Monday, February 3, 2020

वनामकृवित रेशीम कोष निर्मीतीवर प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व राष्ट्रिय कृषि विकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 फेब्रुवारी रोजी  रेशीम कोष निर्मीती व काढणी तंत्रज्ञानया विषयावर एक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, संशोधन उपसंचालक डॉ. अशोक जाधव, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजिव बंटेवाड,  पाणी व्यवस्थापण योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोक कडाळे, पुर्णा येथील रेशीम कोष मार्केटचे अध्यक्ष डॉ. संजय लोलगे, संशोधन विस्तार केंद्र, केंद्रिय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. ए. जे. कारंडेडॉ. के. के. डाखोरे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह चौहान आदीची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाषणात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, रेशीम शेतीमुळे खेडयात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून रेशीम उद्योगाकडे अनेक शेतकरी वळत आहे. कृषि विद्यापीठाच्‍या रेशीम संशोधन केंद्राच्‍या वतीने रेशीम उत्पादकांना सातत्‍याने प्रशिक्षणाच्‍या माध्यमातून तांत्रीक मार्गदर्शन करण्‍यात येत आहे, याचा निश्चितच लाभ होत आहे.
तांत्रिक सत्रात डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम कोष निर्मीती व काढणी तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्हयातुन मोठया संखेने शेतकरी उपस्थीत होते. सुत्रसंचालन प्रा. चंद्रकांत अडसुळ यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अरूण काकडे,  हरिश्चंद्र ढगे, इंगोले आदीसह विद्यार्थ्‍यींनी परिश्रम घेतले.

ऊरूसानिमित्‍त वनामकृविच्‍या वतीने संदल


एकात्‍मतेचे प्रतिक असलेला परभणी येथील प्रसिध्‍द हजरत सयद शाह तुराबुल हक यांच्‍या ऊरूसानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचा-यांच्‍या वतीने दि २ फेब्रुवारी रोजी संदल काढण्‍यात आला. संदलचा प्रारंभ शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले व कुलसचिव श्री रणजित पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. याप्रसंगी शेख सलीम, रामसिंग पवार, श्री आडे, शेख मैहमुद, मोईनभाई, युसुफ अली, जाफर अली, कौशाबाई मगर आदीसह विद्यापीठातील कर्मचारी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते. 

Friday, January 31, 2020

कापूस पिकातील संशोधनाबद्दल विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांना राष्ट्रीय पुरस्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांना भुवनेश्‍वर येथील ओरिसा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठात "कापूस पिकाच्या समस्या व उपाययोजना'' यावर दिनांक २२ ते २४ जानेवारी दरम्यान आयोजित राष्ट्रीय परिसंवादात कापूस पिकातील उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल प्राफेशनल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. परिसंवादात ओरिसा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. आर. के. अग्रवाल व उद्यपुर येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. एन. एस. राठोड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरिल परिसंवादाचे आयोजन कापूस संशोधन व विकास संघटना, हिस्सार आणि भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्यातर्फे करण्यात आले होते.
विद्यापीठाचे कपाशीचे देशी वाण, अमेरिकन सरळ व संकरित वाण विकसीत करण्‍यात डॉ. डी. बी. देवसरकर यांनी कापूस पैदासकार आणि कापूस विशेषज्ञ म्हणून मोलाचे योगदान आहे. यात एनएचएच २०६, एनएचएच २५० व एनएचएच ७१५ हे अमेरिकन संकरित कपाशीचे वाण व एनएच ६१५ व एनएच ६३५ हे अमेरिकन कपाशीचे सरळ वाण मध्य भारतासाठी लागवडीकरिता प्रसारीत करण्यात आले. पीएचए ४६, पीए १८३, पीए ०८, पीए ५२८ व पीए ७४० हे  देशी कापूस वाण प्रसारित करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. बी टी कापूस उत्पादन तंत्रज्ञान, एकात्मीक कीड व रोगांच्या व्यवस्थापनावर संयुक्त संशोधन समिती मार्फत विविध शिफारशी करण्यात मोलाचा सहभाग आहे. या शिफारशी पीक प्रात्यक्षीके, शेतकरी मेळावे, कृषि प्रदर्शने, कृषि दिंडी इत्यादी माध्यमाद्वारे शेतक-यांपर्यत पोहचविण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. त्‍यांनी आचार्य व पदव्‍युत्‍तर पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून काम केले असुन आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय नियतकालीकात मध्‍ये संशोधनपर व इतर माध्‍यमातुन मराठी लेखांचे लिखान केले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सहभाग नोंदवून संशोधन लेखांचे सादरीकरण केले.

