वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास सेंद्रीय शेती संशोधनातील पुढाकार व सेंद्रीय शेतीसाठी दिलेले प्रोत्साहन व योगदान याकरिता शासकीय संस्था या वर्गातुन दिला जाणारा जैविक इंडीया पुरस्कार -२०२२ प्राप्त झाला आहे. सदरील पुरस्कार हा बेंगलुरु येथील सेंद्रीय शेती आंतरराष्ट्रीय क्षमता केंद्र, केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) आणि कृषि विभाग (कर्नाटक राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने आग्रा (उत्तर प्रदेश) येथे आयोजित भारतीय सेंद्रीय अन्न सभेत दिनांक २३ सप्टेंबर रोजी कर्नाटक राज्याचे कृषि मंत्री मा. श्री. बी. सी. पाटील यांच्या हस्ते केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव श्री. प्रियरंजन, सल्लागार डॉ. अशोककुमार यादव, कर्नाटक राज्याचे अप्पर मुख्य सचिव (कृषि) श्री. शिवयोगी कलसाद, मणिपुरचे अतिरिक्त मुख्य सचिव मा. श्री पी वायफेई, ईकोआचे कार्यकारी संचालक श्री. मनोज कुमार मेनन आदी उपस्थित होते. पुरस्काराबद्दल कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी तसेच विद्यापीठ परिवाराने अभिनंदन केले.
सन २०१८ पासुन वनामकृवि, परभणी येथे राज्य शासनातर्फे मंजुर व कार्यरत असलेल्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रा तर्फे सेंद्रीय शेतीमध्ये संशोधन व प्रशिक्षणाचे कार्य सुरु आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, मृदाविज्ञान, कृषिविद्या, उद्यानविद्या, कृषि कीटकशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र, कृषि प्रक्रीया अभियांत्रिकी, पशुसंर्वधन व दुग्धशास्त्र आदी विविध विषयात कार्य सुरू आहे. केंद्रातर्फे शेतकयांना सेंद्रीय शेती विषयात जमीन व पाणी व्यवस्थापन, वाणांची निवड व सेंद्रीय पध्दतीने लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रीय शेती उत्पादनासाठी बाजारपेठ व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग, सेंद्रीय प्रमाणीकरण अशा विविध विषयावर नियमितपणे प्रशिक्षण देण्यात येते. सेंद्रीय शेती प्रकल्पातर्फे अभिनव प्रशिक्षण उपक्रमांतर्गत कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर सन २०२० व २०२१ मध्ये राज्यस्तरीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमास राज्यातील व राज्याबाहेरील शेतकयांनी मोठया प्रमाणावर लाभ घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राज्यातील व देशातील नामांकीत कृषि विद्यापीठे व संस्थेतील तज्ञांनी सेंद्रीय शेतीमध्ये विविध विषयात शेतकयांना मार्गदर्शन केले. केंद्रात डॉ. आनंद गोरे हे प्रमुख अन्वेषक तर डॉ. स्मिता खोडके, डॉ. कैलास गाडे, डॉ. रणजित चव्हाण, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. श्रध्दा धुरगुडे, डॉ. अमोल भोसले, डॉ. प्रितम भुतडा, डॉ. आर. सी. सावंत आदी सदस्य शास्त्रज्ञ असुन श्रीमती सारीका नारळे, श्री. दिपक शिंदे, डॉ. सुनिल जावळे, श्री. अभिजित कदम, श्री. सतिश कटारे, श्री. सचिन रणेर, श्री. भागवत वाघ, श्री. दशरथ गरुड आदी कार्यरत आहेत.