परभणी कृषि महाविद्यालयात महाराष्ट्र कृषी सेवा परिक्षा व मुलाखतीची तयारी याबाबत एक
दिवसीय प्रशिक्षण संपन्न
माणुस हा ज्ञान व
कर्मांनी मोठा होतो, त्यामुळे जास्तीत जास्त ज्ञान संपादन करा, त्याचा उपयोग
समाजाच्या कल्याणासाठी करा, असे प्रतिपादन माजी कृषि आयुक्त डॉ उमाकांतजी
दांगट यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्या
वतीने नुकतेच (दिनांक 7 जुन रोजी) महाराष्ट्र कृषी सेवा परिक्षा व मुलाखतीची तयारी याबाबत एक दिवसीय प्रशिक्षणाचे
आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी
ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले हे होते तर मार्गदर्शक म्हणुन माजी कृषि आयुक्त डॉ
उमाकांतजी दांगट व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष श्री मधुकरराव कोकाटे
हे उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज
गोखले, डॉ पी आर झंवर, डॉ रणजित चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ उमाकांतजी दांगट पुढे म्हणाले
की, स्पर्धेपरिक्षा ही कार्यक्षम व चांगल्या व्यक्तींची निवड करण्यासाठी
असते. सातत्याने लिखन व वाचन करा, चिंतन करा. कृषि पदवीधरांना शासकिय व खासगी
क्षेत्रात मोठया संधी आहेत. कृषी क्षेत्रातील प्रगतीनेच देशाची व मानवाची प्रगती
झाली आहे. कृषी संस्कृती हीच जीवन पध्दती आहे. कोणत्याही घटनेकडे एकांगी विचार
करू नका, चौफेर विचार करण्याची सवय लावा. आपली विवेकबुध्दी सतत जागृत ठेवा. ध्येय
पुर्ण होईपर्यंत लढत रहा, असा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात डॉ प्रदिप इंगोले म्हणाले की, बहुतेक कृषिचे विद्यार्थ्यी हे ग्रामीण भागातुन आलेले असतात तरिही कठोर
परिश्रमाच्या आधारे स्पर्धेपरिक्षेत यश संपादन
करतात. विद्यार्थ्यांना
स्वत:मधील असलेल्या सुप्तगुणांची जाणीव झाली
पाहिजे.
नौकरी
म्हणुन कोणत्याही क्षेत्रात काम करतांना कृषि पदवीधरांनी शेतक-यांना विसरून नये, नौकरी ही शेतक-यांची सेवा करण्याची संधी म्हणुन पाहा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मार्गदर्शनात श्री मधुकरराव कोकाटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेपरिक्षेची तयारी करतांना जाणीवपुर्वक आपल्या व्यक्तीमत्व
विकासाकडे लक्ष द्यावे. विशेषत:
संवाद
कौशल्य विकसित करावे, संवादातुनच आपल्या व्यक्तीमत्वाची
ओळख होते. मुलाखत ही ज्ञान तपासण्यासाठी नसुन तुम्ही माहिती कशी सादर करता, याची परिक्षा असते. स्वत:तील कमतरतेचा बाऊ करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
डॉ धर्मराज गोखले
यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक डॉ पी आर झंवर यांनी केले.
सुत्रसंचालन डॉ रणजित चव्हाण यांनी केले तर आभार डॉ कल्याणकर यांनी मानले. प्रशिक्षणात
विद्यार्थ्यांकडुन मुलाखतीचा सराव घेण्यात आला. कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे
विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.