पाथरी तालुक्‍यातील मौजे वडी येथे शेतकरी मेळावा संपन्‍न

ऊस लागवड ठिबक पध्‍दतीने करण्‍याचा डॉ यु एन आळसे यांचा सल्‍ला
कृषि विभाग, परभणी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक 28 जानेवारी रोजी पाथरी तालुक्‍यातील मौजे वडी येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्री शिवाजीराव कुरे हे होते तर कार्यक्रमास जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे, प्रा एस एस शिंदे, तालुका कृषि अधिकारी श्री व्‍ही ए शिंदे, कृषि अधिकारी श्री नांदे, कृषि पर्यवेक्षक श्री गिराम, श्री चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ यु एन आळसे म्‍हणाले की, यावर्षी मोठया प्रमाणात पाऊस झाला असुन जायकवाडी प्रकल्‍पातुन शेतीसाठी चार आवर्तन पाणी सोडण्‍यात येणार आहेत, यामुळे शेतक-यांचा नगदी पिक म्‍हणुन ऊस लागवडीकडे मोठा कल आहे. परंतु शेतकरी बांधवानी ठिबक पध्‍दतीने ऊस लागवड करण्‍याचा सल्‍ला देऊन ठिबक पध्‍दतीने ऊस लागवड केल्‍यास 40 टक्के पाण्‍यात बचत होऊन उत्‍पन्‍नात 20 टक्के वाढ होते, असे ते म्‍हणाले.
जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवणी प्रकल्‍पाबाबत माहिती देऊन शेतक-यांनी या प्रकल्‍पाचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले. या प्रकल्‍पात वैयक्तिक लाभाबरोबरच नैसर्गिक साधनसंपत्‍तीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी भरपुर निधी उपलब्‍ध असल्‍याचे सांगितले. यात फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन, शेडनेट, शेती औजारे, पाईप, मोटार आदीसह शेतीपुरक जोडधंदे शेळीपालन व कुक्कटपालन आदींबाबीचा समाविष्‍ठ असल्‍याचे सांगितले. प्रा एस एस शिंदे यांनी विद्यापीठाच्‍या संशोधन, शिक्षण व विस्‍तार शिक्षण कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि अधिकारी श्री नांदे यांनी केले आभार श्री चव्‍हाण यांनी मानले. मेळाव्‍यास गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, January 27, 2020

कृषि विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानामुळे आदिवासी शेतक-यांच्‍या जीवनाचा कायापालट.......कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

