वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बावीसावा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न
माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी एकुण ३३७६ स्नातकांना विविध पदवीने केले अनुग्रहीत
देशाच्या आर्थिक विकासात कृषि व कृषि संलग्न क्षेत्राचे मोठे योगदान आहे, स्वातंत्र्यानंतर
शेतकरी, कृषि शास्त्रज्ञ व धोरणकर्ते यांच्या परिश्रमातुन
कृषि उत्पादनात वाढ होऊन देश अन्नधान्यात स्वयंपुर्ण झाला. गेल्या वर्षी देशात २७७ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले असुन
जगात भात, गहु, दुग्ध, फळे व भाजीपाला, अंडी आदीच्या उत्पादनात आपण
अग्रेसर आहोत. सद्यस्थितीत भारतीय शेती समोर अनेक आव्हाने
असुन यात जागतिक तापमानवाढ, सतत नैसर्गिक आपत्ती, जमिनीचा होणारा -हास, पाण्याचे
दुर्भिक्ष, शेतमालाच्या भावातील अस्थिरता आदी प्रमुख समस्या
आहेत. कृषि विकासासाठी शेतमालास योग्य व शाश्वत भाव मिळणे
आवश्यक असुन शेतीनिगडीत मुलभुत सुविधांचे बळकटीकरण, योग्य
कृषि तंत्रज्ञान, शेतक-यांच्या
सामर्थ्य निर्मितीवर भर द्यावा लागेल. कृषि पदवीधर हे कृषि
उद्योजक म्हणुन पुढे आले पाहिजेत. देशाच्या कृषि विकासात कृषि विद्यापीठातील
पदवीधरांनी आपले योगदान देण्याची गरज असुन कृषि पदवीधर हे आधुनिक शेतीचे उत्प्रेरक
बनले पाहिजे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि
संशोधन परिषदेचे महासंचालक मा. डॉ त्रिलोचन महापात्र यांनी केले़. वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक २६ डिसेंबर रोजी आयोजीत २२ वा दीक्षांत समारंभात दीक्षांत
अभिभाषण करतांना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणुन प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र कृषि शिक्षण व
संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खा मा श्री संजय धोत्रे व राज्याचे कृषि, फलोत्पादन,
दुग्धविकास व पणन राज्यमंत्री मा.ना.श्री.सदाभाऊ खोत उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी
कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते. व्यासपीठावर कुलसचिव श्री रणजित पाटील,
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विद्यापीठ
कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. आ. श्री
राहुल पाटील, मा. श्री लिंबाजी भोसले,
मा श्री अजय गव्हाणे, मा. श्री बालाजी देसाई, मा. श्री
शरद हिवाळे, मा. डॉ आदिती सारडा,
माजी कुलगुरू डॉ एस एस कदम, डॉ बी व्यंकटेश्वरलु, डॉ व्ही के
पाटील, डॉ के पी गोरे, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार
शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव
आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ त्रिलोचन
महापात्र पुढे म्हणाले की, सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे
भारत सरकारचे उदिष्ट असुन शेती उत्पादनक्षम पेक्षा अधिक उत्पन्नक्षम करण्याच्या
धोरणावर शासनाचा भर आहे. याकरिता फायदेशीर व शाश्वत असा
एकात्मिक शेती पध्दतीचा विकास करावा लागेल. कृषि संशोधनात
रिमोट सेन्सिंग, जीआयएस, जैवतंत्रज्ञान
व माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागेल. परभणी
कृषि विद्यापीठाने मराठवाडयातील कोरडवाहु शेती विकासाकरिता उपयुक्त असे पिकांचे
वाण व कृषि तंत्रज्ञानाची निर्मिती केली असुन हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत पोहचण्यासाठी सक्षम अशी विस्तार यंत्रणा निर्माण करावी लागेल.
यासाठी कृषि पदवीधरांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्वागतपर भाषणात कुलगुरू डॉ अशोक ढवण म्हणाले की, वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाने आजपर्यंत विविध पिकांच्या १४१ वाण व २५ शेती औजारे
विकसित केले असुन ८५० पेक्षा जास्त कृषि तंत्रज्ञान शिफारसी दिल्या आहेत.
