विद्यापीठाच्या स्टुडिओ मधून यशस्वी शेतकरी उद्योजिका सौ. सरिता बारहाते यांची मुलाखत प्रसारित....
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शेतकरी देवो भव:
भावनेतून प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा मुलाखती द्वारे शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचवण्यात येत आहेत. या ऑनलाईन नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या मालिकेचा दुसरा भाग
दिनांक ११ फेब्रुवारी रोजी माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग उपस्थित होते. या
कार्यक्रमाचे आयोजन सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या भागात मानवत (जि. परभणी) प्रगतशील
महिला शेतकरी उद्योजिका सौ. सरिता बारहाते यांनी सेंद्रीय शेतीचे नियोजन व
त्यासाठी निभावलेली भूमिका विषयीची यशोगाथा विद्यापीठाच्या स्टुडिओ मधून त्यांच्या
मुलाखती द्वारे सादर केली.
यावेळी माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी म्हणाले
की, यांनी महिला शेतकऱ्यांची यशोगाथा विद्यापीठाच्या सर्व सुविधायुक्त स्टुडिओ
मधून प्रसारित होत असल्याबद्दल आंनद व्यक्त करून या स्टुडिओची बरोबरी दूरदर्शनच्या
स्टुडिओ सोबत केली. विद्यापीठ शेतकरी देवो भव: भावनेतून अनेक उपक्रम राबवत आहे.
याचाच भाग म्हणून प्रगतशील आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा शेतकऱ्यांपर्यंत
प्रभावीपणे पोहोचवत आहे. विद्यापीठाच्या विस्तार कार्याची राज्य आणि राष्ट्रीय
पातळीवर नोंद घेतली जाऊन प्रशंसा केली जाते. शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना ज्ञानाची
अत्यंत गरज आहे. शेतकरी – शास्त्रज्ञ - विस्तार कार्यातील तंत्रज्ञान हा त्रिवेणी संगम
शेतकऱ्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे. विद्यापीठ या त्रिवेणी
संगमाचा पुरेपूर लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन त्यांनी
करून पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शास्त्रज्ञ डॉ
दीपक पाटील यांनी जागतिक कडधान्य दिनानिमित्त तूरच्या गोदावरी वाणाची माहिती दिली.
सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे यांनी कार्यक्रमाचे
प्रास्ताविक केले.
मृदा शास्त्रज्ञा डॉ. पपिता गौरखेडे यांनी प्रगतशील महिला
शेतकरी सौ. सरिता बारहाते यांची मुलाखत घेतली. यावेळी सौ. सरिता बारहाते यांचे
शेतीचे नियोजन व त्यासाठी निभावलेली भूमिका यातून त्यांनी मिळविलेल्या यशाविषयी
अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी अवलंबलेले तंत्रज्ञान,
उत्पादन कौशल्य, शेतमाल विक्रीसाठी मालाची प्रतवारी, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया,
पॅकेजिंग, विक्री व्यवस्थापन पद्धती सांगितल्या. या सर्व बाबी अवलंबताना
विद्यापीठाच्या शास्तज्ञांचा सल्ला घेतला जातो हे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्या
यशस्वी महिला शेतकरी उद्योजिका असून त्यांच्या कडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि
काव्य संपदा आहे, असे त्यांच्या मुलाखती मध्ये दिसून येत होते. त्यांचे हे यश
त्यांनी अल्पावधी मध्ये मिळविलेले आहे. त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले
आहेत. त्यांचे उपस्थित शेतकऱ्यांनी कौतुक
करून अभिनंदन केले व शेती व्यवसायातील प्रश्न विचारले. त्यास त्यांनी समाधानकारक
उत्तरे दिली.
यावेळी त्यांनी माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग आणि विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांची वेळोवेळी मिळत
असलेल्या सहकार्याबद्दल आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल आभार मानले.
कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून शंभरहून अधिक
शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.
प्रगतशील महिला शेतकरी सौ. सरिता बारहाते यांची मुलाखत ऐकण्यासाठी खालील ट्युब लिंकला क्लिक करावे
https://youtube.com/live/rOo1SONe2zY