भारतीय स्टेट बँक, महाबीज, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, टास नवी दिल्ली, विज्ञान व अभियांत्रिकी
मंडळ, नवी दिल्ली हया होते. अनेक खाजगी कंपन्या आणि
विविध संस्था या चर्चासत्राचे प्रायोजक होते.