Showing posts with label PARBHANI. Show all posts
Showing posts with label PARBHANI. Show all posts

Sunday, September 20, 2020

वनामकृविच्‍या वतीने सेंद्रीय शेती वर राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन पंधरा दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांच्‍या प्रमुख उपस्थित ऑनलाईन उदघाटन

देशातील नामांकित तज्ञ करणार मार्गदर्शन, रोज सायंकाळी ७.०० वाजता ऑनलाईन मार्गदर्शन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प आणि मुंबई येथील फार्म दु फोर्क सोल्‍युशन्‍य यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक २१ सप्‍टेबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान सेंद्रीय शेती यावर पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेच्‍या माध्‍यमातुन आयोजन करण्‍यात आले आहे. प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक २१ सप्‍टेबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता राज्‍याचे माननीय कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांच्‍या हस्‍ते ऑनलाईन पध्‍दतीने होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार आहेत. विशेष अतिथी म्‍हणुन  गुजरात येथील आनंद कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ आर व्‍ही व्‍यास हे उपस्थित राहणार असुन विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, नागपुर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ ध्रुवेंद्र कुमार, भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्‍याण मंत्रालयातील सल्‍लागार डॉ ए के यादव, कृषि आयुक्‍तालयातील कृषि संचालक श्री दिलीप झेंडे, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सदरील प्रशिक्षणात सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीमध्‍ये अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, कीड व रोग व्‍यवस्‍थापन, अवजारांचा कार्यक्षम वापर, सौर ऊर्जा व इतर अपारंपारिक साधनांचा वापर, निविष्‍ठांची निर्मिती व वापर, विक्री व बाजारपेठ तंत्रज्ञान, सेंद्रीय प्रमाणीकरण आदी विविध विषयांवर राज्‍यातील व देशातील नामांकित कृषि विद्यापीठे, संशोधन संस्‍था, स्‍वयंसेवी संस्‍थेतील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

सदरिल प्रशिक्षणात शेतकरी बंधु भगिनी, कृषि विज्ञान केद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि शास्‍त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्‍वयंसेवी संस्‍थाचे सदस्‍य, विद्यार्थी आदींनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजन प्रमुख अन्‍वेषक डॉ आनंद गोरे, संशोधन अभियंता डॉ स्मिता सोलंकी, फार्म टु फोर्क सोल्‍युशन्‍सचे संचालक श्री उमेश कांबळे यांनी केले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्‍वयक डॉ रणजित चव्‍हाण, डॉ अनुराधा लाड, डॉ पपिता गौरखेडे, श्री अभिजीत कदम हे आहेत. कार्यक्रमात सहभाग नोंदवण्‍यासाठी  https://forms.gle/E55kzXUEdDfRHbPg6  येथे करून ऑनलाईन फोर्म भरावा. आजपर्यंत दिड हजार पेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली असुन  प्रशिक्षण यशस्‍वीरित्‍या पुर्ण करणा-यांना डिजिटल प्रमाणपत्राचे वितरित करण्‍यात येईल. सहभागी होण्‍याकरिता झुम मिंटिंग आय डी ९९५ ६३१४ ८२४१ व पॉसवर्ड १२३४५ वापर करावा. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे. 


