वनामकृवित आयोजित रबी शेतकरी मेळाव्यास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद
हवामान बदलामुळे कधी अति पाऊस तर कधी पाऊसाचा खंड अशा टोकाच्या परिस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे, यावर मात करण्याकरिता तंत्रज्ञानाची गरज असुन तंत्रज्ञानधिष्ठीत शेती करण्याचा काळ आहे. भविष्यात डिजिटल शेती, ड्रोन तंत्रज्ञान, रोबोट अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वापर होणार आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंद्या आहे. शेतकरी बांधवाची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती आहे. कृषिच्या प्रगतीमुळेच जागतिक पातळीवर देश पुढे जात आहे. परंतु दुस-या बाजुस शेतकरी आत्महत्या होत आहेत, महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याकरिता केंद्र व राज्य शासन, लोकप्रतिनिधी, कृषी उद्योजक, आणि कृषी विद्यापीठ यांनी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औजित्य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित रबी शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणुन माजी कुलगुरू मा डॉ वेदप्रकाश पाटील, कृषि उद्योजक तथा महिकोचे विश्वस्त मा श्री. राजेंद्र बारवाले, जिंतुर विधानसभा सदस्य मा. आ. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, प्रयोगशील शेतकरी मा श्री दादा लाड आदी उपस्थित होते. व्यासपीठावर माजी खासदार अॅड सुरेश जाधव, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री विजय लोखंडे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री आर एस पाटील, सुरेश घुंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि पुढे म्हणाले की, आज कापुस लागवडीत नवीन तंत्रज्ञान विकसित केलेल्या श्री दादा लाड यांना गौरविण्यात आले तसेच युवा प्रयोगशील शेतकरी श्री दत्तात्रय कदम यांनी गौरविण्यात आले. भविष्यातही अशा मार्गदर्शक शेतकरी बांधवाना कृषी विद्यापीठ वेळोवेळी सन्मानित करणार आहे, होतकरू व नवनवीन प्रयोग करणा-यां शेतकरी बांधवाना प्रोत्साहित करण्यात येणार असुन यामुळे इतर शेतकरी बांधवाना प्रेरणा मिळेल.
मार्गदर्शनात माजी कुलगुरू मा डॉ वेद्रप्रकाश पाटील म्हणाले की, आज भारत युवकांचा देश आहे, या युवाशक्तीचा आपल्या योग्य पध्दतीने वापर करावा लागेल. कुशल व ज्ञानी मनुष्यबळाची देशाला गरज आहे. शेतीच देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे सांगुन त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास सविस्तर सांगितला.
जिंतुर विधानसभा सदस्य मा. आमदार श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांनी शेतकरी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल. मराठवाडयात एकात्मिक शेती पध्दतीचा प्रसार करण्याची गरज असुन कृषि विद्यापीठाने याकरिता विशेष प्रयत्न करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भाषणात मा श्री दादा लाड म्हणाले की, कापुस लागवडी खर्चातील वाढीमुळे शेतकरी अडचणीत आला. परंतु योग्य पध्दतीने व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ शक्य आहे, असे सांगुन त्यांनी स्वत: विकसित केलेले कापुस लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.
माजी खासदार अॅड सुरेश जाधव म्हणाले की, मराठवाडयातील जमिन अत्यंत सुपिक असुन विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरी बांधवांनी करावा. शेती हाच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतक-यांना पत, पुरवठा आणि पाणी याकरिता केंद्र व राज्य शासन प्रयत्न करित आहे.
मेळाव्यात कापुस लागवड पध्दतीत स्वत:च्या अनुभवावर तंत्रज्ञान विकसित करणारे मालसोन्ना येथील प्रयोगशील शेतकरी मा श्री दादा लाड यांचा विद्यापीठाच्या वतीने ‘शेतकरी मार्गदर्शक’ म्हणुन तर शेतीत यशस्वीपणे नवनवीन प्रयोग करणारे मालेगांव येथील युवा शेतकरी श्री दत्तात्रय कदम यांना ‘नाविण्यपुर्ण शेतकरी’ म्हणुन माननीय कुलगुरू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेतुन पोस्ट-डॉक पदवी प्राप्त केलेल्या विद्यापीठाच्या पहिला महिला शास्त्रज्ञ डॉ गोदावरी पवार यांचाही सत्कार करण्यात आला.
तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्त्रज्ञांनी रबी पिकांबाबत मार्गदर्शन केले तर चर्चासत्रात शेतकरी बांधवाच्या कृषि विषयक विविध शंकाचे समाधान करण्यात आले. याप्रसंगी बायर कंपनी आणि महिको कंपनी च्या वतीने ड्रोन व्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मेळाव्यात विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका, आणि विद्यापीठाचे मासिक शेती भाती यांचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ देवराव देवसरकर यांनी विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्या वाणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रितम भुतडा, डॉ सुनिता पवार, डॉ अरूण गुट्टे यांनी केले तर आभार डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनीसही शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला तर मेळाव्यास शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याचे उदघाटन करतांनामार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ इन्द्र मणिमार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा डॉ वेदप्रकाश पाटील
मार्गदर्शन करतांना माननीय आमदार श्रीमती मेघनाताई बोर्डिकर
प्रयोगशील शेतकरी मा श्री दादा लाड यांना 'शेतकरी मार्गदर्शक' फार्मर फेलो पुरस्काराने सन्मानित करतांना
युवा शेतकरी श्री दत्तात्रय कदम यांना नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्कारांने सन्मानित करतांना
पोस्ट-डॉक पदवी प्राप्त केलेल्या महिला शास्त्रज्ञ डॉ गोदावरी पवार यांचा सत्कार करतांना