Showing posts with label Organic Farming. Show all posts
Showing posts with label Organic Farming. Show all posts

Sunday, February 27, 2022

स्वानुभवातुन एकात्मिक पध्दतीने केलेली सेंद्रीय शेती अधिक किफायतशीर .....डॉ. आदिनाथ पसलावार

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २६ फेब्रुवारी रोजी “महाराष्ट्रासाठी शाश्वत सेंद्रीय शेती’’ या विषयावर अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भगवान आसेवार हे होते तर मौजे बोरगव्हाण (ता. पाथरी, जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. वैभव खुडे, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. भगवान आसेवार यांनी प्रदुषणावर मात करण्यासाठी, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी, जैवविविधता टिकविण्यासाठी आणि सकस - संतुलीत आहाराच्या उपलब्धतेसाठी सेंद्रीय शेती करणे आवश्‍यक असल्‍याचे सांगितले.

प्रमुख वक्ते डॉ. आदिनाथ पसलावार म्‍हणाले की, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अवाचवी वापर यामुळे पारंपारीक शेतीचा किफायतशीरपणा कमी झाला आहे. शेतकरी बांधवाचे स्वत:च्या शेतातील अनुभवातुन स्वत: शास्त्रज्ञ बनुन एकात्मिक पध्दतीने सेंद्रीय शेती केल्‍यास निश्चितच अधिक किफायतशीर होईल. सेंद्रीय शेतीत देशी वाणांची निवड, पिकांची फेरपालट, मुलस्थानी पालापाचोळा कुजवणे, जैव आच्छादनाचा वापर, सापळा पिकांचा वापर, जैविक किटकनाशकांचा वापर करुन उत्पादन वाढ करता येते, असे सांगुन त्‍यांनी दशपर्णी अर्क, पंचगव्य, बीजामृत, जीवामृत आदींचे महत्व सांगितले.

प्रगतशील शेतकरी श्री. वैभव खुडे यांनी सेंद्रीय पध्दतीने रेशीम उद्योगा बाबतचे स्वत: चे अनुभव सांगितले. त्‍यांनी बचतगटाच्या माध्यमातुन रेशीम उद्योगासोबतच शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन आदीं पुरक व्यवसायांची जोडी दिली असुन सेंद्रीय शेतीमध्ये विविध प्रयोग करुन जीवनमान उंचावन्यास मोलाची मदत झाली असल्‍याचे त्यांनी सांगितले. 

प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सुत्रसंचलन डॉ. विशाल अवसरमल यांनी केले तर आभार डॉ. पंकज ददगाळे मानले तसेच श्री. ऋषिकेश औंढेकर यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, दिपक शिंदे, अभिजीत कदम, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.

Saturday, February 26, 2022

भारतीय शेतक-यांचे पारंपारीक ज्ञान व शेती पध्दती सेंद्रीय शेतीसाठी पूरक..... डॉ. के. अे. गोपीनाथ, केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैद्राबाद

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २५ फेब्रुवारी रोजी “सेंद्रीय शेतीसाठी गांडुळ खत व कंपोस्ट खत निर्मिती’’ यावर अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. शाम जाधव व डॉ. नितीन कोंडे यांच्या व्याख्यानाने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी हैद्राबाद येथील भाकृअप - केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थचे प्रमुख शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. के. अे. गोपीनाथ हे होते तर मौजे राणीसावरगांव (ता.गंगाखेड, जि.परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. शिवप्रसाद कोरे, मौजे लोहगाव (ता.जि.परभणी) येथील प्रगतशील महिला शेतकरी कु. रेणुका सीताराम देशमुख, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. मिनाक्षी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. के. अे. गोपीनाथ म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीत शास्त्रीय ज्ञान तसेच शेतकरी बांधवाचे अनुभव अत्यंत महत्‍वाचे आहेत. भारतीय शेतक-यांचे पारंपारीक ज्ञान व शेती पध्दती हे सेंद्रीय शेतीसाठी पुरकच आहेत. या ज्ञानाच्‍या बळावर आजपर्यंत आपण यशस्वीपणे शेती करत आलेलो आहोत. भारतीय शेतक-यांचे आंतर पीक पध्दती, पीक फेरपालट, शेती मशागतीच्या पध्दती, सेंद्रीय खत निर्मितीच्या पध्दती आदींचे पारंपारीक ज्ञानाचा सेंद्रीय शेती करतांना निश्चितच उपयोगी आहे. हे भारतीय शेतक-यांचे ज्ञान खुपच उपयोगी असल्‍याचे थोर शास्‍त्रज्ञ सर अल्बर्ट होवार्ड यांनीही नमुद केले आहे.

मार्गदर्शनात प्रमुख वक्ते डॉ. शाम जाधव म्हणाले की, जमिनीचे आरोग्य हे तीन बाबींवर अवलंबुन असुन यात जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचा समोवेश होतो. भौतिक गुणधर्मात जमिनीची घनता, पाणी धरुन ठेवण्याची क्षमता, विविध पदार्थाचे प्रमाण याचा समावेश होतो तर रासायनिक गुणधर्मात जमिनीचा सामु, विद्युत वाहकता सेंद्रीय कर्ब उपलब्ध होणारे मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्याचा अंतर्भाव होतो. जैविक गुणधर्मात जमिनीमध्ये आढळणारी सुक्ष्मजीव तसेच गांडुळ व कृमी यांचा समावेश होतो. जमिनीचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी ही गुणधर्म योग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. सेंद्रीय पदार्थाचे विघटन करण्यासाठी जमिनीतील सुक्ष्मजीव व इतर सजीव यांचा उपयोग होतो, ज्यामुळे पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध होतात. यावेळी त्‍यांनी कंपोस्ट खत तयार करण्यासाठीच्या विविध पध्दती जसे नाडेप, इंदौर, पी.डी.के.व्ही. कंपोस्ट पध्दत यावर माहिती दिली.

