Friday, October 19, 2018

वनामकृवित नांदेड-४४ व पीकेव्‍ही हायब्रीड-२ बीटी परावर्तीत कपाशी वाणांचे पीक प्रात्‍यक्षिक पाहणी

महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादीत अकोला व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांचे संयुक्‍त विद्यमाने संकरीत कपाशी नांदेड-४४ (एनएचएच-४४) व पीकेव्‍ही हायब्रीड-२ बीटी वाणांचे पीक प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रम दिनांक २२ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता परभणी येथील विद्यापीठ मध्‍यवर्ती प्रक्षेत्र - बलसा विभाग येथे आयोजित करण्‍यात आला असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे राहणार आहेत. महाबीजचे व्‍यवस्‍‍थापकीय संचालक मा श्री ओमप्रकाश देशमुख व महा‍बीजचे संचालक मा श्री वल्‍लभरावजी देशमुख यांची प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थिती राहणार असुन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाबीजचे महा‍व्‍यवस्‍थापक (उत्‍पादन) श्री सुरेश पुंडकर, महाव्‍यवस्‍थापक (विपणन) श्री रामचंद्र नाके, महाव्‍यवस्‍थापक (गुण नियंत्रण व संशोधन) डॉ प्रफुल्‍ल लहाने, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे, कापुस विशेषज्ञ डॉ खिजर बेग आदी प्रमुख मार्गदर्शक उपस्थिती लाभणार आहे. शेतकरी बांधवानी सदरिल पीक प्रात्‍यक्षिक पाहण्‍यास उपस्थित राहण्‍याचे आवाहन महा‍बीज विभागीय व्‍यवस्‍थापक श्री सुरेश गायकवाड, मध्‍यवर्ती प्रक्षेत्राचे  प्रभारी अधिकारी डॉ विलास खर्गखराटे व महाबीज जिल्‍हा व्‍यवस्‍थापक श्री गणेश चिरूटकर यांनी केले आहे.

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रातुन १९८४ साली विकसित झालेला कपाशीचा नांदेड-४४ (एनएचएच-४४) हा संकरित वाण कपाशीचे बीटी वाण येण्‍यापुर्वी अधिक उत्‍पादन देणारा, पुनर्बहाराची क्षमता असलेला व रसशोषण करणा-या कीडींना प्रतिकारक असल्‍यामुळे मराठवाडा व राज्‍यातीलच नव्‍हे तर देशातील इतर राज्‍यातील शेतक-यांमध्‍ये मोठया प्रमाणावर लागवडीसाठी प्रचलित होता. हा वाण जनुकीय परावर्तनासाठी म्‍हणजेचे बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी मार्च २०१४ मध्‍ये वनामकृवि व महाबीज मध्‍ये सामंजस्‍य करार करण्‍यात आला. त्‍यानंतर नांदेड-४४ हा वाण बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला असुन गेल्‍या तीन वर्षापासुन सातत्‍याने त्‍यांच्‍या प्रक्षेत्र चाचण्‍या यशस्‍वी झाल्‍या आहेत. त्‍याचा प्रात्‍यक्षिकाचा भाग म्‍हणुन सदरिल प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी दिली.

Thursday, October 18, 2018

भारतीय कृषि संशोधन परिषदेची वनामकृविस पुढील पाच वर्षाकरिता अधिस्‍वीकृती

नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेची राष्‍ट्रीय कृषि शिक्षण अधिस्‍वीकृती मंडळाची २२ वी बैठक दिनांक २८ सप्‍टेबर रोजी परिषदेचे महासंचालक मा. डॉ. त्रिलोचन महापात्रा यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अधिस्‍वीकृतीस मान्‍यता देण्‍यात आली असुन ही अधिस्‍वीकृती पुढील पाच वर्षाकरिता आहे. विद्यापीठास शै‍क्षणिक दर्जाच्‍या आधारे एकुण ४ पैकी २.७७ मिळाले असुन विद्यापीठाने दर्जा प्राप्‍त केला आहे. विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी, लातुर, बदनापुर, गोळेगाव, उस्‍मानाबाद व अंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालये तसेच परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्‍नतंत्र महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, सामाजिक विज्ञान महाविद्यालय व लातुर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास अधिस्‍वीकृती प्राप्‍त झाली आहे. या महाविद्यालयातील सर्व पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीच्या अधिस्‍वीकृ‍तीस बैठकीत मान्‍यता देण्‍यात आली आहे. केवळ पशुसंवर्धन, दुग्धशास्‍त्र, जैवतंत्रज्ञान व कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन विषयातील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम हा भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या कार्यक्षेत्रात येत नसल्‍यामुळे अधिस्‍वीकृती अप्राप्‍त आहे. 