कळमनुरीतील आदिवासी बहुल मौजे वाई येथे शेतकरी मेळावा संपन्‍न

परभणी कृषि विद्यापीठाने आदिवासी उपप्रकल्‍पांतर्गत आदिवासी बहुल मौजे वाई गाव दत्‍तक घेऊन गेल्‍या पाच वर्षापासुन कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराचे कार्य करीत आहे, आज या गावातील शेती व शेतक-यांच्‍या जीवनाचा कायापालट झाला असुन गावांतील आदिवासी शेतक-यांच्‍या शेतीतील उत्‍पादन व उत्‍पन्‍नात भरिव अशी वाढ झाली. विशेषत: पाणी व्‍यवस्‍थापनाचे तंत्रज्ञानाच्‍या आधारे सोयाबीन, गहु, हरभरा, हळद, ऊस आदी पिकांच्‍या उत्‍पादनात दुप्‍पटीपेक्षा जास्‍त वाढ झाली. यामुळे आदिवासी शेतक-यांचा सामाजिक व आर्थिक स्‍तर उंचावला आहे, ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पातंर्गत पाणी व्‍यवस्‍थापन योजनेमार्फत आदिवासी उपप्रकल्‍पाच्‍या वतीने हिंगोली जिल्‍हयातील कळमनुरी तालुक्‍यातील वाई गावात दिनांक 26 जानेवारी रोजी आयोजित शेतकरी मेळाव्‍यात ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरसरपंच शकुराव मुकाडे, प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ अशोक कडाळे, संशोधन उपसंचालक डॉ अशोक जाधव, शास्‍त्रज्ञ डॉ गजानन गडादे, श्री राम कडाळे, श्री कैलास कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, प्रकल्‍पापुर्वी गावातील शेतकरी केवळ खरिप हंगामातच पिक लागवड करीत होते तसेच इतर वेळी गावातील वृध्‍द सोडता शेतकरी व युवक मोठया प्रमाणात ऊसतोडीकरिता स्‍थलांतर करत होते. पंरतु प्रकल्‍पातंर्गत गावातील आदिवासी शेतक-यांना आधुनिक ठिंबक व तुषार सिचंन संचाचे वाटप करण्‍यात आले व त्‍याचा शेतकरी बांधवानी कार्यक्षमरित्‍या वापर केला. आज अनेक आदिवासी शेतकरी हळद व ऊस या नगदी पिकांकडे वळाले असुन गाव रोजगाराची वाढ झाली, गावांतुन होणारे ऊसतोडीसाठीचे स्‍थलांतर पुर्णपणे थांबले आहे. ऐवढेच नव्‍हे तर गावातील शेतक-यांचा शेतीकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन पुर्णपणे बदलला आहे. गावातील कच्‍च्‍या घरांची जागी पक्‍क्‍या घरांनी घेतली असुन गावातील मुलामुलींचा शिक्षणातही प्रगती झाल्‍याचे दिसून येत आहे. ऐवढयावरच कृषि विद्यापीठ थांबणार नसुन गावातच शेतीपुरक जोडधंदे व शेतमाल प्रक्रिया उद्योगास चालना देण्‍यासाठी विद्यापीठ प्रयत्‍न करणार असल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले. 
मार्गदर्शनात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर मौजे वाई गांवात परभणी कृषि विद्यापीठाने गेल्‍या पाच वर्षात राबविलेल्‍या कृषि तंत्रज्ञान विस्‍तार कार्यामुळे गावात मोठा बदल झाला असुन कृषि तंत्रज्ञानाची गंगाच गावात अवतरली असे म्‍हणाले.
सरपंच श्री शकुराव मुकाडे आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाच्‍या प्रयत्‍नामुळे आदिवासी शेतक-यांचे जीवन समृध्‍दीकडे वाटचाल करित असून विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व आदिवासी शेतकरी यांचे नात दृढ झाले आहे. तर मनोगतात माजी सरपंच श्री नामदेव लाखाडे म्‍हणाले की, विद्यापीठाने वाटप केलेल्‍या तुषार व ठिबक सिचंन संचामुळे व पाणी व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानामुळे गावातील 180 हेक्‍टर बागायती जमिनीत वाढ होऊन 478 हेक्‍टर जमिन बागायती झाली, विशेषत: ही जमीन खडकाळ व मुरमाड आहे. 
मेळव्‍यात तीन तुषार सिंचन संचाचे तर 16 आदीवासी शेतक-यांना ठिबकच्‍या उपनळयाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्‍यात आले. यावेळी शिवार फेरीच्‍या माध्‍यमातुन दत्‍तक शेतक-यांच्‍या शेतात राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध पिक प्रात्‍यक्षिके व उपक्रमास कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी भेट देऊन शेतक-यांशी मुक्‍त संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ अशोक कडाळे यांनी आदिवासी उपप्रकल्‍पांतर्गत मौजे वाई गावांत राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री प्रकाश पतंगे यांनी केले तर आभार डॉ गजानन गडदे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ के आर कांबळे, डॉ स्मिता सोंळकी, डॉ लक्ष्‍मणराव जावळे, डॉ अनुराधा लाड आदीसह गावातील शेतकरी बांधव व भगिनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदुकमार गिराम, प्रभाकर सावंत, देवेंद्र कु-हा, अंजली इंगळे, प्रकाश मोते, कृषी पर्यवेक्षक नंदु वाईकर, कृषि सहाय्यक माधव मोटे आदीसह गावक-यांनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास गावातील शेतकरी बांधव व भगिनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


