Wednesday, June 26, 2013

कृषि हवामान विभागनिहाय अभ्‍यासगटाची मराठवाड्यातील जिल्‍ह्यात कार्यशाळा मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्न



हिंगोली

हिंगोली
औरंगाबाद  
राज्‍यातील 83 टक्‍के क्षेत्र कोरडवाहू असून राज्‍यात पर्जन्‍यमान, जमीन व हवामानानुसार नऊ कृषि हवामान विभाग आहेत. कृषि उत्‍पादनात स्थिरता येण्‍यासाठी कृषि हवामान विभागनिहाय संशोधन करुन त्‍या-त्‍या विभागासाठी अनुकूल पिक पध्‍दती, पिकांच्‍या जाती, मृद व जल संधारणाचे उपचार, कृषि प्रक्रिया व विपणन यासाठी स्‍वतंत्र धोरण निश्चित करण्‍यासाठी राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांच्‍या कुलगुरूंच्‍या अध्‍यक्षतेखाली कृषि व पणन मंत्री मा. ना. श्री राधाकृ‍ष्‍ण विखे-पाटील यांचे सूचनेनुसार अभ्‍यासगट स्‍थापन करण्‍यात आले आहेत. मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अंतर्गत असलेल्‍या आठ जिल्‍ह्यासाठी मा. कुलगुरु डॉ. के. पी. गोरे यांचे अध्‍यक्षतेखाली नुकतीच हिंगोली, परभणी जालना व औरंगाबाद येथे अभ्‍यासगटाची कार्यशाळा संपन्‍न झाली.
सदरील बैठकीत मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. गोरे म्‍हणाले कि, कृषि हवामान विभागनिहाय अभ्‍यासगटातील कार्यशाळेतील चर्चा अत्‍यंत महत्‍वाची असून या चर्चातील महत्‍वाच्‍या बाबीं राज्‍याचे कृषि धोरण ठरविण्‍यास मार्गदर्शक ठरणार आहे. हवामान बदलामुळे शेतक-यांना बदलाव लागेल, पिक पध्‍दतीत बदल करावे लागतील. प्रत्येक शेतक-यांनी शेती जोडधंदे करावेत असा सल्‍ला ही त्‍यांनी दिला.
या अभ्‍यासगटाच्‍या कार्यशाळेत एकुण 14 विषयावर सखोल चर्चा करण्‍यात आली. त्‍यात प्रामुख्‍याने पिक पध्‍दती, पिकाच्‍या जाती, लागवड पध्‍दती, पिक उत्‍पादन वाढीसाठी तंत्रज्ञान या विषयावर चर्चा करण्‍यात आली. तसेच कृषि विकासासाठी सध्‍या कार्यरत असलेल्‍या योजनांची कार्यपध्‍दती, आवश्‍यक नवीन कार्यपध्‍दती, मृद व जलसंधारण उपचार व त्‍याचे मापदंड, तांत्रिक निकष, शेतीची उपलब्‍ध आवश्‍यक माहिती, मत्‍स्‍य व्‍यवसाय, शेळी-मेंढी व्‍यवसाय, कुक्‍कुटपालन, वराहपालन, ससेपालन इत्‍यादी कृषि जोडधंद्याचा या विभागातील वाव व वाढीचा अभ्‍यास, दुग्‍ध व्‍यवसायाची सध्‍याची स्थिती व भविष्‍यातील वाव, कृषि माल साठवणुक व त्‍याची जोपासना करणे, कृषि यांत्रीकीकरण, पिक विमा, शासनाच्‍या विविध कृषि योजनांची प्रभावी अमलबजावणी, जमिनीचे आरोग्‍य, फळे-भाजीपाला उत्‍पादन अशा विविध विषयावर सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. तसेच उपस्थित शेतक-यांकडून विविध कृषि विषयावरील प्रतिक्रिया व सुचना नोंदविण्‍यात आल्‍या.
      शेतमालाच्‍या मुल्‍यवर्धीत प्रक्रियेबाबत शेतक-यांना काळानुरुप प्रशिक्षणाची आवश्‍यकता असून ठिबक सिंचनास जास्‍तीचे अनुदान, सेंद्रीय शेत मालासाठी बाजारपेठेची उपलब्‍धता तसेच प्रत्‍येक गावात स्‍वयंचलित हवामान केंद्राची आवश्‍यकता असल्‍याची मत उपस्थित कृषि विभागातील अधिकारी व शेतक-यांनी व्‍यक्‍त केली.
     सदरील कार्यशाळेतील महत्‍वाच्‍या बाबी व सुचना राज्‍यशासनास सादर करण्‍यात येणार असून याचा उपयोग पुढील कृषि धोरण ठरविण्‍यास मदत होणार आहे.
           या बैठकीस संबंधीत जिल्‍ह्याच्‍या जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्‍ह्यातील सर्व तालुका स्‍थरावरील कृषि अधिकारी व आत्‍माचे अधिकारी, विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ आणि कृषि विज्ञान केंद्राचे अधिकारी, शेतक-यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.