मराठवाडयातील शेतक-यांची अनेक दिवसापासुन
मागणी असलेला कापसाचा नांदेड-४४ हा वाण महाबीजच्या मदतीने
बीटीमध्ये परावर्तीत करण्यात आला असुन येणा-या खरिप
हंगामात शेतक-यांसाठी हा वाण उपलब्ध होणार आहे. तसेच हैद्राबाद येथील अर्ध शुष्क उष्णकटिंबधीय आंतरराष्ट्रीय संशोधन
संस्थेच्या मदतीने लोह व झिंक चे अधिक प्रमाण असणारा देशातील पहिला खरिप ज्वारीचा
परभणी शक्ती जैवसमृध्द वाण विद्यापीठाने विकसित केला असुन बाजरी पिकातील एएचबी-१२०० व एएचबी-१२६९ हे जैवसमृध्द वाण निर्माण केले आहेत,
यामुळे गर्भवती महिला व मुलींमधील कुपोषणावर मात करता येईल. भारतीय कृषि संशोधन परिषदेने नुकतेच विद्यापीठास अधिस्वीकृती दिली असुन
यामुळे परिषदेकडुन प्राप्त होणा-या निधीचा विद्यापीठातील
शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करून देशाच्या कृषि विकासासाठी अधिक सक्षम व कौशल्यपुर्ण
मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यात येईल. देशातील विविध भागातील विद्यार्थ्यी व
विद्यार्थ्यींनी करिता परभणी कृषि विद्यापीठ परिसर अधिक हरित, स्वच्छ व
सुरक्षित करण्यास मानस असल्याचे मत त्यांनी व्यक्त केला.
सुत्रसंचालन डॉ आशा आर्या व डॉ दयानंद मोरे यांनी केले. समारंभास शहरातील
प्रतिष्ठीत नागरीक, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील
अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित
होते. दीक्षांत समारंभात विविध अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्यांनी ठेवलेली
सुवर्ण पदके (सुवर्ण
मुलामित), रौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना
प्रदान करून गौरविण्यात आले. समारंभात विविध विद्याशाखेतील
एकुण ३३७६ स्नातकांना विविध पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने माननीय कुलगुरू महोद्यांव्दारा अनुग्रहीत करण्यात आले.
यात आचार्य पदवीचे एकुण ६१ स्नातक, पदव्युत्तर
अभ्यासक्रमाचे एकुण ३६४ स्नातक व पदवी अभ्यासक्रमाचे एकुण २९५१ स्नातकांचा
समावेश होता.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील पदवी अभ्यासक्रमातील गोविंदा रॉय शर्मा (कृषि),
जे.आरथी (उद्यानविद्या),
बलराम यादव (कृषि जैवतंत्रज्ञान), प्रियांका स्वामी (गृहविज्ञान), इंद्रजित सिंह (कृषि अभियांत्रिकी), पदमप्रिया निराली (अन्नतंत्रज्ञान), मनोहर धोंडकर (कृषि व्यवसाय व्यवस्थापन) आदी विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकांनी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात
आले. पदव्युत्तर अभ्यासक्रमातील श्रीवर्षा जस्ती (कृषि),
सुप्रिया सिंगम (उद्यानविद्या), टी.अरूणा (गृहविज्ञान),
स्वेता सोळंके (कृषि अभियांत्रिकी), दिव्यांनी शिंदे (अन्नतंत्रज्ञान), आरती देशमुख (कृषि जैवतंत्रज्ञान), एल. बांधवी (कृषि व्यवसाय व्यवस्थापन)
आदीं विद्यार्थ्यीना सुवर्ण पदकांनी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात
आले.
शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील के. अविनाश (कृषि), एस. सजना (उद्यानविद्या), सत्यवाण भोसले (कृषि जैवतंत्रज्ञान), रेश्मा मल्लेशी (गृहविज्ञान), पुरण प्रज्ञा जोशी (कृषि अभियांत्रिकी), मुकेश बेलवाल (अन्नतंत्रज्ञान), एक के शिवशंकर (कृषि व्यवसाय व्यवस्थापन) आदी विद्यार्थ्यीना सुवर्ण
पदकांनी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याव्यतिरिक्त
दात्यांनी ठेवलेली सुवर्ण पदकांचाही समावेश होता.