डॉ. नितीन कोंडे म्‍हणाले की, जमिनीतील कर्ब वाढवणे सद्यस्थितीत महत्वाचे असुन मागील काही वर्षापासुन हवामानाच्या बदलामुळे अनियमीत पाऊस तसेच सोसाटयाचा वारा यामुळे जमिनीची धुप मोठया प्रमाणावर होत आहे, जमिनीवरचा अन्नद्रव्य भरपुर प्रमाणात असलेला मातीचा थर वाहुन जात असुन परिणामी पिकाचे उत्पादन घटत आहे. मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता व निच­याची क्षमता घटत चालली आहे. हे सर्व सुस्थितीत आणण्यासाठी जैविक खते जसे कंपोस्ट खत, गांडुळ खत, लेंडी खत वापरणे गरजेचे झाले आहे.

प्रगतशील शेतकरी श्री. शिवप्रसाद कोरे यांनी त्यांच्या सेंद्रीय टरबूज लागवडीबद्दलचे अनुभव सांगतांना म्‍हणाले की, सेंद्रीय पध्दतीने उत्पादित केलेले टरबुज दिर्घकाळ टिकते व खायला चविष्ट असतात. तर श्रीमती रेणुका सीताराम देशमुख आपल्‍या सेंद्रीय शेतीतील अनुभव सांगताना म्हणाल्या की, सेंद्रीय शेतीत गांडुळ खताचे महत्‍व आहे. माझ्या शेतावर तीन गुंठयावर गांडुळ खत प्रकल्प असुन वर्षाला शंभर टन गांडुळ खत निर्मिती होते, गांडुळ बीज शेतक­यांना पुरवते. चंद्रपुर जिल्हयातील आदिवासी शेतक­यांना गांडुळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सदरिल ऑनलाईन व्‍याख्‍यानात दोन हजार पेक्षा अधिक शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. विशाल अवसरमल यांनी केले आणि आभार डॉ. पंकज ददगाळे यांनी मानले तर प्रा. शरद चेनलवाड यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. पपीता गौरखेडे, दिपक शिंदे, अभिजीत कदम, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.

Sunday, September 20, 2020

वनामकृविच्‍या वतीने सेंद्रीय शेती वर राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन पंधरा दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांच्‍या प्रमुख उपस्थित ऑनलाईन उदघाटन

देशातील नामांकित तज्ञ करणार मार्गदर्शन, रोज सायंकाळी ७.०० वाजता ऑनलाईन मार्गदर्शन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प आणि मुंबई येथील फार्म दु फोर्क सोल्‍युशन्‍य यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक २१ सप्‍टेबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान सेंद्रीय शेती यावर पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेच्‍या माध्‍यमातुन आयोजन करण्‍यात आले आहे. प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक २१ सप्‍टेबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता राज्‍याचे माननीय कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांच्‍या हस्‍ते ऑनलाईन पध्‍दतीने होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार आहेत. विशेष अतिथी म्‍हणुन  गुजरात येथील आनंद कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ आर व्‍ही व्‍यास हे उपस्थित राहणार असुन विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, नागपुर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ ध्रुवेंद्र कुमार, भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्‍याण मंत्रालयातील सल्‍लागार डॉ ए के यादव, कृषि आयुक्‍तालयातील कृषि संचालक श्री दिलीप झेंडे, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सदरील प्रशिक्षणात सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीमध्‍ये अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, कीड व रोग व्‍यवस्‍थापन, अवजारांचा कार्यक्षम वापर, सौर ऊर्जा व इतर अपारंपारिक साधनांचा वापर, निविष्‍ठांची निर्मिती व वापर, विक्री व बाजारपेठ तंत्रज्ञान, सेंद्रीय प्रमाणीकरण आदी विविध विषयांवर राज्‍यातील व देशातील नामांकित कृषि विद्यापीठे, संशोधन संस्‍था, स्‍वयंसेवी संस्‍थेतील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

सदरिल प्रशिक्षणात शेतकरी बंधु भगिनी, कृषि विज्ञान केद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि शास्‍त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्‍वयंसेवी संस्‍थाचे सदस्‍य, विद्यार्थी आदींनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजन प्रमुख अन्‍वेषक डॉ आनंद गोरे, संशोधन अभियंता डॉ स्मिता सोलंकी, फार्म टु फोर्क सोल्‍युशन्‍सचे संचालक श्री उमेश कांबळे यांनी केले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्‍वयक डॉ रणजित चव्‍हाण, डॉ अनुराधा लाड, डॉ पपिता गौरखेडे, श्री अभिजीत कदम हे आहेत. कार्यक्रमात सहभाग नोंदवण्‍यासाठी  https://forms.gle/E55kzXUEdDfRHbPg6  येथे करून ऑनलाईन फोर्म भरावा. आजपर्यंत दिड हजार पेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली असुन  प्रशिक्षण यशस्‍वीरित्‍या पुर्ण करणा-यांना डिजिटल प्रमाणपत्राचे वितरित करण्‍यात येईल. सहभागी होण्‍याकरिता झुम मिंटिंग आय डी ९९५ ६३१४ ८२४१ व पॉसवर्ड १२३४५ वापर करावा. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे.