Wednesday, September 2, 2020

वनामकृविच्‍या वतीने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वेबीनार मालिकेत कपाशीवरील एकात्मिक कीड व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन

येत्‍या शनिवारी जैविक निविष्ठांचा कीड व्यवस्थापनात वापर याविषयी मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दर शनिवारी सदृढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलीत वापरराज्यस्तरीय ऑनलाईन वेबीनार मालिकेचे आयोजन करण्‍यात आले असुन मालिकेच्‍या सातव्या सत्रात दिनांक ३० ऑगस्‍ट रोजी  ‘कपाशीवरील किडीचे व्यवस्थापनया विषयावर किटकशास्‍त्रज्ञ प्रा. दिगंबर पटाईत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे होते.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कपाशी हे मराठवाडयातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पीक असून सर्वात जास्त कीटकनाशकांचा वापर कपाशी या पिकामध्ये होतो त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो तर हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे.  रासायनिक कीटकनाशकाचा संतुलित वापर करून उत्‍पादन खर्चात बचत होऊन मानवी आरोग्यावर, पर्यावरणावर त्याचा होणार विपरीत परिणाम कमी करता येईल.

तांत्रिक सत्रात किटकशास्‍त्रज्ञ प्रा. दिगंबर पटाईत यांनी कपाशीवरील किडींची ओळख व एकात्मिक व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात त्यांनी कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडींची ओळख, त्यांचा जीवनक्रम प्रादुर्भाव, प्रादुर्भावाची लक्षणे या विषयी सचित्र माहिती दिली. किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी जीवनक्रम समजुन घेणे अतिशय महत्वाचे आहे. कपाशी पिकांत शेतकरी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करतात. काहीवेळा कीटकनाशकाची फवारणी करण्याची आवश्यकता नसतानाही फवारणी केली जाते यामुळे उत्‍पादन खर्च वाढतो. काही वेळा एकापेक्षा जास्त कीटकनाशके सोबत बुरशीनाशके, विद्राव्य खते, आणि संप्रेरके यांचा एकत्रित वापर करून फवारणी केली जाते, त्यामुळे ही विनाकारण खर्चात वाढ होते. एकत्रित वापरण्यामुळे काही वेळा कपाशीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन कपाशी जळू शकते. कीटकनाशकांचा संतुलित वापर, सोबत जैविक निविष्ठांचा वापर जसे निंबोळी अर्काचा वापर, काही बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर शेतकऱ्यांनी अवश्य करावा. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यावरच किटकनाशकांचा योग्‍य वापर करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले..

यावेळी शेतकरी बांधवांनी विचारलेल्‍या कपाशीवरील कीडीबाबत प्रश्‍नांना प्रा. दिगंबर पटाईत यांनी उत्‍तरे दिली. सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले तर आभार डॉ. मिलिंद सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रमास झुम मिटिंगच्‍या व युटयुबच्या माध्यमातुन एक हजारपेक्षा अधिक शेतकरी व कृषि विस्‍तारकांनी सहभाग नोंदवीला.

येत्‍या शनिवारी कीड व्यवस्थापनात जैविक निविष्ठांचा वापर याविषयी ऑनलाईन मार्गदर्शन

सदरिल राज्यस्तरीय वेबीनार मालिकेचे आठवे सत्र शनिवार दिनांक  ५ सप्टेंबर रोजी सांयकाळी  वाजता आयोजित केले असुन यात कीड व्यवस्थापनात जैविक निविष्ठांचा वापर या विषयावर किटकशास्‍त्रज्ञ डॉ. श्रध्दा धुरगुडे ह्या  झुम मिटिंगच्‍या माध्‍यमातुन मार्गदर्शन करणार असुन याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठ युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे, तरी या मालिकेत बहुसंख्य शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.