यापुर्वी परिषदेने काही अ‍टींवर विद्यापीठास दोन वर्षाकरिता तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात अधिस्‍वीकृती दिली होती. विशेषत: परिषदेने विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा, रिक्‍त पदे व खासगी महाविद्यालयाच्‍या शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले होते तर काही घटक महाविद्यालये अधिस्‍वीकृतीपासुन वंचित राहीली होती, यामुळे विद्यापीठावर मोठया प्रमाणावर टिकाटिप्‍पणी झाली होती. परंतु मागील दोन वर्षात माननीय राज्‍यपाल यांनी विशेष लक्ष दिल्‍यामुळे विद्यापीठांतर्गत एकाही खासगी महाविद्यालयास व अतिरिक्‍त तुकडीस मंजुरी न देता त्‍यांच्‍या शैक्षणिक दर्जा सुधारण्‍याकरिता प्रयत्‍न केला तसेच राज्‍यशासनाच्‍या मदतीने विद्यापीठातील रिक्‍त पदे भरण्‍याचे प्रयत्‍न झाले. शैक्षणिक दर्जा सुधारणेसाठी माजी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व सद्याचे कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली शिक्षण संचालक तथा‍ अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील यांनी सर्व सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य यांच्‍या मदतीने विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील प्रयोगशाळा, वसतीगृहे, ग्रंथालये, संशोधनासाठी लागणारी साधनसंपत्‍ती आदींची बळकटीकरण केले तसेच विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्‍न केले गेले. शैक्षणिक दर्जाच्‍या मुल्‍यांकन करण्‍याकरिता दिनांक २० ते २३ सप्‍टेबर दरम्यान भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या अधिस्‍वीकृती मंडळाचे सदस्‍यांनी विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयांना भेट दिली असता समाधान व्‍यक्‍त केले. त्‍यामुळे मुल्‍यांकनात शैक्षणिक दर्जेच्‍या आधारे विद्यापीठास ४ पैकी २.७७ गुण प्राप्‍त झाले, पुढील पाच वर्षाकरिता विद्यापीठास अधिस्‍वीकृती मिळाली.

विशेषत: परभणी व लातुर येथील कृषि महाविद्यालयास मुल्‍यांकनात ४ पैकी ३ गुण प्राप्‍त केले असुन उस्‍मानाबाद (२.८६ गुण), बदनापुर (२.७३ गुण), गोळेगांव (२.५६ गुण), व अंबेजोगाई (२.५५ गुण) येथील कृषि महाविद्यालये तसेच परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (२.९१ गुण), अन्‍नतंत्र महाविद्यालय (२.८७ गुण), सामाजिक विज्ञान महाविद्यालय (२.८४ गुण), उद्यानविद्या महाविद्यालय (२.८२ गुण) व लातुर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास (२.८० गुण) गुणासह अधिस्‍वीकृती प्राप्‍त झाली.

सदरिल अधिस्‍वीकृतीमुळे भारतीय कृषि संशोधन परिषदेमार्फत राबविण्‍यात येणारे शैक्षणिक कार्यक्रमे व साधनसंपत्‍तीसाठी निधी सर्व महाविद्यालयांना उपलब्‍ध होणार असुन विद्यापीठाच्‍या शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण कार्यास मोठी चालना मिळणार आहे. तसेच राष्‍ट्रीय बुध्‍दीमत्‍ता शिष्‍यवृत्‍ती - एनटिएस प्राप्‍त आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय विद्यार्थ्‍यांना विद्यापीठात पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठी प्रवेशासाठीची संधी उपलब्‍ध होईल. दस-यांच्‍या पुर्वसंध्‍येस मिळालेल्‍या विद्यापीठ अधिस्‍वीकृतीमुळे विद्यापीठातील अधिकारी, प्रशासक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी यांच्‍या मध्‍ये उत्‍साहाचे वातावरण पसरले आहे.

