Friday, February 28, 2025

वनामकृवितील कर्मचारी कवी पांडुरंग वागतकर यांची कविता 'करपलेली खोळ' दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवडली

 कवीच्या पाठीवर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची कौतुकाची थाप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचारी आणि कवी श्री. पांडुरंग वागतकर यांच्या "करपलेली खोळ" या कवितेची निवड दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘कवी कट्टा’ या विशेष सत्रासाठी करण्यात आली होती. दिनांक २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे कवी वागतकर यांनी ही हृदयस्पर्शी कविता सादर केली.

या कवितेतून कवीने दुष्काळामुळे शेतकऱ्यांना भोगावे लागणारे हाल दर्शवले आहेत. त्यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे:

गोट्यावरच्या पाचटाला चघळुन पोटाची आग विजवते गाय,
कनगिच्या तळाला घरासाठी भाकर शोधते माय.

आटलेल्या विहीरीवर चिखलाचा हुंगते गाय,
हंडाभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळते माय.

या ओळींमधून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा अतिशय प्रभावीपणे मांडल्या आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेने विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य सातत्याने करत आहे. विद्यापीठातील कर्मचारी पांडुरंग वागतकर यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्या या काव्यप्रतिभेची विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कवी वागतकर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, उपकुलसचिव श्री. पु. को. काळे यांनीही कवी पांडुरंग वागतकर यांचे अभिनंदन केले.

कवी वागतकर यांनी आपल्या कवितेतून दुष्काळग्रस्त जनजीवनाचे वास्तव मांडत, शेती आणि शेतकऱ्यांची होणारी अवस्था समोर आणली आहे. त्यांनी पुढे लिहिले आहे:

दुष्काळात गेलेल्या वासरासाठी गोठ्यात हंबरते गाय,
आटला पाना जरी स्थनातून रक्त पाजते माय.

या ओळींमधून दुष्काळी परिस्थितीत जनावरांवर आणि कुटुंबांवर होणारे परिणाम कवी वागतकर यांनी अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केले आहेत. त्यांच्या या कवितेने मराठी साहित्य संमेलनात उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.