वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व
कृषि रसायनशास्त्र विभागातंर्गत असलेल्या अखिल भारतीय मृदा जैव विविधता - जैविक खत
प्रकल्पातंर्गत रब्बी हंगामाच्या विविध पिकांसाठी विद्यापीठ उत्पादित
उपयुक्त द्रवरुप जिवाणू खते शेतकयांना विक्री
करिता उपलब्ध आहेत.
जिवाणू खतांमध्ये रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत (पीएसबी), पालाश विरघळविणारे व वहन करणारे जिवाणू खत, जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणू खत, रायझोफॉस (भुईमुग व हरभरा पिकांसाठी), अॅझोटोफॉस (गहू, करडई, ज्वारी आदी पिकांसाठी) व नत्र, स्फुरद, पालाश, गंधक आणि जस्त (एनपीके, सल्फर, झिंक) यांचे एकत्रित द्रवरुप जिवाणू खत कापुस, हळद, ऊस, आद्रक, पपई, पेरु, केळी, डाळींब, टरबुज, खरबुज, संत्रा, मोसंबी, फळभाज्या व पालेभाज्या इत्यादी पिकांसाठी रुपये 375 प्रति लिटर या माफक दराने शेतकयांसाठी उपलब्ध आहेत. अशी माहीती या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. अनिल धमक यांनी दिली.
द्रवरुप जिवाणू खतांची उपयुक्तता व फायदे
जिवाणू खत म्हणजे पिकांसाठी उपयुक्त जीवंत
किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये केलेले मिश्रण होय. बियाण्यास
बीजप्रक्रिया, रोपास अंतरक्षीकरण किंवा मातीतून वापरल्यास जमिनीतील उपयुक्त जिवाणुंच्या
संख्येत वाढ होऊन आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. परिणामी उत्पादनात वाढ होते.
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते. जमीन जैविक क्रियाशिल बनते.
मुळांच्या संख्येत व लांबीत भरपुर वाढ होऊन मुख्य खोडांपासुन दुरवरील तसेच खोलवरील
अन्नद्रव्य, पाणी पिकास उपलब्ध होते. पिकांची रोग व किड प्रतिकार शक्ती वाढते. पिकांना
अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात तसेच जमिनीची नैसर्गिक सुपिकता टिकून
ठेवतात. जिवाणू खतांमुळे पिकांना दिलेल्या रासायनिक खतांचा कार्यक्षमरित्या वापर
होण्यास मदत होते.