वनामकृवित प्रजासत्‍ताक दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करून प्रजासत्‍ताक दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी कुलसचिव श्री रणजित पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी भारताच्‍या संविधानामधील उद्देशिकेचे कुल‍सचिव श्री रणजित पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली सामुहिकरित्‍या वाचन करण्‍यात आले.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी प्रजासत्‍ताक दिनांच्‍या सर्वांना शुभेच्‍छा देऊन देशाला कल्‍याणकारी राष्‍ट्र निर्मितीसाठी अन्‍न सुरक्षा व पोषण सुरक्षेची गरज असुन हे उद्देष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी कृषि विद्यापीठाची निर्णायक भुमिका आहे, यासाठी आपणास सर्वांना आपले योगदान द्यावे लागेल असे ते म्‍हणाले. याप्रसंगी छात्रसेना अधिकारी डॉ जयकुमार देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी मान्‍यवरांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले.  

Friday, January 24, 2020

परभणी कृषि विद्यापीठास सर्वसाधारण विजेतेपद तर उपविजेतेपद राहुरी संघास

वनामकृवित आयोजित महाराष्ट्र राज्य कृषि विद्यापीठे व महाबीज कर्मचारी क्रीडा स्पर्धेचा समारोप 
संतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे व महाबीज यांच्‍या राज्‍यस्‍तरिय कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेत परभणी कृषि विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद तर उपविजेतेपद राहुरी संघाने पटकावले. 
स्‍पर्धेचा समारोप दिनांक 24 जानेवारी रोजी झाला, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलसचिव श्री रणजित पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून परभणी जिल्‍हा बॅडमिंटन असोशियनचे सचिव श्री रविंद्र देशमुख हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर महाबीजचे विभागीय व्‍यवस्‍थापक श्री गणेश चिरूडकर, राहुरीचे विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ गायकवाड, अकोलाचे डॉ कुबडे, आयोजक विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकरी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती
अध्‍यक्षीय भाषणात कुलसचिव श्री रणजित पाटील यांनी खेळामुळे दैनंदिन कामात उत्‍साह व ऊर्जा टिकून राहतो, कामातील ताण कमी होते असे म्‍हणाले तर प्रमुख पाहुणे श्री रविंद्र देशमुख आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कामाच्‍या व्‍यापात आपण आपल्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करतो, परंतु खेळामुळे शारिरीक क्षमता टिकून राहते.
या राज्‍यस्‍तरिय क्रीडा स्‍पर्धेत अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, यजमान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व अकोला येथील महाबीज येथील दोनशे पेक्षा जास्‍त कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी स्‍पर्धेतील विजेत्‍यास मान्‍यवरांच्‍या हस्‍ते बक्षीस वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार श्री अशोक खिल्‍लारे यांनी मानले. कार्यक्रमास स्‍पर्धेक खेळाडु, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

