वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, परभणी व फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांचे तर्फे हळद व सोयाबीन प्रकिया तंत्रज्ञान व मुल्यवर्धन यावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांचे मार्गदर्शनाखाली ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातून दिनांक 3 व 4 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते. दोन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दि. 4 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातील जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. जे. कांबळे तर प्रमुख पाहूणे म्हणून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषीविद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे तसेच विभाग प्रमुख डॉ. सौ. स्मिता खोडके, अर्थशास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. चव्हाण, आयोजक केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, महिला आर्थिक विकास महामंडळ, परभणी जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती निता अंभोरे, फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई, संचालक श्री. उमेश कांबळे, सदस्य शास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे आदींचा प्रमुख सहभाग होता.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना डॉ. के.जे.कांबळे यांनी सांगीतले की, ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतकयांनी हळद व सोयाबीनवर गावातच प्रक्रिया करावी. त्यातुन उद्योग, पैसा व रोजगार निर्माण होऊन या माध्यमातून गाव आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करता येईल. यासाठी गावातील हळद व सोयाबीन उत्पादक शेतकयांनी एकत्र येऊन आपण उत्पादीत करत असलेल्या शेतमालावर गावातच प्रक्रिया कशी करता येईल यासाठी गावातच प्रयत्न करणे गरजेचे आहे, यासाठी असे प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे ही काळाची गरज आहे.
मार्गदर्शनात डॉ. विनोद खडसे म्हणाले की, आज ग्रामीण व शहरी भागातील जीवनशैली बदलली आहे. तसेच प्रक्रिया पदार्थांना मोठी मागणी आहे. उद्योग क्षेत्रात, मोठ्या शहरात हॉटेल, तसेच मोठे प्रक्रिया उद्योग यांच्याकडून प्रक्रिया केलेल्या पदार्थांना मोठी मागणी आहे. अशा वेळी शेतकरी बंधु-भगिनी, बचत गटाच्या महिला, बेरोजगार युवक, युवती यांनी आपल्या भागातील कच्चामाल लक्षात घेऊन छोटे मोठे प्रक्रिया उद्योग उभे करावेत.
सोयाबीन प्रक्रिया उद्योगावर मार्गदर्शन करतांना डॉ. सौ. स्मिता खोडके म्हणाल्या की, सोयाबीन पासुन 70 पेक्षाही अधिक प्रकारचे विविध पदार्थ तयार होतात. त्यापैकी रोजच्या वापरातील सोयापनीर, सोयामिल्क, प्रोटिन पावडर व सोयाणे इत्यादी विविध पदार्थ बनवता येतात असे सांगितले. तसेच सोयाबीन प्रक्रिया तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकरी, महिला स्वत:चा आर्थिक विकास साधू शकतील यासाठी सोयाबीन प्रक्रियेचे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून बचत गटांच्या माध्यमातून सोयाबीन प्रक्रिया व मुल्यवर्धन यास मोठा वाव आहे.
डॉ. आर. व्ही. चव्हाण यांनी शेतमाल बाजार व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मराठवाडा विभागात घेतल्या जाणाया विविध शेतमालाची प्रतवारी, प्रक्रिया, पाकिंग करणे व जाहिरात करून विक्री करण्यास शहरात मोठा वाव आहे. यासाठी शहरातील मागणी लक्षात घेऊन स्वत:चा ब्राँड विकसीत करावा
प्रशिक्षणाचे उद्घाटन दि. 03 सप्टेंबर रोजी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांच्या हस्ते संपन्न झाले होते. दोन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणात हळद व सोयाबीन प्रक्रिया तंत्रज्ञान व मुल्यवर्धन, बाजारपेठ व्यवस्थापन आदी विविध विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. राजेश क्षीरसागर यांनी हळद प्रक्रिया तंत्रज्ञान व मुल्यवर्धन, श्री. उमेश कांबळे यांनी बचत गटांसाठी दाळीचे विक्री व्यवस्थापन, श्री. नरेश शिंदे यांनी हळद विक्री व्यवस्थापन याविषयांवर तांत्रिक मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले तर श्रीमती निता अंभोरे यांनी प्रशिक्षणा मागील भुमिका मांडली. सुत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर डॉ. सुनील जावळे यांनी आभार मानले. प्रशिक्षण कार्यक्रमात महिला शेतकरी, शेतकरी बंधु, शेतकरी युवक, युवती यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. सुनिल जावळे, श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.