केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या तीन पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला असुन याबाबत दिनांक ६ मार्च, २०२३ रोजी कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्द केली असुन राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ १०५६ (अ) हा आहे. सदर तीन वाणात विद्यापीठ विकसित तुरीचा वाण बीडीएन-२०१३-२ (रेणुका), सोयाबीनचे एमएयुएस-७२५ आणि करडई पिकाचे पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) या वाणांचा समावेश आहे. देशाच्या राजपत्रात वनामकृविच्या तीन पिक वाणांचा समावेश केल्यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणावर होण्यास मदत होणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे म्हणाले, त्यांनी ही वाण विकसित करण्यास योगदान देणारे मुख्य शास्त्रज्ञ डॉ एस बी घुगे, डॉ डि के पाटील, डॉ एस पी मेहत्रे आदीसह सर्व संबंधित शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
या वाणातील तुर पिकांतील रेणुका वाणास महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्याकरिता लागवडीकरिता प्रसारण करण्याची मान्यता देण्यात आली आहे तर सोयाबीनचे एमएयुएस-७२५ आणि करडई पिकांचे पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) हे राज्याकरिता लागवडीस मान्यता प्राप्त झाली. देशाच्या राजपत्रात वनामकृविच्या तीन पिक वाणांचा समावेशामुळे सदरील वाणांचे बीजोत्पादन हे मुख्य बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार असल्याची माहिती संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी दिली.
तीन वाणाची थोडक्यात माहिती
तुरीचा बीडीएन-२०१३-२ (रेणुका) वाण : तुरीचा रेणुका हा वाण विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बदनापुर येथील कृषि
संशोधन केंद्राने विकसित केलेला असुन हा वाण महाराष्ट्र,
गुजरात,
मध्यप्रदेश,
राजस्थान आणि छत्तीसगड या
मध्य भारत प्रभागासाठी प्रसारीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. हा वाण बीएसएमआर-७३६
मादी वाण वापरुन आयसीपी-११४८८ हा आफ्रीकन दाते वाण संकरीत करुन निवड पध्दतीने तयार
करण्यात आला आहे. हा वाण १६५ ते १७० दिवसात तयार होतो तसेच मर रोगास प्रतिकारक असून
वांझ रोगास प्रतिबंधक आहे. या वाणाचे १०० दाण्याचे वजन ११.७० ग्रॅम असुन फुलांचा रंग
पिवळा तर शेंगाचा रंग हिरवा आहे, दाणा लाल रंगाचा आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन क्षमता
हेक्टरी १८ ते २० क्विंटल आहे.
सोयाबीनचा एमएयुएस-७२५ वाण
: अखिल भारतीय
समन्वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्पाव्दारे विकसित हा वाण महाराष्ट्र राज्याकरिता
प्रसारित करण्यात आला आहे. हा वाण ९० ते ९५ दिवसात लवकर येणारा वाण असुन अर्ध निश्चित
वाढ चिरकी मोठी व गडद हिरवी पाने असलेला शेंगाची जास्त संख्या व २०-२५ टक्के चार दाण्यांच्या
शेंगा असलेला वाण आहे. बियाणाचा आकार मध्यम असुन १०० दाण्यांचे वजन १० ते १३ ग्रॅम
आहे. हा वाण किड व रोगास मध्यम प्रतिकारक असुन हेक्टरी उत्पादन क्षमता सरासरी २५
ते ३१.५० क्विंटल आहे.
करडई पिकांचे पीबीएनएस-१५४
(परभणी सुवर्णा) वाण : अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पाव्दारे विकसित हा वाण महाराष्ट्र
राज्याकरिता प्रसारित करण्यात आला आहे. हा वाण कोरडवाहु आणि बागायती लागवडीसाठी उपयुक्त
असुन यात तेलाचे प्रमाण अधिक (३०.९० टक्के) आहे. हा वाण मर रोग
आणि अल्टरनेरिया रोग आणि मावा किडीस सहनशील आहे. या वाणाचे हेक्टरी उत्पादन क्षमता
कोरडवाहु मध्ये १० ते १२ क्विंटल तर बागायतीमध्ये १५ ते १७ क्विंटल आहे.