स्‍पर्धेचे निकाल
सांघीक खेळात पुरूष गटात क्रिकेट स्‍पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विजेता ठरला तर महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा संघ उपविजेता ठरला. व्हॉलीबॉल स्‍पर्धेत परभणी विद्यापीठ व अकोला विद्यापीठ हे संयुक्तपणे विजेते ठरले. कबड्डीदापोली कृषि विद्यापीठाने प्रथमस्‍थान तर व्दितीयस्‍थान महाबीज, अकोलाने पटकावले. बास्केटबॉल स्‍पर्धेत परभणी विद्यापीठ प्रथम ठरला तर राहुरी विद्यापीठ व्दितीय ठरली. बॅडमिंटन स्‍पर्धेत परभणी कृषि विद्यापीठाने प्रथम तर दापोली विद्यापीठाने व्दितीय स्‍थान पटकावले तसेच टेबल टेनिस स्‍पर्धेत राहुरी कृषि विद्यापीठ प्रथम तर दापोली कृषि विद्यापीठ व्दितीय ठरली. बुध्दीबळमध्‍ये परभणी विद्यापीठ संघ विजेता तर दापोली कृषि विद्यापीठ संघ उपविजेता ठरला तर रस्सीखेचमध्‍ये दापोली कृषि विद्यापीठ विजेता तर उपविजेता राहुरी कृषि विद्यापीठ संघ ठरला.
सांघीक खेळ महिला गटात बॅडमिंटनमध्‍ये अकोला कृषि विद्यापीठाचा संघ विजेता तर राहुरी संघ उपविजेता ठरला. टेबल टेनिस मध्‍ये राहुरी संघ प्रथम स्‍थानावर राहिला तर व्दितीयस्‍थानावर अकोला कृषि विद्यापीठ राहिला. बुध्दीबळ स्‍पर्धेत अकोला कृषि विद्यापीठ विजेता तर व्दितीयस्‍थानी राहुरी परभणी कृषि विद्यापीठाने संयुक्‍तपणे उपविजेते ठरले. कॅरम स्‍पर्धेत परभणी कृषि विद्यापीठ प्रथम तर महाबीज, अकोला व्दितीय ठरला. 
रांगोळी स्‍पर्धेत अकोला विद्यापीठाची प्रेरणा चिकटे प्रथम ठरती तर व्दितीयस्‍थानी राहुरीची सिमा मिस्त्री व परभणीची मंजुषा रेवणवार संयुक्‍तपणे राहिल्‍या तसेच तृतीयस्‍थानी अकोला विद्यापीठाची नितिमा जाधव व महाबीजची किरण ढगे संयुक्तपणे राहिल्‍या. आठशे मीटर धावणे पुरुष गटात महाबीजचा सागर मालटे प्रथम तर व्दितीय विलास पायघनतृतीयस्‍थान वरद सिरसाट (राहुरी)  यांनी पटकावले. चारशे मीटर धावणे पुरुष गटात प्रथम राहुरी रविंद्र बनसोड तर व्दितीय परभणीचे एस. यु. चव्हाण तृतीय दापोलीचे राजेंद्र गुजर ठरले व उत्तेजनार्थ बक्षीस बालाजी डोईजड यांना देण्‍यात आले. चारशे मीटर धावणे महिला गटात प्रथम महाबीजची कल्याणी आचमोर ठरली तर व्दितीय परभणीची सारिका भोईतृतीय राणी पोले ठरली.
गीतगायन स्‍पर्धेत प्रथम दापोलीचे डॉ. प्रफुल अहिरे तर व्दितीय परभणीचे डॉ.विशाल अवसरमल तृतीयस्‍थानी राहुरीचे डॉ.जयप्रकागायकवाड राहीले. मिमीक्रीमध्‍ये प्रथमस्‍थान विजय सावंत यांनी पटकावला तर व्दितीयस्‍थान डॉ जया बंगाळे यांनी पटकावला.