Saturday, March 14, 2020

सन २०२२ मध्‍ये वनामकृविचे नविन कापूस संकरित वाण बी टी स्वरुपात उपलब्ध होणार

वनामकृवि व महाबीज मध्‍ये सामंजस्‍य करार 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ने प्रसारित केलेले कपाशीचे एनएचएच २५० व एनएचएच ७१५ हे दोन संकरित वाण बीजी २ स्वरुपात संस्करीत होणार आहेत. या बाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (वनामकृवि) व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला (महाबीज) यांचे दरम्यान सामंजस्य करार दि. ११ मार्च रोजी अकोला येथे पार पडला. या करारावर वनामकृवि चे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व महाबीजचे महाव्यवस्थापक गुणनियंत्रण डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी स्वाक्षरी केली. यावेळी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, महाबीजचे व्यवस्थापकीये संचालक श्री अनिल भंडारी, अकोला कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खर्चे, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, महाबीजचे महाव्यवस्थापक उत्पादन श्री पांडुरंग फुंडकर, श्री खिस्ते, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. दिनेश पाटील, डॉ. शिवाजी तेलंग, प्रा. अरुण गायकवाड आदींची उपस्थिती होती.
मागील हंगामामध्ये वनामकृवि व महाबीज यांच्या सामंजस्य करारातून तयार झालेला एनएचएच ४४ हा बीटी वाण शेतकऱ्यांना महाबीजद्वारे मराठवाड्यामध्ये वितरीत करण्यात आला. या वाणास शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून या वाणाने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या अन्य भागातून एनएचएच ४४ बीटी या वाणाची उपलब्धता करण्यासाठी महाबीजकडे मागणी वाढत आहे. तसेच विद्यापीठ विकसित अधिक उत्‍पादन देणा-या नविन बीटी वाणांची मागणी होत आहे. या पाश्वभूमीवर विद्यापीठाचे अधिक उत्‍पादन क्षमता असणारे नविन वाणांचे जनुकीय तंत्रज्ञान युक्त (बोलगार्ड २) स्वरुपात संस्करण महाबीजद्वारे करण्यात येणार आहे.
वरील दोन्ही वाण रसशोषण करणाऱ्या किडींना सहनशील आहेत. एनएचएच २५० हा वाण मध्य भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व ओरिसा या राज्यांमध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला असून एनएचएच ७१५ हा वाण मध्य भारत व दक्षिण भारतातील (कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना व तमिळनाडू) राज्यांमध्ये लागवडीसाठी सन २०१८ मध्ये प्रसारीत करण्यात आला आहे. हे दोन्ही वाण उत्पादन व धाग्याची गुणधर्म या दोन्ही बाबतीत राष्ट्रीय स्तरावरील संशोधनात सरस आढळून आले आहेत. या वाणांचे बोलगार्ड २ स्वरूपातील बियाणे २०२२ हंगामातील शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकेल असे यावेळी सांगण्यात आले.

Friday, March 13, 2020

जागतिक शेतीची वाटचाल काटेकोर शेती कडुन डिजिटल शेतीकडे .....मलेशिया येथील शास्‍त्रज्ञ डॉ सिवा बालसुंदरम

वनामकृवित डिजिटल शेतीवर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन
सद्या जागतिकस्तरावर काटेकोर शेती प्रचलित होत असुन हीच शेती आता डिजिटल शेतीकडे वाटचाल करित आहे. भारतातील बहुसंख्य शेतकरी अल्पभुधारक असुन हे डिजिटल तंत्रज्ञान त्‍यांना आर्थिकदृष्टया किफायतीशीर असले पाहिजे, असे प्रतिपादन मलेशिया येथील पुत्रा विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ सिवा बालसुंदरम यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांच्‍या वतीने दिनांक 13 ते 15 मार्च दरम्‍यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले असुन या कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी (दिनांक 13 मार्च रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन अमेरिकेच्या राष्ट्रीय आंतरीक्ष संस्थेचे अंतरीक्ष राजदूत श्री अविनाश शिरोडे होते, व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, खरगपुर येथील आयआयटीचे प्रा आर माचावरम, प्रा ए के देब, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ सिवा बालसुंदरम पुढे म्‍हणाले की, एका बाजुस वाढती लोकसंख्‍या असुन दुस-या बाजुस जागतिक हवामान बदलाचा शेतीवर परिणाम होत आहे. पंरतु संगणकीय क्षमता प्रचंड वाढत असुन प्रत्‍येकाच्‍या हातात मोबाईलच्‍या माध्‍यमातुन एक शक्‍तीशाली यंत्र आले आहे. डिजिटल शेतीत या स्‍मार्टफोनचा मोठा उपयोग होणार आहे. सद्यस्थितीत विदेशात शेतीत डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, रोबोट, ड्रोन, स्‍वयंचलित यंत्र याचा वापर होत आहे. आज तरूण शेतीपासुन दुर जात आहेत, परंतु डिजिटल शेतीमध्ये तरूणांना आकर्षीत करण्‍याची ताकत आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

