कृषि संशोधन व विस्तार यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज …… कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण
संशोधनाद्वारे विकसीत तंत्रज्ञानाचा फायदा सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषि संशोधन व विस्तार यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांनी केले. विद्यापीठ अंतर्गत असलेल्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ फेब्रुवारी रोजी आयोजीत कापूस उत्पादनवृध्दी कार्यशाळेत ते बोलत होते.
कार्यक्रमास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषि विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) श्री विकास पाटील, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, कृषि सहसंचालक श्री पांडुरंग शिगेदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री रविशंकर चलवदे, नागपूर येथील ज्येष्ठ कापूस शास्त्रज्ञ डॉ. वेणुगोपालन, डॉ. बालसुब्रमणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. कुलगुरू डॉ अशोक
ढवण पुढे म्हणाले की,
भविष्यात शेतकर्यांचा बियाण्यावरील खर्च कमी करण्यासाठी विद्यापीठ कापसाचे बीटी
स्वरुपातील सरळ वाण विकसीत करीत आहे. काळाची गरज ओळखून संशोधन करीत असुन विद्यापीठ
विकसीत देशी कापसाचे वाण भविष्यात निश्चितच उपयोगी सिध्द होईल. कापसाच्या विविध
प्रजातींचा समतोल राखण्यासाठी देशी कापसाचे क्षेत्र १०-१५ टक्के पर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही
ते म्हणाले.
प्रमुख अतिथी
डॉ. प्रसाद यांनी कापूस संशोधन केंद्राद्वारे विकसीत वाण - तंत्रज्ञान व चालू
संशोधन कार्याचे कौतुक केले. कापूस पीकाची विशेषत: कोरडवाहू भागातील उत्पादकता
वाढविण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखीत केली. भविष्यात
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे विद्यापीठास संशोधनाकरिता सर्वतोपरी मदत
करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मार्गदर्शनात डॉ.
दत्तप्रसाद वासकर म्हणाले की,
राज्यात सार्वजनिक क्षेत्रातील एनएचएच ४४ (बीजी २) हा पहिला बीटी संकरीत वाण
वनामकृविच्या माध्यमातून विकसीत करण्यात आला. त्याप्रमाणेच विद्यापीठाचे एनएचएच
२५० व एनएचएच ७१५ हे नविन संकरीत वाणदेखील
बीटी स्वरूपात परिवर्तीत करण्याचे कार्य महाबीजच्या माध्यमातून प्रगतीपथावर असून
लवकरच ते शेतकर्यांच्या सेवेत अर्पण करण्यात येतील असे यांनी सांगितले. तर श्री विकास पाटील यांनी राज्यातील कापूस पीकाची
सद्यस्थिती, भविष्यातील गरज आणि त्याकरीता राज्य शासनाच्या
कृषि विभागाद्वारे करावयाचे विस्तार कार्य याबाबतचा संदेश दिला.
कार्यशाळेत राज्यातील कापूस पीकाची उत्पादकता वाढ करण्यासाठी येत्या हंगामामध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. कपाशी उत्पादकता वाढीकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. खिजर बेग, प्रा. अरविंद पांडागळे, डॉ. आनंद दौंडे, डॉ. शिवाजी तेलंग प्रा. दिनेश पाटील व प्रा. अरूण गायकवाड यांनी माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते कापूस संशोधन केंद्राद्वारे कीटकानाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन व प्रथमदर्शनी पीक प्रात्यक्षिक योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकधारक शेतकर्यांना निविष्ठा वाटप करण्यात आल्या तसेच मान्यवरांनी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील चालू संशोधन कार्याची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बेग यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले तर आभार डॉ. आनंद दौंडे यांनी मानले. कार्यशाळेत कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री पिल्लेवाड, पांचाळ, तुरे, शिंदे, रणवीर, गौरकर, जाधव, अडकिणे, सोनुले, श्रीमती सुरेवाड, ताटीकुंडलवार आदींनी परिश्रम घेतले.