वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने विविध धान्यापासुन लाहया व फुटाणे तयार करण्याकरिता संशोधनाच्या आधारे विद्युतचलित कढईची निर्मिती केली आहे. सदर कढईमध्ये ज्वारी, मका आणि बाजरीच्या लाहया तसेच शेंगदाणा, सोयाबीनचे खरमुरे, हरभ-याचे फूटाणे तयार करता येतात. या कढईची क्षमता दिवसाकाठी ५० किलो असुन यात धान्यानुसार तापमान नियंत्रित करता येत असल्यामुळे चांगल्या प्रतिचे उत्पादन घेता येते. सदर विद्युतचलित कढईला बचत गट, ग्रामीण महिला, लघु उद्योजकांकडुन मोठया प्रमाणात मागणी होत असल्यामुळे या कढईची निर्मिती आणि पुरवठा जलद व्हावा या उददेशाने सामंजस्य कराराच्या माध्यमातुन अंबाला कॅन्ट येथील सुशील मॉडेल अँड सायंटिफिक वर्कस यांना विद्युतचलित कढईच्या निर्मितीचा तर मे. बाबाजी ट्रेडर्स, परभणी यांना विक्रीचा परवाना देण्यात आला. सदर करारावर दिनांक २ मार्च रोजी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत संचालक संशोधन डॉ.दत्तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ.उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ.स्मिता खोडके यांनी स्वाक्ष-या केल्या.
यावेळी कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागात विकसित केलेल्या विद्युतचलित कढईचा उपयोग महिला बचत गट, ग्रामीण महिला, शेतकरी उत्पादक कंपन्या व युवकांना लघुउद्योग सुरु करण्यास होणार आहे. विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, त्यांचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याकरिता विद्यापीठ विविध संस्था, उद्योजक व कंपन्याशी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर करार करित आहे.
सदर कढईची निर्मिती कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या डॉ स्मिता खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सदर बैठकीस संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ.देवराव देवसरकर, प्राचार्य डॉ.सईद इस्माईल, प्राचार्य डॉ. जया बंगाळे, प्राचार्य डॉ. राजेश क्षिरसागर, मे.बाबाजी ट्रेडर्स कंपनीचे श्री. शर्मा, डॉ.डिगांबर पेरके, डॉ.स्मिता सोळंकी, श्री.कोल्हे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ.शाम गरुड आदी उपस्थित होते.