वनामकृविच्या
नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
नांदेड: पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चालू
हंगामातील कापसाची फरदड शेतक-यांनी घेऊ नये. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक
पद्धतीनेच व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. विद्यापीठांतर्गत
असलेल्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या वतीने दिनांक ९ डिसेंबर रोजी
आयोजित कापूस फरदड निर्मुलन कार्यशाळेच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेस
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, उपविभागीय कृषि अधिकारी श्री बाळासाहेब कदम, कापूस
विशेषज्ञ डॉ. खिजर बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू
मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्हणाले कि, बोंडअळीच्या व्यवस्थापनाकरिता
शेतक-यांनी घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करावा, किडींना प्रतिकारक्षम विविध वाण व
तंत्रज्ञानाचा तूलनात्मक अभ्यास करावा, प्राप्त ज्ञान अन्य शेतक-यांपर्यंत पोहोचवावे.
यावर्षी खरीप हंगामात कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्या समन्वयाने गुलाबी बोंडअळी
व्यवस्थापन मोहीमेमुळे शेतक-यांच्या फवारणी खर्चात निश्चितच बचत झाली आहे. यापुढेही
शेतक-यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कृषि विद्यापीठ सदैव तत्पर राहील अशी ग्वाही त्यांनी
यावेळी दिली.
संशोधन
संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आपल्या भाषणात म्हणाले की, नांदेड येथील संशोधन केंद्र कापूस पिकावरील संशोधनात नेहमीच अग्रेसर असुन या
केंद्राने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव राज्यात होण्यापूर्वीच प्रादुर्भावाचे पुर्वसंकेत
व त्यावरील उपाययोजने बाबतची तांत्रिक माहिती दिली होती. सध्या कापसाची प-हाटी
शेताबाहेर काढून नष्ट करण्यासाठी जनजागृती करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
चालू
वर्षात जुलै व ऑगस्ट महिण्यात शेतक-यांनी विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र व कृषि
विभाग यांच्या सल्ल्यानुसार एकत्मिक पद्धतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन केल्याने
या हंगामामध्ये प्रादुर्भाव नियंत्रणात ठेऊ शकल्याचे मत उपविभागीय कृषि अधिकारी
श्री बाळासाहेब कदम यांनी व्यक्त केले. मौ. जांभरून ता. अर्धापूर जि. नांदेड येथील प्रगतशील शेतकरी श्री मन्मथ गवळी यांनी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान सल्लाचा शेतक-यांना फायदा होत असल्याचे मत व्यक्त केले.
सध्या
राज्यामध्ये कापसाची फरदड घेण्यात येऊ नये म्हणून त्याचे दुष्परिणामांची माहिती
देणा-या घडीपत्रिकेची विमोचन मान्येवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच प्रथम दर्शनी
पीक प्रात्यक्षिके घेणा-या शेतक-यांना निविष्ठांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी केले. सूत्रसंचालक श्री अ. द.
पांडागळे यांनी केले तर आभार प्रा. डी. व्हि. पाटील यांनी मानले. कार्यशाळेत कापूस
फरदड निर्मूलनाबाबत प्रा. अरविंद पांडागळे यांनी तर गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत
डॉ. शिवाजी तेलंग यांनी माहिती दिली. कार्यशाळाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पवन ढोके, शेळके,
पांचाळ, शिंदे, जोगपेटे, कळसकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यशाळास
जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.