Tuesday, October 16, 2018

वनामकृवित वाचन प्रेरणा दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने राजमाता जिजाऊ मुलींने वसतीगृहात दिनांक 15 ऑक्‍टोबर रोजी भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांच्‍या जयंती निमित्‍त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले होते तर मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ आर पी कदम, शिक्षण विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ आर व्‍ही चव्‍हाण, डॉ जे व्‍ही एकाळे, डॉ एस पी झाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ डि एन गोखले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, माजी राष्‍ट्रपती भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांनी देशाच्‍या अवकाश संशोधनात व सैन्‍य मिसाइल विकासात मोठे योगदान दिले. आजच्‍या युवकांना प्रेरणादायी असे त्‍यांनी लिखान केले असुन विद्यार्थ्‍यांनी त्‍यांचे वाचन करावे. वाचनामुळे विचारात प्रगल्‍भता येते. वाचनाने विज्ञान क्षेञातील विद्यार्थ्‍यांना दर्जात्‍मक संशोधनास चालना मिळते.   
वाचन प्रेरणा दिनानिमित्‍त वसतीगृहात सामुदायिक वाचनाचा उपक्रम घेण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नेहा काळे हिने केले तर आभार डॉ जे व्‍ही एकाळे यांनी मानले. कार्यक्रमास कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

मौजे उजळंबा येथे रबी शेतकरी मेळावा संपन्‍न

ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्‍यांनी केले आयोजन
परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्‍या सातव्‍या सत्राच्‍या कृषिकन्‍यांनी मौजे उजळंबा येथे दिनांक 15 ऑक्‍टोबर रोजी रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर उजळंबा गांवचे सरपंचा श्रीमती रूक्‍मीणबाई मोगले, बाभुळगांव गांवचे सरपंच गणेश दळवे, विभाग प्रमख डॉ आर डी आहिरे, डॉ बी एम ठोंबरे, डॉ जी आर हनवते, कृषि अधिकारी श्री वैजनाथ रणेर, प्रगतशील शेतकरी राजाभाऊ रगड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ डि एन गोखले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतकरी बांधवानी गट शेतीच्‍या माध्‍यमातुन शेती केल्‍यास निश्चितच फायदा होतो, विशेषत: गटाच्‍या माध्‍यमातुन शेतमाल विक्री केल्‍यास योग्‍य भाव मिळवु शकतो. कोरडवाहु शेती मध्‍ये पिक लागवड करतांना योग्‍य झाडांची संख्‍या राखणे आवश्‍यक असुन आंतरपिक पध्‍दतीचा जास्‍तीत जास्‍त अवलंब करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.  
यावेळी पशुसंवर्धन व दुग्‍ध व्‍यवसायावर डॉ बी एम ठोंबरे यांनी तर विद्यापीठ विस्‍तार सेवेबाबत डॉ आर डी आहिरे व रबी पिकांच्‍या लागवडीवर डॉ जी आर हनवते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन अदिती वाघ हिने केले तर आभार डॉ ए पी जगताप यांनी मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिकन्‍यांनी परिश्रम घेतले.

Saturday, October 13, 2018

आंतर महाविद्यालयीन युवक महोत्‍सवात परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांचे यश

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयात दिनांक 9 ऑक्‍टोबर रोजी आंतर महाविद्यालयीन युवक महोत्‍सव 2018 चे आयोजन करण्‍यात आले होते. या युवक महोत्‍सवात मराठवाडयातील वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी विविध कला प्रकारात सहभाग नोंदविला होता. परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी लोकनुत्‍य, विडंबनात्‍मक प्रहसन, मुकाभिनय, एकपात्री अभिनय व लावणी या कलाप्रकारामध्‍ये सहभाग नोंदविला. एकपात्री अभिनयामध्‍ये महाविद्यालयाची विद्यार्थ्‍यांनी ऋतुजा पोरकर हिने प्रथम क्रमांक पटकावुन सुवर्ण पदक प्राप्त केले तर लोकनृत्‍य प्रकारात महाविद्यालयाच्‍या संघाने तिसरा क्रमांक प्राप्‍त केला. बक्षीस वितरण विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य डॉ अरूण कदम, डॉ उद्य खोडके यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.  यशाबाबत प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन केले. संघाच्‍या यशस्‍वीतेसाठी डॉ पपिता गौरखेडे, प्रा पी के वाघमारे, प्रा. बैनवाड आदींनी मार्गदर्शन केले.

