Tuesday, May 16, 2023

दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ निर्मित सत्‍यतादर्शक बियाणे विक्रीस सुरूवात

तुर, सोयाबीन, ज्‍वारी, मुग पिकांचे बियाणे उपलब्‍ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचे अमृत महोत्‍सवी वर्ष आणि आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षाचे औचित्‍य साधुन विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप पिक परिसंवादाचे आयोजन गुरूवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाजवळील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात करण्‍यात आले आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे राहणार असुन उदघाटक तथा मुख्‍य अतिथी म्‍हणुन अमेरिकेतील कनेक्‍टीकट विद्यापीठाचे अधिष्‍ठाता तथा संचालक मा प्रा इंद्रजीत चौबे हे उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास अहमदाबाद (गुजरात) येथील बन्‍सी गीर गोशाळेचे अध्‍यक्ष मा श्री गोपालभाई सुतारीया, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहेत.  

दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ निर्मित विविध पिकांचे सत्‍यतादर्शक बियाणे विक्रीची सुरूवात करण्‍यात येणार असुन यात सोयाबीन पिकातील एमएयुएस-१६२, एमएयुएस-१५८ आणि एमएयुएस-७१ जातीचे बियाणे उपलब्‍ध असुन या बियाण्‍याची २६ किलो बॅगची किंमत ३९०० रूपये आहे. तसेच तुर पिकात बीडीएन-७१६ (लाल) व बीडीएन-७११ (पांढरी) या वाणाच्‍या ६ किलो बॅगची किंमत १०५० रूपये असुन बीडीएन-१३-४१ (गोदावरी) (पांढरी) या वाणाची २ किलो बॅगची किंमत ३५० रूपये आहे. ज्‍वारी मध्‍ये परभणी शक्‍ती या जैवसंपृक्‍त वाण ४ किलो बॅगाची किंमत ४०० रूपये असुन मुगाची बीएम-२००३-२  या वाणाची ६ किलो बॅगची किंमत १०८० रूपये आहे.

उपलब्‍ध वाणाबाबतचे वैशिष्‍टे

ज्‍वारीचे परभणी शक्‍ती वाण : विद्यापीठ विकसित परभणी शक्‍ती हे वाण देशातील पहिले जैवसंपृक्‍त वाण असुन खरीप हंगामाकरिता महाराष्‍ट्र राज्‍यात लागवडीकरिता शिफारस केले आहे. याचा पिक कालावधी ११५-१२० दिवसाचा असुन उत्‍पादन क्षमता हेक्‍टरी ३६ ते ३८ क्विंटल असुन कडब्‍याचे उत्‍पादन क्षमता हेक्‍टरी ११०-११५ क्विंटल आहे. यात लोह व जस्‍ताचे प्रमाण इतर सर्वसाधारण वाणापेक्षा जास्‍त असुन त्‍यामुळे हे वाण आरोग्‍यवर्धक वाण आहे. यात प्रती किलो बियाण्‍यात लोह ४२ मिग्रॅ व जस्‍त २५ मिग्रॅ प्रमाण आहे.

तुरीचे वाण

तुर पिकांचे बीडीएन-७११ (बीडीएन २००४-३): वाणाच्‍या दाण्‍याचा रंग पांढरा असुन कमी कालावधीत म्‍हणजेचे १५०-१६० दिवसात तयार होणारा आहे. याची कोरडवाहु लागवडी करिता शिफारस करण्‍यात आली असुन मर व वांझ रोगास प्रतिकारक आहे, याची उत्‍पादन क्षमता हेक्‍टरी १६ ते १८ क्विंटल आहे.

तुर पिकांचे बीडीएन-७१६ : या वाणाच्‍या दाण्‍याचा रंग लाल असुन १६५ ते १७० दिवसात तयार होतो. या वाणाची महाराष्‍ट्रात खरीप हंगामाकरिता लागवडीकरिता शिफारस करण्‍यात आली आहे. याची उत्‍पादन क्षमता हेक्‍टरी १८ ते २० क्विंटल असुन मर व वांझ रोगास प्रतिबंधक असुन उत्‍तम प्रतीची दाळ शिजण्‍याची गुणवत्‍ता चांगली आहे.

तुर पिकांचे बीडीएन – २०१३-४१ (गोदावरी) : हा वाणाच्‍या दाण्‍याचा रंग पांढरा असुन अधिक उत्‍पादन देणारा म्‍हणजेचे हेक्‍टरी २० ते २५ क्विंटल आहे. हा १६० ते १६५ दिवसात तयार होणारा वाण असुन मर व वांझ रोगास प्रतिबंधक असुन राज्‍याकरिता लागवडीकरिता शिफारस केली आहे. यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असुन प्रति हजार ग्रॅम मध्‍ये २१.४५ ग्रॅम आहे. फुलांचा रंग पांढरा असल्‍यामुळे इतर वाणांपेक्षा वेगळा आहे.

मुग पिकांचा बीएम-२००३-२ : हा वाण एकाच वेळी काढणीस येणारा असुन भुरी रोगास प्रतिबंधक आहे. दाणा टपोरा चमकदार असुन उत्‍पादन क्षमता हेक्‍टरी १२-१४ क्विंटल आहे. ६५ ते ७० दिवसात कालवधीत तयार होतो.

सोयाबीनचे वाण

एमएयुएस-७१ (समृध्‍दी): हा वाण ९३ - ९६ दिवसात तयार होणारा असुन उत्‍पादन क्षमता हेक्‍टरी २८ ते ३० क्विंटल आहे. फुलांचा रंग जांभळा असुन दाणा टपोरा आहे. पक्‍वतेनंतर १० ते १२ दिवस शेंग न फुटता शेतात उभा राहु शकतो. अंतरपिक पध्‍दतीत लागवड करण्‍यास योग्‍य वाण आहे.

एमएयुएस-१५८ : हा वाण ९५-९८ दिवसात पक्‍व होणारा असुन उत्‍पादन क्षमता हेक्‍टरी २६-३१ क्विंटल आहे. फुलांचा रंग जांभळा असुन दाणा टपोरा आहे, पक्‍ततेनंतर १०-१२ दिवस शेंगा फुटत नाहीत. खोडमाशी किडीस सहनशील असुन अंतरपिक पध्‍दतीत लागवड करण्‍यास योग्‍य वाण आहे.

एमएयुएस-१६२ : हा वाण १००-१०३ दिवसात तयार होणारा असुन उत्‍पादन क्षमता हेक्‍टरी २८-३० क्विंटल आहे. यंत्राव्‍दारे काढणीस उपयुक्‍त असुन शारीरीक पक्‍वतेनंतर १० – १२ दिवस शेंगा फुटत नाही.


एमएयुएस-१६२


तुर पिकांचे बीडीएन-७११