श्री अविनाश शिरोडे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आजच्‍या जागतिक हवामान बदल व कमी होत जाणारी साधनसंपत्‍ती पाहाता, भविष्‍यात मानव अंतरीक्षात वस्‍तीकरण्‍यासाठी स्‍थंलातरित होईल, याकरिता लवकरच नासा चंद्रावर वस्‍तीकरण्‍यासाठी अभियान राबविणार असुन अंतरिक्षात शेती ही संकल्‍पनाही राबविणार आहे. अंतरिक्ष शेतीबाबत ही कृषि विद्यापीठास संशोधनास वाव आहे.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतीतील मनुष्‍यांचे कष्‍ट कमी करण्‍यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार आहे. डिजिटल शेती संकल्‍पनेस चालना देण्‍याकरिता जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषदेने परभणी कृषि विद्यापीठास सेंटर ऑफ एक्सेलन्स प्रशिक्षण प्रकल्पास मान्‍यता दिली, यात विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, विद्यार्थ्‍यी यांना देश व विदेशातील डि‍जिटल तंत्रज्ञान समजुन घेण्‍यास मोठी मदत होऊन डिजिटल शेती संशोधनास मोठी चालना मिळेल. आजही मोठी लोकसंख्‍या अन्‍नावाचुन भुकेली आहे तर दुस-या बाजुस मोठया प्रमाणात शेतमालाची नासाडी होत आहे. या शेतमालाचे मुल्‍यवर्धन करणे, शेतमाल प्रक्रिया यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यास मोठा वाव आहे. डिजिटल तंत्रज्ञानामाध्‍यमातुन शेतीनिविष्‍ठाचा कार्यक्षम वापर व उत्‍पादन खर्च कमी करणे शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ वीणा भालेराव यांनी केले  तर आभार प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी मानले. सदरिल तीन दिवसीय कार्यशाळेत शेतीतील उपयुक्त ठरू शकणारे कृत्रिम बुध्दीमत्त, डिजिटल साधनेयंत्रमानवड्रोनव्दारे फवारणी आदीं विषयावर विविध मान्यवर मार्गदर्शन करणार असुन यामुळे डिजिटल शेती संशोधनास चालना मिळणार आहे. कार्यशाळेचे उदघाटन डिजिटल पध्दतीने दिप प्रज्वलन करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाच्या पोर्टलचे विमोचन करण्यात आले. कार्यशाळेत विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थ्यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मो

नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेने मान्यता प्राप्‍त व जागतिक बॅक अर्थसहाय्यीत 'कृषि उत्पादकता वाढीकरिता यंत्रमानवड्रोन व स्वयंचलित यंत्राव्दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्स प्रशिक्षण प्रकल्प परभणी कृषि विद्यापीठास सन 2022 पर्यंत मंजुर झाला असुन पुढील दोन वर्षात यंत्रमानवड्रोन व स्वयंचलीत यंत्र सारखी डिजीटल साधनांचा समावेश असणा-या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थ्यी व संशोधक प्राध्यापकांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात येणार आहेया केंद्राव्दारे कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थी डिजिटल शेतीचे तंत्र शेतक-यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहेतयात डिजिटल शेतीच्या तंत्रज्ञानात्मक देवाणघेवाण करिता जगातील अग्रगण्य विद्यापीठाशी सामंजस्य करार केला असुन यात अमेरिकेतील वॉशिग्टन स्टेट युनिव्हर्सिटी तसेच स्पेनयुक्रेन व बेलारूस येथील विद्यापीठांचा समावेश आहेतसेच पवई व खरगपुर येथील आयआयटी संस्थेचे नॉलेज सेंटर म्हणुन सहकार्य लाभणार आहेप्रकल्पास अठरा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहेयात पन्नास टक्के वाटा जागतिक बॅक व पन्नास टक्के वाटा भारत सरकार कडुन भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या माध्यमातुन प्राप्त होणार आहे. प्रकल्पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे असुन या प्रकल्‍पाचे चार उप घटक आहेत, याचे डॉ उदय खोडके, डॉ राजेश कदम, डॉ संजय पवार, डॉ भगवान आसेवार हे प्रमुख आहेत. तसेच विद्यापीठ शास्त्रज्ञांची २१ सदस्यीय कोर टीम तयार करण्यात आली असुन इतर ४० संशोधक प्राध्यापकांचाही सहभाग राहणार आहे. 
शास्त्रज्ञ मा डॉ सिवा बालसुंदरम

मा श्री अविनाश शिरोडे 
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण