Friday, January 31, 2020

पाथरी तालुक्‍यातील मौजे वडी येथे शेतकरी मेळावा संपन्‍न

ऊस लागवड ठिबक पध्‍दतीने करण्‍याचा डॉ यु एन आळसे यांचा सल्‍ला
कृषि विभाग, परभणी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक 28 जानेवारी रोजी पाथरी तालुक्‍यातील मौजे वडी येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्री शिवाजीराव कुरे हे होते तर कार्यक्रमास जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे, प्रा एस एस शिंदे, तालुका कृषि अधिकारी श्री व्‍ही ए शिंदे, कृषि अधिकारी श्री नांदे, कृषि पर्यवेक्षक श्री गिराम, श्री चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ यु एन आळसे म्‍हणाले की, यावर्षी मोठया प्रमाणात पाऊस झाला असुन जायकवाडी प्रकल्‍पातुन शेतीसाठी चार आवर्तन पाणी सोडण्‍यात येणार आहेत, यामुळे शेतक-यांचा नगदी पिक म्‍हणुन ऊस लागवडीकडे मोठा कल आहे. परंतु शेतकरी बांधवानी ठिबक पध्‍दतीने ऊस लागवड करण्‍याचा सल्‍ला देऊन ठिबक पध्‍दतीने ऊस लागवड केल्‍यास 40 टक्के पाण्‍यात बचत होऊन उत्‍पन्‍नात 20 टक्के वाढ होते, असे ते म्‍हणाले.
जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवणी प्रकल्‍पाबाबत माहिती देऊन शेतक-यांनी या प्रकल्‍पाचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले. या प्रकल्‍पात वैयक्तिक लाभाबरोबरच नैसर्गिक साधनसंपत्‍तीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी भरपुर निधी उपलब्‍ध असल्‍याचे सांगितले. यात फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन, शेडनेट, शेती औजारे, पाईप, मोटार आदीसह शेतीपुरक जोडधंदे शेळीपालन व कुक्कटपालन आदींबाबीचा समाविष्‍ठ असल्‍याचे सांगितले. प्रा एस एस शिंदे यांनी विद्यापीठाच्‍या संशोधन, शिक्षण व विस्‍तार शिक्षण कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि अधिकारी श्री नांदे यांनी केले आभार श्री चव्‍हाण यांनी मानले. मेळाव्‍यास गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.