माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमाची सुरुवात, एकाच दिवशी विद्यापीठ शास्त्रज्ञ मराठवाडयातील ६० गावात शेतकरी बांधवासोबत
महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम राबविण्यात येणार असुन दिनांक १ सप्टेंबर रोजी या उपक्रमाचे उद्घाटन कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. उदय खोडके आदीसह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते. उपक्रमांच्या विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या पथकांच्या वाहनांना कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी हिरवा झेंडा दाखविला.
'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत संपूर्ण मराठवाड्यातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आदीं ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केेले. संपूर्ण मराठवाड्याकरिता विद्यापीठ शास्त्रज्ञांची २२ पथके तयार करण्यात आली होती, यात ८० पेक्षा जास्त शास्त्रज्ञांचा सहभाग होता. दिनांक १ सप्टेंबर रोजी साधारणता ६० पेक्षा जास्त गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून शेतकरी बांधवांच्या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले. संपूर्ण दिवस विद्यापीठ शास्त्रज्ञ कृषि विभागाच्या सहकार्यांने हे अभियान राबविण्यात आले. साधारण दोन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
उपक्रमांतर्गत दिनांक १ सप्टेबर रोजी मानवत तालुक्यातील मौजे भोसा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते तर सरपंच श्री सुभाषराव जाधव, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, पाणी व्यवस्थापन संशोधन योजनेचे प्रमुख डॉ हरीश आवारी, कृषि हवामान तज्ञ डॉ कैलास डाखोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, कोणत्याही देशाची सुरक्षा ही अन्न सुरक्षेवरच अवलंबुन असुन देशातील अन्न सुरक्षा ही शेतकरी बांधवाच्या हाती आहे. त्यामुळे देशातील विकासाचा केंद्रबिंदु हा शेतकरीच असला पाहिजे. भारतीय समाजाची खरी संस्कृती ही खेडयातच दिसुन येते, देशातील खेडी समृध्द झाली पाहिजेत. ज्ञानामुळेच मानवाची प्रगती झाली, जास्तीत जास्त ज्ञान अवगत केले पाहिजे. शेतकरी बांधवांनी मुलांच्या जास्तीत जास्त शिक्षण देण्याकरिता आग्रही असले पाहिजे. प्रयोगशील शेती करीता कृषि तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे असुन परभणी कृषी विद्यापीठ गांवातील निवडक युवकांना विविध कृषि विषयाचे प्रशिक्षण देईल, हेच प्रशिक्षीत युवक ‘विद्यापीठ दुत’ बनुन गांवातील इतर शेतक-यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचविण्यास मदत करितील. ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम हा विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि शेतकरी बांधव यांच्यातील नाते दृढ करण्याची संधी असल्याचे ते म्हणाले.
कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी मका पिकांवरील लष्करी अळी व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. प्रास्ताविकात डॉ देवराव देवसरकर म्हणाले की, विद्यापीठ विकसित तुर, सोयाबीन, ज्वार, हरभरा आदी पिकांच्या अनेक वाण अत्यंत उपयुक्त आहेत. शेतीत आर्थिक स्थैर्यकरिता शेतकरी बांधवानी शेती पुरक धंद्याची जोड देणे आवश्यक असल्याचे म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ हरिश आवारी यांनी केले तर आभार डॉ गजानन गडदे यांनी मानले. कार्यक्रमात शेतकरी बाबुराव जाधव, विश्वनाथ जाधव, अंशीराम जाधव आदींनी रबी पिकांचे वाण, पिकांवरील किड व खत व्यवस्थापन यावर प्रश्न विचारले, त्यास विद्यापीठ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखित विविध पुस्तिका गावातील ग्रंथालयास भेट दिली. गावातील जिल्हा परिषद विद्यालयास भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर शेतकरी बांधव्याच्या सोयाबीन प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी केली. मेळाव्यास मौजे भोसा येथील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.