Thursday, October 11, 2018

लातूर येथील कृषी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव उत्‍साहात संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयात दिनांक ९ व १० ऑक्टोबर रोजी आंतर महाविद्यालयीन युवक महोत्‍सव २०१८ नटरंग आयोजन करण्‍यात आले होते. युवक महोत्‍सवाचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर दयानंद कला महाविद्यालयाचे सांस्‍कृतिक विभागाचे प्रमुख प्रा डॉ संदीप जगदाळे, शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, प्राचार्य डॉ. अरुण कदम, प्राचार्य प्रा. हेमंत पाटील, डॉ. उद्य खोडके, सौ.आशा देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.  
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, कला ही मानवी जीवनात नवचैतन्‍य व आनंद निर्माण करते, कलाकाराला प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविता येते. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यांनी एकतरी कला जोपासली पाहिजे. कलेची ताकद ओळखता आली पाहिजे, कलेव्‍दारे नवीन अविष्कार घडविता आला पाहिजेत. कलेला कोणतीही सीमा नसते, भाषा कलेला बांधून ठेवू शकत नाही, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त करून लातुर कृषि महाविद्यालयाने युवक महोत्‍सवाचे शिस्तबद्ध व नीटनेटक्या आयोजनाबाबत कौतुक केले.
प्रा. डॉ. संदीप जगदाळे यांनी आपल्‍या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना कलेची भक्ती आणि साधना करण्याचा सल्‍ला देऊन सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व्‍यक्‍तीमत्‍व जडणघडनेत महत्वाची भूमिका निभावतात, कलेव्‍दारे सामाजिक ऋण फेडता येते व समाज परिवर्तनही करणे शक्य असल्‍याचे सांगितले.
शिक्षण संचालक डॉ.विलास पाटील आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, कलाकार हे ईश्वराचे रूप असून कला ही जीवन कसे जगायचे हे शिकवते असे सांगुन विद्यार्थ्याचा जडणघडण प्रक्रियेत कला आणि क्रीडा यांचा अभ्यासाबरोबर महत्वाचा वाटा असल्‍याचे विषद केले.
यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख व डॉ. उदय खोडके यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अरुण कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे यांनी केले तर आभार डॉ. विजय भांबरे यांनी मानले.
सदरिल युवक महोत्सवात विद्यापीठांतर्गत घटक व सलंग्न महाविद्यालयातील २७ संघाच्या ५२५ विद्यार्थ्यांनी व १२५ संघ व्यवस्थापक व प्रशिक्षकांनी विविध कलाप्रकारात सहभाग नोंदवुन आपल्‍या कलागुणांचे उत्‍कृष्‍ट असे सादरिकरण केले. विविध कला क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त साधारणत: १५० यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनी व ८ विजेत्या संघांचा चषक देऊन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. सदरील युवक महोत्सव उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला, कार्यक्रम यशस्वीसाठी डॉ. व्ही. बी. कांबळे, डॉ. बी. एस. इंदुलकर, डॉ. पी. एच. वैद्य, डॉ. व्ही. के. भांबरे, डॉ. आर. डी. शेळके, डॉ. व्ही. डी. सुर्वे, प्रा. डी. जी. मोरे आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विध्यार्थीनी परिश्रम घेतले.

Friday, October 5, 2018

वनामकृवित राष्‍ट्रीय छात्रसेनेचे राईफल फायरिंग सराव शिबीर संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय छात्रसेनेची 52, महाराष्ट्र बटालियन नांदेड परिक्षेत्र अंतर्गत दिनांक 3 आणि 4 ऑक्टोंबर रोजी 22 राईफल फायरिंगचे सराव शिबीर विद्यापीठातील खानापुर ‘अ’ ब्लॉक सेंट्रल फार्म पार पडले. शिबीराकृषि महाविद्यालय, परभणी, मराठवाडा हायस्कुल, परभणी, अभिनव विद्या विहार, पुर्णा, बाबाराव पाटील विद्यालय, झरी, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकीस्कुल, परभणी व श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी यांनी सहभाग नोंदवला. शिबीरा 235 छात्रसैनिकांनी 22 रायफलने फायरिंगचा सराव केला. दिनांक 3 ऑक्‍टोबर रोजी 52, महाराष्ट्र बटालियन, एन.सी.सी., नांदेड चे कमाडिंग ऑफिसर विकास शिडील्य, संचालक शिक्षक डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, डॉ. आर. व्ही. चव्हाण, आदींनी भेट दिली. सराव शिबीराच्‍या यशस्‍वीतेसाठी लेप्टनंट डॉ. शिष बागडे, भागवत भोसले, रवि हिवाळकर, विशाल निर्मळ, हनुमान माने, गणे कापावार आदींनी परीश्रम घेतले.